इंदिरा गांधींची जेल मधून सुटका व्हावी म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमान हायजॅक केलं होतं.

गोष्ट आहे 1978 सालची. तारीख 20 डिसेंबर.संध्याकाळी पावणे सहा वाजता लखनौहुन दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतले.

इंडियन एयरलाईन्सचे हे बोइंग 737 विमान होते. या विमानात 126 यात्रेकरू होते.

दिल्लीच्या पालम विमानतळावर विमान उतरणार त्याच्या 15 मिनिटे आधी विमानात गोंधळ सुरू झाला. पंधराव्या ओळीत बसलेले दोन तरुण अचानक उठून कॉकपीटजवळ आले.

कॅबिन क्रु मध्ये असलेल्या जी व्ही डे आणि एयर होस्टेस इंदूरी ठाकूर यांना धक्का देऊन त्यांनी कॉकपिट मध्ये प्रवेश केला. काही तरी घोळ सुरू आहे हे इतर प्रवाशांना जाणवत होतं.

काही वेळाने अनाऊन्समेंट झाली,

“आपलं विमान हायजॅक झालं आहे “

सगळ्या प्रवाशांना दरदरून घाम फुटला. कोणीही कोणाशी बोलेना,कोण अतिरेकी आहेत, आपलं विमान आता कुठे नेणार त्यांच्या मागण्या काय काहीच माहिती नव्हतं.

विमानात एके सेन आणि धर्मवीर सिन्हा नावाचे दोन माजी केंद्रीय मंत्री देखील प्रवास करत होते.

थोड्या वेळाने बनारस विमानतळावर आपण लँड होत आहोत अशी घोषणा झाली. आत कॉकपिट मध्ये वेगळंच रामायण घडत होतं.

विमानाचे पायलट होते कॅप्टन एम.एन.बट्टीवाला. त्यांच्यावर प्रचंड मोठा दबाव होता, शेकडो प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात होता. त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखून ते दोन तरुण त्यांना आडव्या तिडव्या सूचना देत होते.

अतिशय शांतपणे कॅप्टन बट्टीवाला परिस्थिती हाताळत होते.

त्या अपहरणकर्त्यांचं म्हणणं होतं की विमान नेपाळला नाही तर बांगलादेशला नेण्यात यावं. पण कॅप्टन बत्तीवाला यांनी समजावून सांगितल्यामुळे बनारसला उतरवण्यासाठी ते तयार झाले.

अपहरणकर्त्या पैकी एकजण प्रवाशांसमोर आला. त्याने आपली ओळख व मागण्या सांगणारे भाषण ठोकलं,

“हम यूथ इंदिरा कांग्रेस के मेंबर हैं. हम अहिंसा के रास्ते पर चलने वाले गांधीवादी हैं. पैसेंजर्स को बिल्कुल नुकसान नहीं पहुंचाएंगे. बस हमारी मांगें पूरी होनी चाहिए. इंदिरा गांधी को रिहा करो. इंदिरा गांधी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद.”

त्या दोघांच नाव भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे अस होतं. दोघेही 27-28 वर्षांचे होते.

नुकताच इंदिरा गांधींनी जाहीर केलेली आणीबाणी संपली होती. त्यांच्या नंतर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने इंदिरा गांधींना अटक केली होती.

विशेष पुरावे नसताना केलेली ही अटक म्हणजे जनता सरकार त्यांच्यावर सूड उगवतय असा समज सर्वसामान्य लोकांच्यात दृढ झाला होता.

यातूनच संजय गांधींच्या युथ काँग्रेसच्या या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हे मूर्खपणाच पाऊल उचललं होतं.

हे दोघे पांडे अतिरेकी नाहीत हे कळल्यावर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. त्यांना थोडं हलक्यातच घेणं सुरू झालं. पण पांडे आपला दरारा कायम ठेवण्यासाठी कोणालाही जागे वरून हलण्यास मनाई करत होते.

त्यातच विमानात असलेले इंदिरा गांधी यांचे सहकारी व माजी कायदा मंत्री एके सेन यांना बाथरूम ला जायचं होतं. पांडे त्यांनाही जाण्यास मनाई करत होते तेव्हा सेन रागाने ओरडू लागले,

“हिंमत असेल तर मला गोळ्या घाला पण मी तर टॉयलेट जाणारच आहे”

असा सगळा सावळा गोंधळ सुरू होता. त्यातच विमान बनारसला उतरलं. फक्त उत्तरप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांसोबतच बोलणार अस अपहरणकर्त्यानी जाहीर केलं.

आधी तर राम नरेश यादव यांनी नकार दिला पण पंतप्रधानांनी कान पकडल्यावर ते वाटाघाटी करण्यास बनारसला आले. अपहरणकर्त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडल्या,

इंदिरा गांधींची जेल मधून बिनशर्त सुटका ही त्यांची प्रमुख मागणी होती.

पंतप्रधान मोरारजी देसाईंचा आदेश होता की अपहरणकर्त्यांची कोणतीही मागणी मान्य करायची नाही. म्हणून मुख्यमंत्री गोड बोलून काही मार्ग काढता येतो का हे पाहत होते.

कमीतकमी लहान मुले, महिला, परदेशी नागरिक यांची तरी सुटका करा अशी विनंती केली गेली, पण भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे ठाम होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट विमानात चर्चेला बोलावलं.

अखेर मुख्यमंत्री चर्चेसाठी गेले ही.

पण या गोंधळात संधी साधून एका एस के मोदी नावाच्या बेरकी माणसाने मागचं दार उघडून पबोरा केला.

चर्चेच गुऱ्हाळ रात्र भर चाललं. लोक प्रचंड कंटाळले होते पहाटे सहा वाजता विमानाचं सामान उतरवण्याच दार उघडण्यात आलं, तिथून निम्म्याहून अधिक प्रवासी निसटले.

तोपर्यंत अपहरणकर्त्यांची हिरोगीरी उतरून गेली होती.

त्यातच एका पांडेचे वडील विमानतळावर आले, त्यांनी वायरलेस फोन ने आपल्या मुलाशी संपर्क साधला. त्यांचा आवाज ऐकून मात्र या किडनॅपर्सचा बांध सुटला.

दोघेही पांडे पोलिसांना शरण गेले. मात्र विमानातून उतरताना इंदिरा गांधी की जय, संजय गांधी की जय हा नारा कायम राहिला.

पोलीसांनी अटक केल्यावर कळाल की त्यांच्या कडे असलेलं पिस्तुल हे खेळण्यातलं होतं.

पण पुढे दोन वर्षात देशातलं वातावरण बदलून गेलं, इंदिरा गांधी जेल मधून बाहेर तर आल्याचं पण आश्चर्यकारकरित्या त्या परत सत्तेत आल्या.

भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या जोडीला चक्क आमदारकीच तिकीट देण्यात आलं.

भोलानाथ पांडे दोन वेळा निवडून देखील आले. इंदिराजींच्या मृत्यू नंतर सत्ता ताब्यात आल्यावर राजीव गांधींनीही या दोन्ही नेत्यांना शिक्षा देणे राहिले लांब पण त्यांना आपल्या घराण्याचे निष्ठावंत म्हणून पक्षातली मोठी पदे दिली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.