कॉंग्रेस बेरोजगार पोरांना महिना पाच हजार देणाराय, खरय का..? 

काय म्हणताय महिना पाच हजार, ते पण घरबसल्या. कॉंग्रेस खरच भारीए की.

भिडू लोकांनो उड्या मारून नका घरबसल्या पाच हजार नाही तर घरीच बसायची वेळ आलेल्या पोरांना पाच हजार अस या योजनेचं स्वरुप असणार आहे.

त्यात कसय आपल्याकडं आहेत इलेक्शन आणि इलेक्शन म्हणल्यानंतर “जुमला” तर असणारच. त्यामुळं डोळ्यावर पट्टी बांधून पाच हजारवर विश्वास ठेवला आणि मतदान केलं तर परत हेच म्हणायचे आम्ही तर फक्त म्हणलेलो. जुमला होता तो. 

हल्ली कुणावर विश्वास ठेवता येत नाही. म्हणून म्हणलं महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या मुहूर्तावर कॉंग्रेसने लोकांना पाच हजार रुपये महिना द्यायची जी घोषणा केली आहे,

त्याचा संपुर्ण सातबारा तुमच्या पुढे मांडावा. 

तर युवक कॉंग्रेसचे नेते आहेत सत्यजित तांबे. सत्यजित तांबे यांच नाव कॉंग्रेसच्या तरुणांकडून नेहमीच चर्चेत असतं. कार्यकर्ते म्हणतात, हा माणूस युवक कॉंग्रेसमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करत असतो. सत्यजित तांबे यांच्याच डोक्यातून युवकांचा जाहिरनामा मांडण्याची संकल्पना पुढे आली.

 कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी राज्यभरातल्या तरुणांच्या मुलाखती घेतल्या, राज्यभरातल्या ३ कोटी युवकांना वेक अप महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या सूचना घेतल्या. त्यांना काय वाटतं काय नाही या गोष्टींचा अभ्यास केला आणि अभ्यास करुन जाहीरनामा तयार केला अस युवक कॉंग्रेसचं मत आहे. 

तर आत्ता मुद्याकडे महाराष्ट्र ४.० या नावाने युवक कॉंग्रेसने युवकांचा जाहीरानामा प्रसिद्ध केला आहे. 

चांगली गोष्ट अशी की युवकांसाठी प्रसिद्ध केलेला हा देशातला पहिला जाहीरनामा असल्याचं सांगण्यात आलय. संपुर्ण कॉंग्रेस झोपली असताना युवक कॉंग्रेस काहीतरी करत हे चांगलच आहे म्हणा. 

तर या जाहीरनाम्यात काय आहे..? 

यामध्ये भूमिपुत्र स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्यात येईल अस आश्वासन देण्यात आलं आहे. महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद करण्यात येईल, ३० सप्टेंबर २०१९ पर्यन्त घेतलेली शैक्षणिक कर्ज माफ करणार. दिंव्यांग विद्यार्थांसाठी विनामुल्य उच्च शिक्षणाची हमी देणार वगैरे वगैरे… 

पण आम्हाला यातला सर्वात इंटरेस्टिंग मुद्दा वाटला तो म्हणजे,

बेरोजगार तरुणांना महिना पाच हजार रुपये देणार… 

आत्ता यात काय लॉजिक आहे की उगी आभाळातल्या गप्पा आहेत म्हणून आम्ही एका अभ्यासू कार्यकर्त्याकडून माहिती घेतली तेव्हा त्यांन आमच्यापुढे हे गणित मांडल. 

तो म्हणला,

सध्या महाराष्ट्राची महसूली तूट २,०२,९३,००,००,००० इतकी आहे. त्यांच अस म्हणणं आहे की आमच्या योजनेप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पात्र मुलाने अर्ज केला तरी तो खर्च ६,००,००,००,००० इतका आहे. आत्ता ते म्हणले वरच्या संख्येला खालच्या संख्येने भागा. आम्ही म्हणलं तूम्हीच भागा. मग भागाकार केला. त्याला १०० ने गुणलं आणि टक्केवारी आली. 

२.९५ टक्के. 

या योजनेसाठी आवश्यक असणारी रक्कम ही सध्याच्या महसूली तुटीच्या २.९५ टक्के इतकी आहे. आत्ता एकूण हिशोबात रक्कम खूपच मोठ्ठी वाटते पण टक्केवारी. महसुली तूट शंभर असेल तर फक्त तीन रूपये या योजनेसाठी खर्च होतील अस कॉंग्रेसच्या युवकांच म्हणणं आहे. 

आत्ता दूसरा महत्वाचा मुद्दा होता, चला मान्य करु की महसूली तुटीच्या ३ टक्केच पैसे आवश्यक असणार आहेत पण हा पात्र तरुणांना लागणारा ६,००,००,००,००० इतका खर्चाचा आकडा कसा काढला. 

त्यासाठी आधार आहे CMIE आणि लेबर फोर्स पार्टीसिपेशन सर्व्हेचा रिपोर्ट. त्यानुसार पदवी झाल्यानंतर नोकरी न मिळणाऱ्या विद्यार्थांची महाराष्ट्रातील आकडेवारी अंदाजे २० लाख इतकी आहे. असे तरुण या योजनेसाठी पात्र ठरवायचं अस युथ कॉंग्रेसच म्हणणं आहे. 

यासाठी पात्र मुलं कशी ठरवावीत.

तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणतायत ही योजना पदवी घेतली की जोपर्यन्त त्याला नोकरी मिळत नाही अशा मुलांसाठी मधल्या काळासाठी असेल. म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडला आणि नोकरीच मिळत नाही तर अशी मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतील. त्यातही कुटूंबाचा आर्थिक निकष, उत्पन्नाची अन्य स्त्रोत याची रितसर माहिती करूनच या योजनेचा लाभ तरुणांना मिळेल.

युवक कॉंग्रेसचे सत्यजित तांबे यांच अस म्हणणं आहे की,

प्रत्येक क्षेत्रासाठी कोणतं ना कोणतं पॅकेज जाहीर केलं जातं. पण तरुणांचा इतका मोठ्ठा बेरोजगारीचा आकडा असताना त्याकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष केल जात आहे. म्हणूनच आम्ही तरूणांसाठी हे पाऊल उचललं आहे. 

आत्ता याचा फायदा मतांसाठी किती होईल हे सांगता येणं अवघड आहे पण तरुणांच्या प्रश्नांकडे कोणीतरी लक्ष देत आहे ही सकारात्मक गोष्ट आहे हे मात्र नक्की. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.