एकेकाळी युट्यूबवरून ट्रेनिंग घेत पठ्ठयाने आज सुवर्णपदकाला गवसणी घातलीय…

फायनली, टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतानं पहिलं गोल्ड मेडल आपल्या नावावर केलंय. जॅवलीन थ्रो अर्थात भाला भेकीत नीरज चोप्रानं हे मेडल जिंकून इतिहास रचलाय. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलय.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालंय.

टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासूनच टीव्हीसमोर बसलेला प्रत्येक भारतीय गोल्डच्या आशेत होता. प्रत्येक क्रीडाप्रकारात आपल्या खेळाडूंनी गोल्डसाठी प्रयत्न केले, मात्र आपल्याला सिल्वर आणि ब्रॉन्झवरचं समाधान मानावं लागलं होत. मात्र अखेर आज स्वप्नपूर्ती झाल्यासारखं म्हणायला काही हरकत नाही.

आणि हे शक्य झालं केवळ नीरज चोप्रामुळे.

हरियाणाच्या पानिपत येथून आलेला २३ वर्षाचा नीरज हा शेतकरी कुटुंबातला. भाला फेक आणि त्याचा दूर-दूरचा संबंध नव्हता, जेव्हा त्यानं या खेळाशी स्वतःला जोडून घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्याच्या कुटुंबाला तर या खेळाचं नावही माहित नव्हतं.

लहानपणी नीरजचं वजन खूप जास्त होत. त्याच्या वाढत्या वजनामुळे वैतागलेल्या कुटुंबानं त्याला जिममध्ये पाठवायला सुरुवात केली. पण आपल्या भिडूकडून जिम काही झाली नाही. शेवटी घरच्यांनी नीरजला फिट ठेवण्यासाठी स्टेडियममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.

आता हरियाणाची ‘सैनिक आणि ऍथलिट’ हि ओळख देशात फिट झालीय, आणि या ओळखीचा प्रभाव भल्या-भल्याना आपल्या वाटा बदलायला भाग पाडतो. त्यात नीरज देखील होता. याच स्टेडियमवर एकदा वॉक करत असताना त्याने काही ऍथलेट्सला भाला फेकताना पाहिलं. त्यानंतर त्याने स्वतः भाला उचलला.

पहिल्यांदा भाला फेकला तेव्हाचं त्याला वाटलं की, हा खेळ त्याच्यासाठी आहे आणि इथूनच त्यानं पुढे जाण्याचा विचार सुरू केला.

आता विचार तर केला पण हा मार्ग काय सोपा नव्हता. कारण १७ जणांचं भलं मोठं कुटुंब ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नव्हती. अशा परीस्थितीत नीरजला दीड लाख रुपयांचा भाला मिळणं अवघड होत. पण आपल्या पोराचं मन राखण्यासाठी कुटुंबानं ७ हजार रुपये जोडून एक स्वस्त भाला घेऊन दिला.

भाला स्वस्त का असेना पण नीरजनं यालाच आपले मुख्य शस्त्र मानले आणि दररोज सात-आठ तास सराव सुरू करायला सुरुवात केली.

आता घरच्यांनी भालाचं कसाबसा घेऊन दिला होता, त्यामुळे कुठं कोचिंग लावणं शक्यच नव्हतं. पण त्यानं काय हार मानली नाही. त्यानं यासाठी युट्यूबची मदत घेतली आणि व्हिडिओ बघत ट्रेनिंग सुरु केली. नीरज चमकू लागला होता, त्याला भालाफेकमध्ये गती येतं होती. आपलं करिअर काय असतं हे फिक्स करण्यासाठी त्याला एवढी गती पुरेशी होती.

१३ व्या वर्षी नीरजने स्टेट लेवल ज्युनिअर चॅम्पियनशिप आणि ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकले. २०१४ या वर्षापर्यंत भारताच्या ऍथलेटिक्स क्षेत्रात नीरज नावाचं वादळ स्थिरावलं होतं. पण अजून जग जिंकणं बाकी होतं. ते जिंकण्याचा पहिला मुहूर्त आला २०१६ मध्ये. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप पोलंडमध्ये होणार होती.

नीरज पोलंडमध्ये दाखल झाला, त्याने त्या स्पर्धेत तब्बल ८६.४८ मीटर्सचा भाला फेकला. आणि याच सोबत बनला नॅशनल रेकॉर्ड नाही तर वर्ल्ड रेकॉर्ड. नीरजच्या आधी ज्युनिअर लेव्हलवर इतक्या लांब पर्यंत भाला कोणीच फेकला नव्हता. आजतागायत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेलं नाही.

त्यानंतर २०१६ मध्ये नीरजची आर्मीमध्ये एंट्री झाली. २०१६ मध्ये वर्ल्ड चॅम्पिंयनशिप जिंकल्यानंतर नीरजला ज्युनिअर कमिशंड ऑफिसर बनवून नायब सूभेदारची पदवी देण्यात आली.

मात्र या वर्ल्ड रेकॉर्ड नंतर देखील नीरजला २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळता आलं नव्हतं. कारण रियोसाठी क्वॉलिफाई करण्याची कट ऑफ डेट ११ जुलै होती, आणि नीरजने हा रेकॉर्ड २३ जुलै रोजी केला होता.

मात्र त्यानंतर हार न मानता ज्युनिअर लेव्हलवर धमाका करणाऱ्या नीरजने सिनिअर लेव्हलला खेळायला सुरुवात केली. इथं त्याने एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले.

दरम्यान,  २०१९ हे वर्ष दुखापतीमुळे नीरज चोप्रासाठी खूप कठीण गेले. मात्र जेव्हा त्याने तंदुरुस्त होऊन मैदानात पाय ठेवलं तेव्हा त्याने जानेवारी २०२० मध्ये ८७.८६ मीटर्सचा भाला फेकत ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. दक्षिण आफ्रिकामधील या स्पर्धेत त्याचा थ्रो भारताच्या नॅशनल रेकॉर्डच्या बराच जवळ होता.

(भारताचा नॅशनल रेकॉर्ड ८८.०७ मीटर्सचा आहे, जो नीरजनेच २०१८ मध्ये जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये त्यानेच केला होता.)

मागच्या वर्षी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवल्यानंतर कोरोनामुळे स्पर्धा लांबणीवर पडली पण यावर्षी ही स्पर्धा झाली, आणि झाली तेव्हा ती नीरजने कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी कामगिरी करून दाखवली आहे. एकूणच एकेकाळी युट्युबवरून ट्रेनिंग घेऊन आज सुवर्णपदकाला घातलेली गवसणी हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.