YSR यांच्या मुलांमध्ये भांडणे सुरु आहेत कि त्यामागे वेगळं राजकारण आहे?

काल तेलंगणा मध्ये वायएस शर्मिला यांनी राजन्ना राज्यम या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांची ओळख सांगायची झाली तर त्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वाय एस आर रेड्डी यांच्या कन्या आहेत आणि आंध्र चे सध्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या धाकट्या भगिनी आहेत.

खरं तर स्थानिक पातळीवर असे अनेक नवीन पक्ष निर्माण होत असतात. पण या एका प्रादेशिक पक्षामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. शर्मिला यांचा भाऊ राजकारणात आहे, त्याचा स्वतःचा पक्ष आहे तरी त्यांनी वेगळा पक्ष का काढला ? भावा बहिणींमध्ये काही वाद आहेत का असे अनेक प्रश्न सध्या मीडियाला पडलेत.

नेमकं काय आहे प्रकरण ? 

वाय एस राजशेखर रेड्डी म्हणजे काँग्रेसचा शेवटचा लोकनेता. आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी काढलेल्या पदयात्रांनी काँग्रेस पक्षाला नवीन संजीवनी दिली. कॉम्प्युटर वाल्या चंद्राबाबूंची सत्ता घालवून ते मुख्यमंत्री बनले. फक्त मुख्यमंत्री बनले नाहीत तर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी आंध्र प्रदेशमधून त्यांनी पुरवलेली रसद डॉ.मनमोहन सिंग यांचं सरकार स्थापन होण्यास कारणीभूत ठरली.

त्याच वर्षी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आणि आंध्रप्रदेशमधल्या लाखो करोडो तेलगु जनतेला धक्का बसला होता. असं म्हणतात की या धक्क्यात अनेकांनी आत्महत्या केली. पण सर्वात मोठ्ठ नुकसान कॉंग्रेस पक्षाचे झाले होते.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यावे हा प्रश्न सोनिया गांधी यांच्या दरबारात मांडला गेला. वायएसआर यांचे खासदार चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांनी आपला दावा सांगितला. पण सोनियाजींच्या सल्लागारांनी त्यांना सल्ला दिला की जगनमोहन अजून अननुभवी आहेत त्यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे पक्षावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावर शिक्कामोर्तब करणे. त्यामुळे के.रोसय्या यांना खुर्चीवर बसवण्यात आले. जगनमोहन रेड्डी यांनी ही गोष्ट पर्सनली घेतली. लाखो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडला. वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.

ही आंध्रप्रदेश मध्ये कॉंग्रेसने केलेली आत्महत्या होती.

तिथून पुढे आंध्र साठी सोनिया गांधींनी घेतलेले सगळे निर्णय चुकत गेले आणि पक्षाचा जनाधार घटत गेला. याच दबावातून त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या चंद्रशेखर राव यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आंध्रप्रदेशचे विभाजन केले. पण या खेळीतही कॉंग्रेस फसली. हातातून तेलंगणाही गेले आणि आंध्रप्रदेशही गेले. चंद्रशेखर राव यांनी वचन दिल्याप्रमाणे आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला नाही.

अशा रीतीने काँग्रेस आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात संपून गेली.

तिकडे जगनमोहन रेड्डी यांनी वडिलांप्रमाणे शेतकऱ्यांशी आपलं नातं घट्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्याप्रमाणेच पदयात्रा काढल्या गोरगरीब जनतेमध्ये आपला मुलगा अशी प्रतिमा बनवली. याचाच परिणाम आंध्र प्रदेश मध्ये त्यांनी समोर चंद्राबाबू यांच्या सारखा  दिग्गज नेता असताना मोदी लाट, काँग्रेस अशा अनेकांचा सामना करत एक हाती सत्ता स्थापन केली.

आज जगनमोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशचे अनभिषिक्त सम्राट बनले आहेत. तिथे त्यांच्या विरोधात विरोधी पक्ष नावाला देखील अस्तित्वात नाहीत.

पण इतके असूनही त्यांना एक खंत सतावत असते. ती खंत म्हणजे तेलंगणा..

वायएसआर रेड्डी हे आंध्रप्रदेशच्या विभाजनाच्या विरोधात होते. ते जिवंत होते तेव्हा तेलंगणा निर्मितीचा विषय काढायचं देखील कोणाचं धाडस नव्हतं. वायएसआर यांच्या मृत्यूनंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गडबडीत काँग्रेसने हा निर्णय घेतला आणि त्यात तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची अवस्था झाली.

पण जगनमोहन रेड्डी यांनी तेलंगणाच्या निर्मितीपासून इतकी वर्ष या तिथल्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. २०१८ सालच्या तेलंगणामधल्या विधानसभा निवडणुका आणि २०१९च्या लोकसभा निवडणुका YSR काँग्रेसने लढवल्या नाहीत .

पण अखेर आज त्यांची धाकटी बहीण तेलंगणाच्या राजकीय आखाड्यात उतरली व त्यांनी वडिलांच्या नावावरून राजण्णा राज्यम नावाचा पक्ष स्थापन केला.

वाय एस शर्मिला या राजशेखर रेड्डी यांची धाकटी कन्या. जेव्हा वायएस आर यांच्या मृत्यूनंतर जगनमोहन रेड्डी यांचे पंख कापण्यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुरुंगात टाकलं तेव्हा आई विजयाम्मा यांच्या बरोबर शर्मिला यांनी राजकारणात उडी घेतली. भावाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी ३००० किलोमीटरची पदयात्रा काढली होती.

वायएसआर काँग्रेसच्या स्थापनेत त्या पक्षाच्या आजच्या यशा मध्ये जगनमोहन रेड्डी यांच्याबरोबर शर्मिला यांचा देखील तितकाच मोठा वाटा आहे. 

पण अचानक त्या तेलंगणाच्या राजकारणात उतरल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय.  शर्मिला यांच्या पक्षाच्या पोस्टरवर, त्यांच्या कार्यक्रमात घोषणेत कुठेही जगनमोहन रेड्डी यांचं नाव नाही. त्या मागे त्यांच्यातील सुप्त सत्ता संघर्ष असण्याची देखील शक्यता बोलून दाखवली जातीय.

पण दोघांच्याकडूनही याबद्दल इन्कार करण्यात आलाय. जगनमोहन यांच्या YSR काँग्रेस तर्फे स्पष्टीकरण देण्यात आलंय की,

“रेड्डी भावा बहिणीमध्ये कोणताही वाद नाही. जगनमोहन रेड्डी यांचे तेलंगणाच्या राजकारणात हस्तक्षेप करायचं नाही असे धोरण असल्यामुळे आमचा पक्ष तेथील निवडणुकीपासून दूर आहे. पण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शर्मिला तिथे गेल्या आहेत आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलाय.”

अनेकांचे तर मत आहे कि बहिणीचा वापर करून जगनमोहन रेड्डी तेलंगणात आपले पाणी जोखून पाहत आहेत. 

शर्मिला यांच्या तेलंगणाच्या प्रवेशामुळे अनेक गणिते बदलताणना दिसत आहेत. त्यांनी वायएसआर यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना संपर्क करून आपले नेटवर्क उभे करण्यास सुरवात केली आहे. जातीचे राजकारण ध्यानात घेऊन त्यांनी आपल्या नावात देखील बदल करून वाय.एस.शर्मिला रेड्डी असे नवे नामकरण देखील केले आहे.

राजण्णा यांच्या स्वप्नातील राज्य कुठाय अशी विचारणा करत शर्मिला यांनी तेलंगणाच्या जनतेच्या भावनेला हात घातलाय.

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तिथले मुख्यमंत्री चन्द्रशेखर राव यांनी शर्मिलाच्या राजकारण एंट्रीला विशेष महत्व दिले नसले तरी त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभारत असलेला भाजप मात्र यामुळे हादरून गेलाय. राज्य वेगळं झालं तरी तेलंगणाच्या ग्रामीण जनतेमध्ये आज देखील राजशेखर रेड्डी यांच्याबद्दल आपुलकी निश्चित आहे. आपल्या राजण्णाची लेक म्हणून ते शर्मिलाला जर मतदान करू लागले तर राव यांच्या विरोधाचा स्पेस भरून काढण्याचं भाजपचं  स्वप्न हवेत विरून जाईल की याची अमित शहा यांना भिती आहे.

बाकी काही का असेना आंध्रप्रदेश तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच एक महिला पक्ष स्थापन करून स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वडिलांच्या आणि भावाच्या छायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय हि निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.