महापूर असो की कोरोना भारतावर कोसळणाऱ्या प्रत्येक संकटात हा माणूस धावून येतो.

युसुफ अली एम.ए. कधी ऐकला आहे का नाव ?

आजच्या युगात छोटीशी मदत जरी कोणाला केली तरी त्याच्या बद्दल सोशल मिडिया वर हवा करायची काही जणांना सवय आहे. अशा वेळी एक माणूस गेली तीस वर्षे देशाच्या प्रत्येक आपत्तीवेळी मदतीला पुढे येतोय पण आपण कधी त्याच नांव ही ऐकलेलं नाही. 

युसुफ अली यांना स्वतःच्या पब्लिसिटीची आवड नसावी आणि त्याची त्यांना गरज ही नाही. म्हणूनच कोरोनाच्या काळात त्यांनी भारतात ३५ कोटींचे दान देऊन ही कोणाला त्यांचे नाव माहित नाही.

PM care फ़ंडला त्यांनी २५ कोटी रुपये दिले आहेत तर मातृभूमी केरळला १० कोटींची मदत दिली आहे.  

मुळचे मल्याळी असलेले युसुफ अली हे १९७३ साली आपल्या काकांना त्यांच्या इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या धंद्यात मदत करायला अबू धाबीला गेले आणि तिथेच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली. १९९० साली त्यांनी त्यांच्या लुलू ग्रुपचे पहिले हायपर मार्केट सुरु केले. 

पुढे जाऊन फक्त अबू धाबी नव्हेच तर अख्या संयुक्त अरब अमिरातीचा रिटेल किंग म्हणून त्यांना ओळखलं जावू लागलं. दुबई सारख्या जगभरात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरात एक भारतीय माणूस रिटेल मार्केटवर राज्य करतोय ही अविश्वसनीय गोष्ट होती. 

आज त्यांचा व्यवसाय फक्त मध्य पूर्व आशिया मध्येच नाही तर चीन पासून आफ्रिका खंडातील केनिया पर्यंत तो पसरला आहे.

जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत युसुफ अलीचे नांव आहे. 

पैसा आला की माणूस आपल्या घरच्यांना विसरतो म्हणतात पण युसुफ अली यांनी तसे होऊ दिले नाही. युसुफ अली हे कधीच आपल्या मातीला विसरले नाहीत. आज त्यांच्या कंपनी मध्ये चाळीस हजार भारतीय काम करत आहेत. कोच्ची मध्ये भारतातला सगळ्यात मोठा मॉल लुलू ग्रुपने उभारला आहे. कोचीच्या विमानतळ उभारणी मध्येही त्यांचा सहभाग आहे. UAE च्या सुलतानाशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत त्यामुळे भारताच्या तिथल्या परराष्ट्र धोरणात त्यांचा सहभाग असतो. 

31king

अनिवासी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न भारत सरकार पर्यंत पोहचवण्याच काम त्यांनी केलेलं आहे. आज केरळ च्या महापुरावेळी त्यांनी स्वतः साडे नऊ कोटींची मदत तर  केलीच पण मध्य पूर्व मधून मोठी रक्कम मदतकार्यासाठी ते उभारत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे कार्य फक्त आपल्या जन्मभूमी केरळ पुरते मर्यादित नाही. भारतात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या दुर्घटने च्या वेळी त्यांनी मोठी रक्कम मदतकार्याला दिलेली आहे.  

मग ते १९९३ चे महाराष्ट्रातील लातूर किल्लारीचे भूकंप असो अथवा २००१ साली झालेला गुजरातच्या भूज मधला भीषण भूकंप असो ते प्रयेक वेळी मदत घेऊन पुढे आले. 

तमिळनाडूच्या किनाऱ्यावर आलेल्या सुनामी वेळी आणि २०१३ च्या उत्तराखंड च्या प्रलयंकारी महापूर वेळी सुद्धा ते मदत करायला अग्रभागी होते.

२ वर्षांपूर्वी केरळच्या महापुरावेळी मदत करताना काही जणांचे जातीयवादी रूप समोर आले. नैसर्गिक संकटाला काही लोकांनी धर्माशी जोडले. काही जणांनी त्यातून राजकीय हिशोब चुकते करायचा प्रयत्न केला. काही संघटना आपले जुने मदतकार्याचे फोटो केरळ च्या मदतीचे म्हणून पसरवले. सेलीब्रेटीनी आपण केलेल्या मदतीचा इवेंट केला. 

यात आपण तरी कुठे मागे होतो. आपण सुद्धा केलेल्या छोट्या मोठ्या मदतीचे स्क्रीनशॉट स्टेट्स म्हणून ठेवलेच ना?

देशावर येणारी कोणतीही आपत्ती असो अशा वेळी आपण आपल्या जात धर्म प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवल्या पाहिजेत. हेच तर खरे भारतीयत्व आहे. आणि युसुफ अली सारखी माणसे याच भारतीयत्वाचे खरे शिलेदार आहेत त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांना २००५ साली प्रवासी भारतीय पुरस्कार तर २००९ साली पद्मश्री सन्मान दिला.

 हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Santosh sukhdeo surywanshi says

    Its really good nformation &we are really proud of on mr.Yusuf Ali. He is a ideal person for evry youngstur. Evrey politician get idea from him that social work is how to done without any publicity

Leave A Reply

Your email address will not be published.