युवराजने फक्त धोनीलाच नाही तर कैफलाही वर्ल्डकप जिंकून दिला होता..

युवराज खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा युवराज होता. त्याची बिनधास्त स्टाईल, त्याचे सिक्सर, चित्त्यासारखी फिल्डिंग, मैदानात आणि मैदानाबाहेर स्वॅगवाला ऍटिट्यूड, याचे करोडो लोक फॅन होते. सर्वात महत्वाचं म्हणजे २०११ साली कॅन्सरसारखा दुर्दम्य रोग असूनही तो देशासाठी मैदानात उतरला. जबरदस्त कामगिरी करत तब्बल २८ वर्षांनी देशाला वनडे वर्ल्डकप जिंकून दिला.

२०११ चा वर्ल्ड कप कप्तान म्हणून धोनीने उचलला पण या वर्ल्डकपचा खरा हिरो मॅन ऑफ दी सिरीज युवी होता. धोनीने जिंकलेल्या २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील युवीने इंग्लंडला ठोकलेले सलग ६ सिक्सर गाजले. त्याने जिंकून दिलेली क्वार्टर फायनल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची सेमीफायनल त्या वर्ल्डकपचे टर्निंग पॉईंट ठरले.

आजही धोनीला मान्य करावे लागेल की त्याने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगचा सिंहाचा वाटा होता.

पण धोनीचं नाही तर मोहम्मद कैफला देखील युवराजने वर्ल्ड कप जिंकून दिला होता. गोष्ट आहे २००० सालची.

युवराज सिंग हा भारताचे माजी स्पिनर योगराज सिंग यांचा मुलगा. पंजाब क्रिकेटमध्ये योगराज सिंग यांचा दबदबा होता. त्यांच्यामुळेच युवी अगदी लहानपणापासून क्रिकेट ग्राउंडवर उतरला. चंदीगडच्या कपिलदेव क्रिकेट अकँडमीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले. स्कुल क्रिकेट गाजवलं.

अवघ्या तेराव्या वर्षी त्याची पंजाबच्या अंडर १६ टीमसाठी सिलेक्ट झाला. तिथून त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. डावखुरा युवराज ऑलराऊंडर होता. वडिलांच्या प्रमाणे त्याची स्पिन बॉलिंगवर पकड तर होतीच पण वरच्या फळीत जाऊन धडाकेबाज बॅटिंग करण्याची क्षमता देखील होती.

फक्त सोळा वर्षांचा असताना त्याची पंजाबच्या रणजी टीममध्ये निवड झाली. कुचबिहार ट्रॉफीमध्ये एका सामन्यात विरुद्ध टीमने ३५७ धावा केल्या होत्या तर याचं उत्तर देताना युवीने एकट्याने ३५८ धावा ठोकल्या.

युवराज सिंग हे नाव राष्ट्रीयपातळीवर झळकू लागलं. देशाच्या अंडर१९ टीममध्ये त्याला स्थान मिळालं. उत्तर प्रदेशचा बॅट्समन मोहम्मद कैफ या टीमचा कॅप्टन होता तर कोच म्हणून रॉजर बिन्नी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. 

जानेवारी २०००मध्ये ही भारताची अंडर१९ टीम वर्ल्डकपसाठी श्रीलंकेला गेली. तेव्हा या टीममध्ये युवराज आणि कैफ बरोबर रितींदरसिंग सोढी, वेणुगोपाल राव, अजय रात्रा, मनीष शर्मा हे खेळाडू होते.

फक्त भारतातीलच नाही तर बाकीच्या टीममध्ये देखील पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव गाजवलेले खेळाडू होते. यात ऑस्ट्रलियाचा कॅप्टन मायकल क्लार्क होता तर टीममध्ये शेन वॉट्सन, मिशेल जॉन्सन,शॉन मार्श हे होते. न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅकलम, पाकिस्तान मध्ये मोहम्मद शमी, शोएब मलिक, इम्रान फरहात, आफ्रिकेच्या टीम मध्ये ग्रॅहम स्मिथ, जोनाथन ट्रॉट, इंग्लंडचा इयान बेल असे कित्येक टॅलेंटेड खेळाडू या वर्ल्डकप मध्ये उतरले होते.

अंडर १९ चा हा तिसरा वर्ल्डकप होता. या सिरीजकडे सगळे देश आता सिरियसली पाहत होते.

सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप मॅचमध्ये युवराज सिंग पहिल्यांदा चमकला. त्याने तडाखेबंद ६८ धावा ठोकल्या. शिवाय याच मॅचमध्ये ४ विकेट्स देखील पटकावल्या. बलाढ्य न्यूझीलंडला हरवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला. या मॅचचा युवी सामनावीर ठरला.

पुढे अख्खी सिरीज त्याने गाजवली.

ऑस्ट्रलिया विरुद्धच्या सेमीफायनल मध्ये तर युवराजने फक्त २५ बोल मध्ये ५८ धाव तडकवल्या. त्याकाळी देखील मिचेल जॉन्सन आणि शेन वॉट्सनच्या बॉलिंगची त्याने पिसे काढली होती. त्याने मारलेले पाच चौकार आणि पाच षटकार हा पुढे जाऊन मोठा प्लेयर होणार आहे हे दाखवत होते.

फायनल यजमान श्रीलंका आणि भारतात झाली. लो स्कोरिंग झालेल्या या सामन्यात लंकेने पहिली बॅटिंग करत १७८ धावा बनवल्या होत्या. हा स्कोर भारताने सहज पार केला. युवराजने महत्वपूर्ण २७ धावा केल्या. ३९ रन्स काढणारा रीतींदरसिंग सोढी फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला.

तर संपूर्ण सिरीजमध्ये २०३ धावा बनवणाऱ्या आणि १२ विकेट घेणाऱ्या युवराजला मालिकावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.  

१९८३ नंतर थेट १७ वर्षांनी २००० साली भारताने वर्ल्डकप जिंकला होता. कपिल देव नंतर मोहम्मद कैफने ही किमया साधली होती. भारताच्या क्रिकेटिंग इतिहासात हि महत्वाची सिरीज ठरली.  

f088d 15748480932524 800

कैफचे कल्पक नेतृत्व आणि युवराजचं ऑल राउंड परफॉर्मन्स मीडिया मधून संपूर्ण देशभर गाजत राहिलं. दोघांची फिल्डिंग देखील जबरदस्त होती. गली आणि कव्हर्समध्ये उभे असलेले हे दोघे समोरच्या टीमच्या चाळीस पन्नास धावा तर सहज कमी करत होते. बॅटिंगला देखील तीन चार नम्बर वर येणाऱ्या कैफ आणि युवराजची दोस्ती पुढे आयुष्यभरासाठी जमली.

वरिष्ठ टीमचे देखील या वर्ल्डकपकडे लक्ष होते. विशेषतः कप्तान गांगुलीचं. वर्ल्डकप गाजवणारे युवराज आणि कैफ यांना राष्ट्रीय टीममध्ये आणण्यासाठी त्याने सगळं वजन खर्च केलं. पुढच्या काही महिन्यातच युवि आणि कैफ टीम इंडियाच्या ब्ल्यू जर्सी मध्ये दिसू लागले.

इथून पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

२००२ ची नॅटवेस्ट सिरीज असू दे किंवा पुढे येणाऱ्या महत्वाच्या सिरीज असू दे युवी खेळलाय आणि आपण हरलो असं कधी घडलंच नाही. यशाचं क्रेडिट घेणारे अनेक होते पण देशासाठी खेळताना याचा विचार युवराजने कधी केला नाही.

असा हा यारोंका यार दिलदार युवराज सिंग. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीची आकडेवारी काढली तर भले इतर काही खेळाडूंपेक्षाही कमी वाटेल. त्याच्या पेक्षा जास्त धाव काढणारे, चांगले अव्हरेज असणारे अनके खेळाडू असतील मात्र त्याच्यासारखा मॅच विनर वनडे मध्ये तरी भारताने कधी पाहिला नाही.

युवी चालला तर वर्ल्ड कप आपला, युवी फेल गेला तर वर्ल्ड कप सुद्धा फेल हे गेल्या वीस वर्षात उभ्या देशाने पाहिलंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.