सचिन, गांगुलीनंतर ज्याचं पोस्टर घराच्या भिंतीवर लावावसं वाटलं, तो म्हणजे युवराज सिंग

लहानपणी घरातले खर्चायला पाच-दहा रुपये द्यायचे. बरं त्यांनी दिले नाहीत, तर उरलेल्या सुट्ट्या पैशातून हर्षद मेहता कसं व्हायचं हे आपल्याला पद्धतशीर जमायचं. त्या साठलेल्या पैशातून स्वतःचा एकच नाद पूर्ण केला. क्रिकेटर लोकांची पोस्टर आणि स्टिकर गोळा करणं. कंपास पेटीला, परीक्षेच्या पॅडला, कपाटाला सगळीकडे स्टिकर असणार म्हणजे असणार.

घरातल्या भिंतींचे जिथं जिथं पोपडे निघालेले, तिथं तिथं सचिन आणि गांगुलीनं रितेपण भरुन काढलेलं. अगदी भारताच्या संघासारखं. सचिनचं तर एक मोठ्ठ पोस्टर पण होतं, सकाळी देवाच्या पाया पडून झालं की निघताना त्याच्या फोटोला एका बोटाचा नमस्कार व्हायचाच. सकाळ सकाळ गांगुलीचं आरशाजवळचं पोस्टर पाहून शाळेला निघालो, की शर्ट अजिबात इन करायचा नाही. कारण एक जण देव होता, तर एक जण दादा.

बरं घराच्या भिंतीवर हिरॉईनी लावल्या नव्हत्या, त्यामुळं घरचे पण खवळायचे नाहीत. पुढं टीम इंडियाचे बदलले, तसे घराचेही दिवस बदलले. आता भिंतींचा रंग उडालेला नव्हता, पण फोटो लावायची जागा एकच होती. ते दिवस मिशा फुटण्याचे, पटकन हळवे होण्याचे आणि काहीच कारण नसताना डोक्यात माज असण्याचे होते. दादा आणि सचिन तर आवडायचेच, पण नव्या घरात नवं पोस्टर लावायचं ठरलं.

लय विचार करावा लागला नाही, कारण तेव्हाच्या टीममधला राजकुमार एकच होता- युवराज सिंग.

गोरापान चेहरा, पंजाबी घराला सूट होईल अशी तब्येत आणि चेहऱ्यावर नादर ॲटीट्युड. डोक्यावर अडकवलेला गॉगल कुणाला शोभून दिसत असेल तर युवराजलाच.

कसली बाप बॅटिंग करायचा ओ युवराज. म्हणजे बघा काय, नॅटवेस्ट २००२ सिरीजची फायनल. ते फ्लिंटॉफ आपल्या मुंबईत येऊन माज करुन जातंय आणि आपण त्यांच्या इंग्लंडमध्ये हरणार म्हणजे इज्जत गेल्यात जमा की ओ. त्यात सचिन आऊट झाल्यावर तर लोकं टीव्ही बंद करुन झोपली पण. युवराज कैफला फिक्स म्हणला असणार, ‘स्वतःसाठी नाय पण देशासाठी आणि गांगुलीसाठी आपल्याला जिंकायचंय.’ भले युवराज अर्ध्यातनं आऊट झाला. पण विजयाची ठिणगी त्यानीच पेटवली होती.

सचिन, सेहवाग, दादा, द्रविड- पत्त्यांच्या कॅटमधले चारही एक्के आपल्याकडं होते. झहीर, नेहरा, कुंबळे, भज्जी म्हणजे बॉलिंगचा प्रश्नही मिटला. मध्ये मात्र आपला राडा व्हायचा. आपली मिडल ऑर्डर सुरु कधी व्हायची आणि संपायची कधी हेच कळायचं नाही. मग आला युवराज. हळू खेळायला सांगा किंवा पहिल्या बॉलपासून हाणायला, दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट करणार. भारतासमोर खेळणाऱ्या टीमला टेन्शनमध्ये आलेलं बघण्यात येणारी मजा सचिननंतर कुणी दिली, तर युवीनं. जोवर युवी आहे, तोवर भारताचा पिक्चर पडत नाय याची गॅरंटी असायची.

लेफ्टी बॅटिंग किती सुंदर असती, हे सुद्धा त्यानंच दाखवून दिलं.

फास्ट बॉलर असले, भारी स्पिनर असले, तरी टीममध्ये भारी ऑलराऊंडर असण्यासारखं सुख नाय. युवराज दहा ओव्हर्स टाकायचा, वर रन्स पण एकदम कंजुषीनं द्यायचा आणि युवराज बॉलिंगला आलाय म्हणल्यावर एकतरी विकेट घेऊन जाणार म्हणजे जाणार. बॉलिंग टाकायची पद्धत पण काय लय अवघड नव्हती, निवांत चालत यायचा आणि बाजार उठवून जायचा. त्याच्या बॉलिंगमुळं तर आपण वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकलेलो.

भारताच्या फिल्डिंगकडे तेव्हा लोकं सिरीयसली बघायची नाहीत. हे चित्र कुणी बदललं तर युवराजनं. चित्ता, वाघ, सिंह हे प्राणी कसे दबा धरुन बसतात… अगदी सेम पॉईंटला उभा राहिलेला युवराज. रुसलेल्या बायकोला मनवणं सोपं, पण युवराजच्या पंज्यातून बॉल मारायचा म्हणजे बॅटर दहा वेळा विचार करणार.

अँग्री यंग मॅन म्हणलं की जसा बच्चन आठवतोय, तसा गांगुली पण. लॉर्ड्सच्या स्टेडियममध्ये बसून इंग्लंडच्या प्लेअर्सला फ च्या भाषेत शिव्या घालण्याचा जाहीर दम दादामध्येच होता. युवराजनं दादाकडून जसे बॅटिंगचे धडे घेतले, तसेच समोरच्याला नडायचेही.

युवराज आणि खुन्नस हे दोन शब्द ऐकले की मन डायरेक्ट २००७ मध्ये जातं. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये युवराजला डिवचलं फ्लिंटॉफनी. फटके पडले स्टुअर्ट ब्रॉडला. ते सहा बॉल, सहा सिक्स आणि त्याला आपल्या रव्या शास्त्रीनं चढवलेला साज. त्या दिवशी लय लोकांनी घरात मोठ्या आवाजात फ्लिंटॉफला शिव्या द्यायला मागंपुढं पाहिलं नसणार. एखादा पैलवान गडी तिकडं मैदानात असता, तर फ्लिंटॉफला अस्मानबी दाखवून आला असता. आमच्या युवराजला नडतो म्हणजे काय?

मरायच्या आधी आयुष्यात काय करायचं असल, तर जसं युवराजनं सहा सिक्सनंतर फ्लिंटॉफकडं पाहिलं असणार, तसं सोडून गेलेल्या प्रेमाकडं बघायचंय. एकदाच. फक्त साला युवराजसारखं कायतर करुन.

आपल्या भारताला अंडर-१९ चा वर्ल्डकप, मग २००७ चा टी-२० वर्ल्डकप आणि सगळ्यात गोल्डन मोमेन्ट म्हणजे २०११ चा वर्ल्डकप जिंकून दिले युवराजनं. आता आधीचे दोन वर्ल्डकप म्हणले की चेहऱ्यावर हसू येतं. पण २०११ चा वर्ल्डकप आणि युवराजचं नाव घेतलं की समोरचं अंधुक दिसतं शेठ.

त्याच्या आयुष्यातली ती काय शेवटची संधी नव्हती, २०११ ला नाय तर २०१५ ला जिंकलो असतो की. पण नाय, स्वतःला कॅन्सर झालाय, रक्ताच्या उलट्या होतायत, तरी युवराज खेळला. बरं रडत-खडत आणि दमत नाय, तर लय जिगर लाऊन खेळला. ऑस्ट्रेलियाला बाऊंड्री मारुन हरवल्यावर, तो गुडघ्यावर बसून जेव्हा ओरडला… तेव्हा का माहित का पण लय रडायला आलं. त्या बाऊंड्रीनंतर आमच्या आजीनं युवराजच्या पोस्टरची नजर काढलेली, अजून पण आठवतंय.

वर्ल्डकप जिंकण्याचा क्षण तर कुणीच विसरू शकत नाय. युवराज भर मैदानात रडत होता आणि आपल्या सगळ्यांच्या छात्या फुगल्या होत्या. जिंदगीत तेव्हा फक्त ती त्याची काळं-पिवळं स्टिकर असणारी बॅट हवी होती, बास.

क्रिकेटर लोकं लय गोष्टी शिकवतात, युवराजनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवली. जिंदगीत किती पण मोठा शॉट होऊद्या, मैदान सोडायचं नाय. जोवर ताकद आहे तोवर भिडायचं आणि स्वतःची ताकद संपली की विषय सोडूनही द्यायचा, कारण… जबतक बल्ला चल रहा है, तबतक थाट है…

एकदा बोलता बोलता बारक्या पुतण्यानं विचारलेलं, सचिनला भेटलास तर काय करशील? म्हणलं नमस्कार! द्रविडला भेटलास तर, म्हणलं फोटो काढेन! पुढचा प्रश्न धोनी किंवा विराटवर येईल असं वाटलेलं… पण तो आला…

युवराज सिंग तुला प्रत्यक्षात भेटला, तर काय करशील…? म्हणलं… घट्ट मिठी मारुन, थँक यु म्हणेल!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.