कॅन्सर झाल्याचं समजूनही देशाला विश्वविजेता बनविण्यासाठी युवराज ‘वर्ल्ड कप’ खेळत राहिला !

‘सिक्सर किंग’ युवराज सिंग क्रिकेटरसिकांच्या कायम लक्षात राहील तो एक झुंझार खेळाडू म्हणून. भारतीय संघासाठी त्याने कितीतरी मॅच विनिंग इनिंग्ज खेळल्या. भारताला अनेक अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिलेत.

युवराज सिंगने २००७ सालच्या ‘वर्ल्ड कप’मधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले सलग ६ सिक्सर्स आपल्यापैकी कुणीच विसरलेलं नाही. विसरण्याची सुतराम शक्यता देखील नाही. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सलग ६ सिक्सर्स ठोकणारा युवराज हा आजपर्यन्तच्या इतिहासात तरी पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज की युवराजने ‘त्या’ दिवशी फ्लींटॉफशी झालेल्या भांडणाचा राग ब्रॉडवर काढला आणि बिच्चाऱ्या ब्रॉडला मार पडला.

स्वतः युवराज सिंगनेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे खरं तर असं काहीच नव्हतं. त्याच्या मते त्या दिवशी बॉल बॅटवर इतक्या व्यवस्थितरीत्या येत होता की फ्लींटॉफशीवाद झाला नसता, तरी त्या दिवशी त्याने ते ६ सिक्सर्स मारलेच असते.

२०११ सालचा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला, त्यात युवराजने सर्वात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यामुळेच तो ‘मॅन ऑफ द सिरीज’ देखील ठरला होता. पण भारतीय विश्वविजयाचा हा हिरो या विश्वचषका दरम्यान कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी देखील लढत होता.मैदानात जगभरातील दादा बॉलर्सचं आक्रमण परतवून लावणारा युवराजला विश्वचषका दरम्यानच आपल्याला कॅन्सर झालाय हे समजलं होतं.

खरं तर कॅन्सरबद्दल समजल्यानंतर एखादा खेळाडू मोडून पडला असता, पण युवराजने मात्र कॅन्सरशी धैर्याने लढायचं ठरवलं. विशेष म्हणजे कॅन्सरबद्दल समजल्यानंतर देखील तो वर्ल्डकपमध्ये खेळत राहिला. श्रीलंकेविरुद्धच्या वानखेडेवरील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धोनीसोबत भारताला विजयाकडे घेऊन जाणारी निर्णायक पार्टनरशिप साकारली आणि संघाला वर्ल्ड कपजिंकून देऊनच त्याने इलाजासाठी क्रिकेटचं मैदान सोडलं.

कॅन्सर विरुद्धची लढाई यशस्वीपणे लढल्यानंतर ज्यावेळी तो मैदानावर परतला त्यावेळी मात्र भारतीय संघात बरेच बदल झालेले होते. त्याला संघात स्थान मिळवणं आणि टिकवणं अवघड होऊन जायला लागलं होतं. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या रिफ्लेक्सेसवर आणि त्यामुळेच खेळावर देखील व्हायला लागला होता. साहजिकच आपल्याकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याचे बघून निवृत्तीचे विचार युवराजच्या मनात घोळायला लागले होते.

अशावेळी भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने युवराजला समजावून सांगितलं आणि निवृत्तीचा विचार डोक्यातून काढायला सांगितला. स्वतः युवराजनेच गेल्यावर्षी पुनरागमना नंतरच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १२७ बॉल्समध्ये १५० रन्सची बहारदार इनिंग खेळून भारताला विजय मिळवून दिल्यानंतर ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारताना ही माहिती दिली होती.  

“कॅन्सरचा सामना करून परतल्यानंतरचा काही काळ मी क्रिकेट सोडायचा विचार करत होतो. त्यावेळी जर कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला नसता, तर कदाचित मी केव्हाच निवृत्त झालो असतो” 

आज भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा युवराज सिंग अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. एका युगाचा अंत झाला. त्याच्या जिद्दी खेळीची कमतरता क्रीडाप्रेमीना जाणवत राहिलं हे नक्की!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.