युवराज भारीच होता ओ, पण सय्यद अब्दुल रहीम कुठं कमी होते…

जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून फुटबॉल वर्ल्डकपचं नाव घेतलं जातं. क्रिकेट, कबड्डी या सारख्या खेळांमध्ये वर्चस्व असणारा भारत फुटबॉलमध्ये मात्र प्रचंड पिछाडीवर आहे. भारतात फुटबॉल खेळलं जातं, आय लीग, आयएसएलसारख्या मोठ्या स्पर्धाही होतात.

बायचुंग भुतिया, सुनील छेत्री हे फुटबॉल खेळाडूही भारतात लोकप्रिय आहेत, पण त्यांच्या लोकप्रियतेची तुलना क्रिकेटमधल्या स्टार्ससोबत केलीही जाऊ शकत नाही. लोकप्रियता, मानधन, जाहिराती या पातळ्यांवर दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे.

कुठल्या खेळाडूला तुम्ही आदर्श मानता हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा अनेकांकडून नाव घेतलं जातं ते युवराज सिंगचं. युवराजनं आपल्या करिअरमध्ये भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले, कित्येक रेकॉर्ड्सही केले, पण युवराज लक्षात राहतो तो २०११ च्या वर्ल्डकपमुळं.

२००७ च्या वर्ल्डकपमध्ये भारताला ग्रुप स्टेजमधूनच एक्झिट घ्यावी लागली होती, त्यामुळं हा मायदेशात होणारा वर्ल्डकप जिंकण्याचं मोठं प्रेशर भारतीय संघावर होतं. भारतानं हा वर्ल्डकप जिंकला आणि हिरो ठरला युवराज सिंग.मैदानावर रक्ताच्या उलट्या झाल्या, प्रचंड त्रास झाला तरी युवराज थांबला नाही. वर्ल्डकपनंतर युवराजला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि सगळ्या भारतानंच त्याच्या जिद्दीला सलाम केला.

युवराजची ही स्टोरी तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण सय्यद अब्दुल रहीम हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकत असाल…

१७ ऑगस्ट १९०९ मध्ये हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी हैदराबादमधल्याच काही शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र त्यांना फुटबॉलची प्रचंड आवड होती. जी स्वस्थ बसणारी नव्हतीच. अशातच ग्रॅज्युएशन पूर्ण करताना त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल टीममधून खेळायला सुरुवात केली.

सोबतच ‘इलेव्हन हंटर्स’ या टीमचेही ते सदस्य होते.

रहीम यांच्या फुटबॉलमधल्या टॅलेंटमुळं त्यांची लोकप्रियता वाढली होती. मात्र तरीही त्यांनी पुन्हा एकदा आपलं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. आर्ट्सची डिग्री घेतली, फिजिकल एज्युकेशनमध्ये डिप्लोमा केला आणि पीटी टीचर म्हणून काम करायला सुरुवात केली. पण फुटबॉलच्या आवडीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंच.

प्रोफेशनल फुटबॉल प्लेअर म्हणून रहीम नेदरलँड्समध्येही खेळले. हैदराबादच्या प्रतिष्ठित कमर क्लब कडून खेळतानाही त्यांनी आपला जलवा दाखवला.

पण त्यांची कारकीर्द प्लेअर म्हणून जेवढी गाजली नाही, तेवढी कोच आणि मॅनेजर म्हणून गाजली.

१९४३ मध्ये त्यांना हैदराबाद फुटबॉल असोसिशनचे सचिव म्हणून निवडण्यात आलं. नंतर ते आंध्र प्रदेशच्या फुटबॉल असोसिशनचे सचिव झाले. मग हैदराबाद सिटी पोलिस फुटबॉल क्लबचे कोच आणि नंतर हैदराबादच्या फुटबॉल टीमचे कोच म्हणून त्यांनी टीमला कित्येक ट्रॉफीज जिंकून दिल्या. त्यांनी घडवलेले प्लेअर्स त्यांची गुणवत्ता सांगत होतेच.

१९५० मध्ये रहीम यांची भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल टीममध्ये मॅनेजर म्हणून एंट्री झाली. भारताचा वर्ल्डकप खेळायचा चान्स नुकताच हुकला होता, त्यामुळं साहजिकच रहीम भारतीय संघात मोठे बदल घडवून आणतील अशी आशा सर्वांनाच होती.

रहीम आधी शाळा मास्तर होते, त्यामुळे शिस्त ही गोष्ट त्यांच्या नसानसात भिनलेली. त्यांनी हीच शिस्त फुटबॉल टीमलाही लावले. वन टच प्ले, आपल्या कमकुवत पायानं खेळणं असे अनेक प्रयोग त्यांनी प्रॅक्टिस दरम्यान केले आणि या शिस्तीचा आणि ट्रेनिंगचा परिणाम म्हणजे भारतीय संघानं १९५१ च्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मारलं. पण हा यशाचा सिलसिला इथंच थांबला नाही.

याचं कारण होतं, रहीम यांनी आखलेली स्ट्रॅटेजी

भारतीय फुटबॉल टीम तेव्हा ब्रिटिश फॉर्मेशनमध्ये खेळायची, पण रहीम यांनी यात मोठा बदल घडवून आणला. त्यांनी ४ बॅक- २ हाफ बॅक-४ फॉरवर्ड असं फॉर्मेशन आखलं. या ४-२-४ च्या फॉर्मेशनमुळं भारताला प्रचंड फायदा झाला. पुढं जाऊन ब्राझीलसारख्या टीमनं वर्ल्डकपमध्ये हेच फॉर्मेशन आखलं होतं.

रहीम यांच्या कोचिंगमध्ये भारतानं १९५६ च्या समर ऑलिंपिक्समध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारली होती, आजही ही भारतीय फुटबॉल टीमची मोठी अचिव्हमेन्ट मानली जाते. १९६० च्या समर ऑलिंपिक्समध्ये मात्र भारताला यश मिळालं नाही, ज्याची खंत रहीम यांना होतीच.

मग आल्या १९६२ च्या एशियन गेम्स, भारतानं जबरदस्त खेळ करत फायनलपर्यंत मजल मारली. फायनलमध्ये समोर होती, साऊथ कोरिया, ग्राउंड जवळपास लाखभर प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. या मॅचच्या आधी रहीम यांनी सगळ्या टीमला एकच मंत्र दिला होता…

कल तुम्हे गोल्ड जितना है!

रहीम साब म्हणून खेळाडूंमध्ये लोकप्रिय असलेल्या या कोचचा शब्द खेळाडूंनी खरा ठरवला. त्यादिवशी साऊथ कोरियाचा २-१ अशा फरकानं पराभव करत भारतानं एशियन गेम्सचं गोल्ड मेडल मारलं. देशभरातून भारतीय टीमचं कौतुक झालं, रहीम आणि सगळ्या टीमनं अगदी स्वप्नवत प्रवास केला.

पण या एशियन गेम्सच्या आधीच रहीम यांना कॅन्सर असल्याचं निदान झालेलं. तरीही त्यांनी फुटबॉलसारख्या दमवणाऱ्या खेळातून माघार घेतली नाही. त्रास सहन करत त्यांनी टीमला फायनल जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मैदानावरच्या खेळाडूंसोबतच रहीम यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं.

आपल्या आजारापेक्षा त्यांना देशाचं मेडल जिंकण्याचं स्वप्न महत्त्वाचं ठरलं, या स्पर्धेनंतर सहाच महिन्यात लंग कॅन्सरमुळं रहीम यांचं निधन झालं, पण त्यांच्या नावावर एशियन गोल्ड मेडलही होतं आणि स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधानही. 

– हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.