भारतातला एकमेव बाप ज्यांनी पोराला इंजिनियरिंग सोडून क्रिकेटमध्ये करियर करायला लावलं ….

कपिल देव नंतर भारतीय संघाच्या बॉलिंग डिपार्टमेंटला उतरती कळा लागली होती. अधेमधे आगरकरसुद्धा जोरदार चालला पण चांगला स्विंग आणि धारदार बॉलिंग करणारा गोलंदाज भारताच्या ताफ्यात बरेच दिवस आला नव्हता. बऱ्याच दिवसांनी एका परफेक्ट स्विंग बॉलरचं आगमन झालं नाव होतं झहीर खान. बॅटिंगला उभा असलेला खेळाडू झहीर खानच्या उडीनेच निम्मा अर्धा गारद व्हायचा. आफ्रिकेच्या ग्रॅमि स्मिथचा अनेकदा झहीर खानने बाजार उठवला होता. 

अचूक टप्पा, परफेक्ट स्विंग यांचं मिश्रण झहीर घेऊन आला आणि भारताच्या गोलंदाजी डिपार्टमेंटची चिंता मिटली. पण झहीर खान क्रिकेटर न बनता मस्त श्रीरामपूरच्या कॉलेजात इंजिनिअरिंग करण्याच्या मूडमध्ये होता. तर जाणून घेऊया डिटेलमध्ये हा काय किस्सा होता. 

7 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रातल्या श्रीरामपूर जिल्ह्यात झहीर खानचा जन्म झाला. इतर क्रिकेटर लोकांचं जर तुम्ही बघितलं तर त्यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असते पण झहीर खानच्या बाबतीत असं काही नव्हतंच. तो असाच शाळेत उनाडक्या करणं, थोडाफार अभ्यास करून पास होणं असे उद्योग करायचा पण आपण क्रिकेटर बनू याची त्याला तेच तसूभरही जाणीव नव्हती. क्रिकेटचा आणि झहीर खानचा दूरदूर कुठलाही संबंध नव्हता.

झहीरचे वडील बख्तियार खान हे श्रीरामपूर मध्ये फोटोग्राफर होते. तर आई झाकिया या शिक्षिका होत्या. झहीरला धरून तीन भावंडे असा हा छोटा पण सुखी परिवार होता.

बख्तियार खान यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. झहीरचे नावच पाकिस्तानचा क्रिकेटपटू झहीर अब्बास याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. झहीरचं सुरुवातीचे शिक्षण हिंदी सेवा मंडळ न्यू प्रायमरी स्कूल आणि सोमैया माध्यमिक शाळेतून घेतलं. त्याने बारावीनंतर मेकानिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

बहुतेक तेव्हा अभ्यासाला आणि इंजिनिअरिंगला जास्त स्कोप असावा म्हणून झहीर खान क्रिकेटला तितकं सिरियसली घेत नव्हता.

झहीरच्या वडिलांची फार इच्छा होती की आपला मुलगा भारतीय संघात क्रिकेटर बनावा पण त्यातल्या त्यात बॅट्समन नाही तर चांगला फास्टर बॉलर बनावा म्हणून त्यादृष्टीने झहीरला त्यांनी तयारी करायला शिकवलं. कारण त्यांना तेव्हाच एकूण अंदाज आलेला होता की भारतीय क्रिकेट टीममध्ये एखाद्या फास्टर बॉलरची गरज लागेलच म्हणून त्यांनी आपल्या मुलाला यात खेळवायच ठरवलं.

शाळेतल्या उत्तम खेळामुळे झहीर खानची निवड जिल्हास्तरीय क्रिकेट अकॅडमीच्या टीममध्ये झाली. तिथेही झहीरचा खेळ चांगलाच बहरला. 

मग मुलाच्या भविष्यासाठी झहीरच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत आले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी झहीर खानने आपल्या बॉलिंगने दहशत माजवायला सुरवात केली. जिमखाना क्लबकडून खेळताना झहीरने फायनल मॅचमध्ये तब्बल सात विकेट मिळवल्या होत्या. या कामगिरीने झहीर खान वेगाने प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच्या क्रिकेट करिअरने वेग पकडला. यानंतर झहीर खान रणजी टीममध्ये सिलेक्ट झाला आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघातसुद्धा सामील झाला.

इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर काही खेळाडू हे झहीर खानचं फिक्स गिऱ्हाईक होते ते म्हणजे ग्रॅमि स्मिथ, मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्या, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने. 

जगभर आपला दबदबा झहीर खानने निर्माण केला होता. 3 वर्ल्ड कपचा झहीर खान साक्षीदार होता. पैकी 2011 च्या वर्ल्डकपला आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत त्याने वर्ल्डकप विजयाला हातभार लावला होता. शून्य विरोधक असलेला खेळाडू म्हणजे झहीर खान असं समीकरण कायमचं सेट झालं होतं.

आयपीएल मध्ये 3 संघांकडून झहीर खान खेळलाय त्यात दिल्ली डेअरडेव्हील्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहेत. आयपीएल, टेस्ट क्रिकेट, वनडे क्रिकेट सगळीकडेच झहीर खानची दहशत होती. धोनीचा तो फेवरेट बॉलर होता आणि महत्वाचा अस्त्र होता.

कॉलेजात मित्रांनी इंजिनिअरिंग घेतलं म्हणून झहीर खाननेसुद्धा आपणही इंजिनिअरिंगचं घेऊ आणि इंजिनिअर बनू असा निर्णय घेतला होता पण वडिलांच्या आग्रहाखातर तो क्रिकेटर झाला. श्रीरामपूर मधून बाहेर पडत झहीरने मोठी झेप घेतली आणि तो भारताचा स्टार बॉलर झाला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.