त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते बॉलर नव्हते. मुकी बिचारी गाय कोणीही हाका. कधी कोणाला मान वर करून पहायचं नाही, उलट बोलायचं नाही, मदत न करणाऱ्या खेळपट्टीवर मरमर करत दिवसभर गोलंदाजी करत राहायची.

नवं शतक उजाडले ते भारतीय क्रिकेटला ग्रहण लावणाऱ्या मॅच फिक्सिंगला घेऊन. अनेक उलथापालथ या वर्षात घडल्या. अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

अखेर सौरव गांगुलीकडे भारतीय टीमची कमान सोपवण्यात आली. नवीन भारताची नवीन क्रिकेट टीम बनवायचा निर्धार त्याने केला. नवेनवे हिरे शोधले. काही हिऱ्यांना पैलू पाडले.

असाच एक हिरा म्हणजे झहीर खान.

अहमदनगरच्या श्रीरामपूरचा झहीर वयाच्या १७ व्या वर्षी फास्ट बॉलर बनायचं म्हणून मुंबईला आला. एमआरएफ पेस फौंडेशन ने त्याचं टॅलेंट ओळखून त्याला डेनिस लिलीच्या हवाली केलं. खूप वाट बघूनही त्याच्या आवडत्या मुंबई टीमकडून त्याला रणजीमध्ये पदार्पण करता आले नाही. अखेर बडोदा टीममध्ये त्याला चान्स मिळाला. २००० सालची रणजी ट्रॉफी त्याने बडोद्याला जिंकून दिली.

त्याची दमदार कामगिरी पाहून त्याला भारतीय टीममध्ये बोलावण आलं.

३ ऑक्टोबर २००० ला आयसीसी नॉकआउट सिरीज मध्ये केनियाच्या विरुद्ध त्याचं डेब्यू झाल. त्याच सामन्यात युवराज सिंगच सुद्धा भारतीय टीम मध्ये आगमन झाल होत.

ही गांगुलीची दादा टीम होती. अरे ला कारे करणारी.

झहीर खानचा तो रन अप, बॉल टाकतानाची ती उंच उडी आणि बॉल टाकल्यावर फलंदाजाकडे रोखून बघन पाहून भारी वाटत होत. ४२ व्या ओव्हरमध्ये झहीर ने दोन विकेट्स घेतले. दोन्ही बोल्ड. त्याच्या जबरदस्त इनस्विंग योर्करला केनियाच्या फलंदाजाकडे उत्तर नव्हते. या दोन विकेट्स पाहून पब्लिक वेडी झाली.

यॉर्कर टाकावा तर झहीर खाननेच.

पुढची अनेक वर्षे त्याने राज्य केले.शारजा, न्यूझीलंड, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया सगळीकडे विकेट्सची लाईन लावली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००३ च्या विश्वकपमध्ये भारताला फायनल मध्ये घेऊन जाण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र फायनल मध्ये तो प्रेशर हाताळू शकला नाही. पहिलाच बाॅल हा नोबाॅल टाकून त्याने अपशकून केला. त्या ओव्हर मध्ये त्याने १५ रना दिल्या. त्या मॅचमध्ये त्याला फक्त ७ ओव्हर मध्ये ६७ रन्स अॉसी बॅटसमन नि कुटल्या होत्या. २००३ फायनलच्या वाईट आठवणीमध्ये सचिनची विकेट तर आहेच पण झहीर खानची धुलाई सुद्धा आहे.

या मॅचनं झहीरला खूप काही शिकवलं. तेव्हा झालेला अपमान तो आयुष्यभर विसरला नाही.

झहीरने याच अपमानाचा बदला ८ वर्षांनी २०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये घेतला. तेव्हा त्याच्याविरुद्ध होती श्रीलंकन टीम. त्याने पहिल्या ३ ओव्हर मध्ये एकही रन दिली नाही आणि एक विकेट घेतली होती. यावरून ओळखावे त्याच्यामध्ये किती आग जळत होती. या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्याची कामगिरी जबरदस्त होती.

भारतीय फास्ट बॉलर मध्ये अभावाने आढळणाऱ्या स्वॅग झहीर मध्ये होता.

मानसिक आणि शाब्दिक लढाईत तो फलंदाजाच्या एक पाउल पुढेच राहिला. त्याच्याशी स्लेजिंग करून पंगा घेण्याच्या फंदात जास्त कोणी पडायचे नाही. असा प्रयत्न फक्त दोनदाच केला गेला आणि तेही झहीर बॅटींग करत असताना. भारताच्या इंग्लंड दौर्यावेळी झहीर फलंदाजी करत असताना इंग्लिश खेळाडूंनी मुद्दामहून जेली बिन्स खेळपट्टीवर टाकली. मैदानात झहीर खान आणी पीटरसन यांच्यात वाद पाहायला मिळाला. त्याच मच मध्ये झहीर बॉलींगला आल्यावर इंग्लिश फलंदाजांची पळताभुई कमी होईल अशी वेळ आली.

असंच एकदा ऑस्ट्रेलिया भारत दौर्यावर होता. तेव्हा ब्रेट लीने झहीर बॅटींग करत असताना काही तरी कमेंट त्याच्याजवळ जाऊन केली. यावेळी झहीरने तोंडाने उत्तर दिले नाही. जगातल्या सर्वात फास्ट बॉलर असलेल्या ब्रेट ली ला पुढच्याच बॉल ला स्ट्रेटला सिक्स मारला. ब्रेटलीने आयुष्यात परत कधी झहीर खान चा नाद केला नाही.

भारतीय फास्ट बॉलिंगच नेतृत्व त्याने अनेक वर्ष केलं. तो स्वतः तर बॉलिंग चांगली करायचाच पण शिवाय मिड ऑफला थांबून दुसऱ्या बॉलर ला ही मार्गदर्शन करायचा. यामुळेच कि काय त्याला ग्यानी बाबा हे नाव पडले. आयपीएल मध्ये फेमस झालेला नकल बाॅल हि त्याचीच देन मानली जाते. याच नकल बाॅलच्या जोरावर आयपीएल मध्ये त्याने खोऱ्याने विकेटा घेतल्या.

साउथ आफ्रिकेचा कप्तान स्मिथ, श्रीलंकेचा संगकारा, जयसूर्या हे झहीरचे नेहमीचे गिऱ्हाईक होते.

योर्कर, दोन्ही साईडला बॉल वळणारा स्विंग, रिव्हर्स स्विंग, धडकी भरवणारा बाउन्सर, नकल बॉल असे फास्ट बॉलिंगची सगळी अस्त्र त्याच्या भात्यात होती. वसीम अक्रम, चामिंडा वास या डावखुऱ्या फास्ट बॉलरशी त्याची कायम तुलना होत राहिली. मात्र दुखापतीमुळे टीमच्या आत बाहेर राहिल्यामुळे असेल त्याच्या क्षमतेएवढ्या विकेट त्याला मिळाल्या नाहीत. तरी वनडेमध्ये २८२ आणि कसोटीत ३११ विकेटा त्याने घेतल्या. भारतीय खेळपट्टीच्या मानाने ही कामगिरी जबरदस्त अशीच आहे.

असा हा मराठमोळा झहीर २०१५ मध्ये निवृत्त झाला. तंदुरुस्तीची जागरूकता नसल्यामुळे आपल्या कारकिर्दीचे जे नुकसान झाले ती वेळ परत कोणा भारतीय  गोलंदाजावर येऊ नये म्हणून त्याने प्रोफिटनेस सर्व्हिस म्हणून कंपनी सुरु केली आहे. २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये मराठमोळ्या “चक दे फेम ” सागरिका घाटगेशी त्याचं लग्न झालं.

भारतीय टीमचा गोलंदाजी कोच म्हणून त्याच नाव कायम चर्चेत असत. झहीर भारताचा कप्तान कधी बनू शकला नाही मात्र कोच म्हणून तरी त्याच्या क्रिकेटिंग ज्ञानाचा फायदा पुढच्या पिढीच्या गोलंदाजाना करून देता येईल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.