झहिर खानची छोटीशी इनिंग सचिनच्या शतकावर भारी पडली !

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडूलकर आणि झिम्बाब्वेचा हेन्री ओलोंगा यांच्यादरम्यानची लढाई अजरामर आहे. सचिनने ज्या पद्धतीने ओलोंगाची धुलाई केली होती, ती ओलोंगा आयुष्यभर विसरूच शकणार नाही. पण एवढ्यावरच ओलोंगाचा किस्सा संपणार नव्हताच मुळी. ओलोंगाला आयुष्यभरासाठी अशीच एक नकोशी आठवण झहीर खानने देखील दिली होती. 

साल होतं २०००, ८ डिसेंबरचा दिवस. 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यानचा जोधपुर येथील बरकतुल्ला खान मैदानावर खेळविण्यात आलेला तिसरा सामना. 

भारताचा कॅप्टन सौरव गांगुलीने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात काही फारशी चांगली राहिली नव्हती. सुरुवात म्हणण्यापेक्षा एक सचिन तेंडूलकर सोडला तर भारताची संपूर्ण बॅटिंग लाईनअपच या मॅचमध्ये कोसळली होती. 

सचिनने मात्र एकट्याने संघर्ष करताना इतरांसोबत छोट्या-छोट्या पार्टनरशिप करत १५३ बॉल्समध्ये १४६ रन्सची इनिंग खेळताना भारताला सव्वादोनशे रन्सचा पल्ला पार करून दिला होता. सत्तेचाळीसव्या ओव्हरमध्ये सचिनच्या रुपात भारताची आठवी विकेट पडली तेव्हा भारताच्या २३५ रन्स झाल्या होत्या. निर्धारित ५० ओव्हर्समध्ये भारत साधारणतः अडीचशे रन्स स्कोअर बोर्डवर लावेल असं वाटत होतं.

पण त्यानंतर मैदानावर आला झहीर खान.

झहीर भारताच्या बॉलिंगच्या फळीचं नेतृत्व करायचा. त्याच्याकडून काही फारशा अपेक्षा नव्हत्याच. जोडीला होता अजित आगरकर. दोघांनी मिळून ४९ व्या ओव्हरच्या शेवटी भारताला २५६ रन्सपर्यंत नेऊन ठेवलं होतं. 

आता शेवटची ओव्हर टाकायला आला होता हेन्री ओलोंगा. खरं तर हेन्री ओलोंगा हा झिम्बाब्वेचा स्ट्राईक बॉलर होता, पण सचिनने त्याची आधीच इतकी धुलाई केली होती की झिम्बाब्वेचा कॅप्टन हिथ स्ट्रीक याने त्याच्या पहिल्या ३ ओव्हर्सनंतर त्याला बंद केलं होतं आणि थेट सचिन गेल्यानंतरच शेवटची ओव्हर टाकण्यासाठी तो ओलोंगाला घेऊन आला होता. 

आता मैदानात सचिन नव्हता म्हणून काय झालं, ओलोंगावरचा राग आता झहीर खान बाहेर काढणार होता. ओलोंगाने शेवटच्या ओव्हरचा पहिल्या बॉलवर झहीरने सिंगल घेतला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आगरकरने सिंगल घेतला. वाटलं होतं ओव्हरमध्ये ७-८ रन्स मिळतील पण आता झहिरचा नूरच बदलला होता. 

ते शेवटचे ४ बॉल्स…

तिसरा बॉल ओलोंगाने यॉर्कर करायचा प्रयत्न केला, पण तो झहीरला लो फुलटॉस मिळाला. स्केअर लेगला सिक्सर. झहीरच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य. चौथ्या बॉलवर झहीरचा परत प्रहार. बॉल थेट प्रेक्षकांमध्ये. 

दबावातल्या ओलोंगाचा पुढचा बॉल झहीरला परत फुलटॉस आणि परत झहीरचा लेग साईटला सिक्सर. सलग ३ बॉल्सवर ३ सिक्सर्स खाल्यानंतर ओलोंगाची लाईन आणि लेन्थ इतकी बिघडली की त्याने पुढचा बॉल वाईड टाकला. भारताला एक्स्ट्रा सिंगल आणि एक्स्ट्रा बॉल मिळाला. 

शेवटच्या बॉलवर झहीरने परत एक सिक्सर लगावला आणि प्रेक्षकांना परत जल्लोषाची संधी दिली. शेवटच्या बॉलवरचा हा सिक्सर तर कुठल्याही कसलेल्या बॅटसमनने खेळलेला असावा इतका अप्रतिम होता. बहुधा त्या ४ सिक्सर्समधला सर्वात प्रेक्षणीय. 

या ४ सिक्सर्सने झहीरने भारताचा स्कोअर २८३ रन्सवर नेऊन ठेवला. अर्थात त्याकाळात हा एक अतिशय सन्मानजनक स्कोअर होता. शेवटच्या ओव्हरमधल्या २७ रन्समुळे ओलोन्गाच्या खात्यात ४ ओव्हर्समध्ये ५२ रन्स जमा झाले होते. 

भारताचे २८३ रन्स चेस करताना झिम्बाब्वेकडून अँडी आणि ग्रांड या फ्लावर बंधूंनी झुंझार वृत्तीचं प्रदर्शन घडवलं आणि अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने एक बॉल आणि १ विकेट राखून भारताचा पराभव केला. 

सचिनच्या शतकानंतरही भारताला हा मॅच गमवावा लागला असला तरी आजही भारतीय क्रिकेटरसिकांच्या तो मॅच आठवणीत आहे ते झहीरच्या ४ बॉल्सवरील ४ सिक्सरसाठी आणि ओलोंगाच्या धुलाईसाठीच. 

हे ही वाच भिडू – 

Leave A Reply

Your email address will not be published.