कोकणातून आलेल्या एका हूशार डॉक्टरचा पोरगा बिघडला अन् तो झाकीर नाईक झाला

आपल्या देशात कोरोना जसा जसा वाढू लागतो तसा तसा एक उपाय हिंदू भक्त लोक सारखाच सांगू लागतात,

तो म्हणजे गाईचं गोमूत्र प्या, शेण खा,शेणामुताने अंघोळ करा.. वैगरे, वैगरे

असच मुस्लिम कट्टरतावाद्यांनी उंटणीच मूत्र प्या आणि बरे व्हा, आणि हाच खरा उपचार आहे असं सांगितलंय..

हा कट्टरतावादी दुसरा तिसरा कोणी नसून एकेकाळी बांग्लादेशाला बॉम्बस्फोटांनी हादरवणारा डॉ. झाकीर नाईक आहे.

ह्यो भारतातला स्वयंघोषित मुस्लिम धर्मप्रचारक. फडर्य़ा इंग्रजीत भाषण ठोकणारा. कुराणावर बोलता बोलता गीता आणि बायबलचे दाखले देणारा हा मॉर्डन जमान्यातला बाबा हातात कागद घेत नाही. कुराणातली आयत आणि सुराचा नंबर त्याच्या जीभेवर.

पण गीतेचा अध्याय कितवा, ओळ कितवी हे सांगत संस्कृत श्लोक घडाघडा बोलतो. तेव्हा ऐकणारे अचंबित होतात. प्रेषित आणि इस्लाम यांच्या उदयाचं भाकित वेदांमध्ये आधीच सांगितलेलं आहे, असा दाखला या माणसाने दिल्यावर समोरचा शिक्षित माणूस भाबडेपणाने झाकीरचा मुरीद होतो.

अशा ह्या मॉर्डन कट्टरतावादी बाबाचा खरा बाबा (वडील) याच्या अगदी उलट. पक्का कोकणी माणूस. शहाळ्यासारखा गोड

नाव अब्दुल करीम नाईक, महाराष्ट्रातल रत्नागिरी हे गाव. एक कोकणी माणूस. अब्दुल करीमन लहान वयातच आपल्या वडिलांना गमावल. यामुळ शिक्षणात त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूल माध्यमिक शिक्षण आणि १९४६ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण केली.

शांत, संयमी आणि पुरोगामी असं व्यक्तिमत्व होत अब्दुलच.

पुढच्या शिक्षणासाठी तो मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दाखल झाला. तथापि जातीय दंगलीमुळे त्याला मुंबई सोडण्यास भाग पाडले. या जातीय दंगलींचा वाईट परिणाम त्याच्या मनावर झाला पण तो कट्टरतावादाकडे वळला नाही. पुढंच शिक्षण सुरूच ठेवलं.

रत्नागिरीतल्या गोगटे महाविद्यालयात ऍडमिशन घेऊन इंटर सायन्स पूर्ण केले. आपल्या बुद्धीच्या तल्लखतेमुळे ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आणि १९५६ मध्ये त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले. यातूनही दुःख सरल नाही.

काबाडकष्ट करून रायगड जिल्ह्यातील मूळ गावचा परंपरागत मच्छिमारीचा व्यवसाय सोडून डोंगरी येथे क्लिनिकची सुरुवात केली.

मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी डॉक्टर ही ख्याती अब्दूलने मिळवली. त्यांनी उर्दू साहित्य आणि पत्रकारितेसारख्या विविध क्षेत्रात रस होता. शिक्षण क्षेत्रातही ते सक्रीय होते. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएच.डी., अरबी साहित्यात डिप्लोमा व पत्रकारिता पदविका प्राप्त केली होती.

१९९४ ते ९५ च्या दरम्यान मानसिक आरोग्य व्यावसायिकांची खासगी संस्था बॉम्बे सायकायट्रिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.

कोकणात आणि मुंबईत शिक्षण संस्था उभ्या करण्यात अनेकांना त्यांनी मदत केली. मुस्लिम ओबीसींच्या चळवळीमुळे त्यांची ओळख झाली होती. डॉक्टर धार्मिक होते, पण उदार परंपरेतले. सर्व धर्मीयांशी संवाद ठेवणारे. विशेषतः कोकणावर प्रेम करणारे.

एरव्ही धर्मवादी माणूस मुस्लिम ओबीसींच्या चळवळींशी फटकून वागतो. पण अब्दुल नाईकांना त्याबद्दल कौतुक होतं. कोकणातल्या मागासवर्गीय मुस्लिमांना विशेषतः मच्छिमारांना पुढे जाण्याचा मार्ग मिळेल याचं त्यांना अप्रूप होतं. शिक्षण आणि वै़द्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही.

ते प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ समाजाची सेवा केली. कोकणी मुसलमानांसाठी आणि उर्दू भाषा व साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. त्यांनी नक्ष ए कोकण पब्लिकेशन ट्रस्टची स्थापना केली.

१९६२ मध्ये कोकणच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयावर आधारित नक्ष-ए-कोकण मासिक सुरू केले.

या जर्नलमुळे कोकण किनारपट्टीच्या चारही जिल्ह्यातील मुस्लीम आणि मुंबईतील लोकांना एकत्र येण्यास, आपल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सामान्य समस्यांबद्दल आपले मत व्यक्त करण्यास मदत झाली. कोकणातील लेखक आणि कवी यांना त्यांचे लेखन प्रकाशित करण्यासाठी आणि उर्दू जगात ओळख मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित केले.

असं म्हणतात की बाप सें बेटा सवाई.. झाकीर नाईक तर सवाईच्या पण वरचा निघाला..

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत झाकीर नाईकने एमबीबीएस डिग्री तर घेतली पण वडिलांचा आदर्श नाही घेतला. अब्दुलने करीमन नक्ष-ए-कोकण या मासिकाची सुरवात केली. तर अब्दुलच्या पोराने झाकीरन पीस टीव्हीची. या पीस टीव्हीवरच्या झाकीरच्या भाषणांनी बांग्लादेशातल्या अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती, आणि त्यांनी ‘पीस’मध्येच लोकांची हत्या केली. सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ बॉम्बस्फोट घडवले गेले.

या झाकीर नाईकचे कारनामे सांगावे तेवढे कमीच आहेत.

झाकीर नाईकन इस्लामिक सेंटरची स्थापना केली. सुरुवातीला त्या सेंटरचा एवढा बोलबाला नव्हता. पण विदेशी मदत खूप मिळत असावी, याचा अंदाज होता. डॉ. झाकीरकडे बोलण्याचं प्रभुत्व तर होत. पण तीव्र स्मरणशक्ती आणि प्रचंड पाठांतराच्या जोरावर तो कट्टरतावाद्यांना आपल्या जवळ खेचत होता. त्याच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी व्हायची.

त्या सभेत कुणी गरीब, मेहनतकश मुसलमान नसायचाच. पांढरपेशांचीच गर्दी जास्त. झाकीरची वाणी तशीच ‘दिव्य’. पारंपरिक मौलवीच्या वेशात हा माणूस कधीच नसतो. अगदी सुटाबुटात. त्याच्या याच विलक्षण शैलीन जगभरात लोक त्याला फॉलो करू लागले.

झाकीरच्या पीस टीव्ही चॅनेल जगभरात २०० हुन अधिक देशात सुरु होत.

त्याचवेळी पीस टीव्हीवर बांगलादेशने २०१६ साली बंदी घातली आहे. पीस टीव्हीमुळं बांग्लादेशात धार्मिक कट्टरतावाद वाढू लागला. त्या दोन वर्षात बांग्लादेश अंतर्गत हिंसाचार आणि आतंकवादाने बेजार झाला होता. सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ आता बॉम्बस्फोट घडू लागले आहेत.

ढाक्यातल्या स्फोटानंतर प्रथमच ही बाब समोर आली की, अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती, ती डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून.

त्यावेळी झाकीर नाईक मुंबईतच राहत होता. भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारच्या संशयाची सुई कधी झाकीर नाईककडे वळलीच नाही. त्याच्यावर पाळतही ठेवलली नाही. डॉ. अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज यांना जशी गर्दी होते तशी डॉ. झाकीरच्या भाषणांना गर्दी होत असावी, असंच पोलीस आणि गुप्तचरही मानत होते. त्यामुळे आतंकवादाशी त्यांचा संबंध जोडला गेला नसेल. संबंध नसेलही कदाचित.

पण त्यांच्या भाषणातून ढाक्यातल्या अतिरेक्यांना प्रेरणा (चिथावणी) मिळाली. त्याचं काय?

त्यावेळी मुस्लिम उदारमतवादी पण झाकीरच्या सर्मथनार्थ पुढे आले. फॉलोअर्सनी केलेल्या कृत्याबद्दल डॉक्टरला कसं जबाबदार धरता येईल? असा त्यांचा सवाल होता. डॉक्टर फक्त कुराणाचा अर्थ सांगतात, असं त्यांचं म्हणणं होत. ओसाबा बिन लादेनचंही अप्रत्यक्ष सर्मथन करणार्‍या झाकीर नाईकने ढाक्यातल्या बॉम्बस्फोटाचा आधी निषेध केला नव्हता.

बांगलादेश सरकारने आक्षेप घेताच वादळ उठलं आणि डॉ. नाईक जागा झाला. निरपराध माणसाची हत्या म्हणजे मानवतेची हत्या. पवित्र कुराणाला मानवतेची हत्या मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.

परंतु नोव्हेंबरमध्ये भारताच्या दहशतवादविरोधी एजन्सी, राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (एनआयए) झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) यांच्याविरूद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले.

त्या आरोपत्रात मनी लॉण्डरिंग आणि धार्मिक द्वेषाचा प्रचार करण्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंदविण्यात आला. त्यानंतर झाकीर नाईकने मलेशियाला पलायन केले. आणि आजही मुस्लिमबहुल मलेशियात राहून त्याचा विखारी प्रचार सुरूच आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.