झीनत अमान मुळे इम्रान खानची एकाग्रता भंग झाली आणि पाकिस्तान हरला.

इम्रान खान. एकेकाळचा जगातला सर्वश्रेष्ठ फास्टर बॉलर. ऐंशीच्या दशकात जेवढी त्याच्या बॉलिंगची चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त त्याच्या अफेअरबद्दल झाली.

यातही सर्वात जास्त गाजले होते बॉलीवूडची सेक्सबॉम्ब झीनत अमान बरोबरचे अफेअर.

इम्रान कॉलेजमध्ये होता तेव्हा पासून पोरी त्याच्यावर जीव टाकायच्या. दिसायला उंच धिप्पाड लांब केस असलेला गोरापान रांगडा पठाण आणि विशेष म्हणजे फाडफाड इंग्लिश बोलायचा. त्याकाळात हे पाकिस्तानमध्ये दुर्मिळच. (आजही इंग्लिश बोलता येणारे पाक मध्ये दुर्मिळ आहेत) शिवाय जबरदस्त फास्ट बॉलिंग करायचा. त्याचा जन्म हिरो होण्यासाठी झाला आहे की काय असे वाटावे इतपत त्याची क्रेझ होती.

घरची परिस्थिती चांगली. शिकायला त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये पाठवलेलं. पण अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये याच नाव प्लेबॉय असं पडलं. उच्चभ्रू इंग्लिश नाईटक्लब मध्ये ब्रिटीश मुली बायका इम्रान सोबत रात्र गाजवायला मरत होत्या. पण यामुळे त्याच नाव बदनाम होत होतं पण इम्रान बेफिकीर होता. पुढे तो पाकिस्तानमध्ये परत आला, नॅशनल टीमकडून खेळू लागला तरी त्याने पार्टी कल्चर सोडला नाही.

१९७९ साल होते. पाकिस्तानी टीम भारत दौऱ्यावर आली होती. पहिली कसोटी बेंगलोरमध्ये होती. इम्रान त्यावेळी जोश मध्ये होता. त्याने त्या सामन्यात एका डावात भारताच्या चार विकेट घेतल्या. २५ नोव्हेंबरला चिन्नास्वामी स्टेडियमच्या ड्रेसिंग रूम मध्ये इम्रानचा वाढदिवस त्याच्या टीममेट्सनी जोरात साजरा केला. पण दुसऱ्या दिवशी बातमी मात्र भारतीय न्यूजपेपरमध्ये एक बातमी विशेष लक्ष वेधत होती.   

“पाकिस्तानी गोलंदाज इम्रान खानने आपल्या वाढदिवसाची संध्याकाळ बॉम्बशेल झीनत अमान बरोबर घालवली.”

फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये या बातमीने खळबळ उडवून दिली. झीनत अमानचे नुकतचं संजय खान बरोबर ब्रेक अप झाले होते. संजय खानने तिला खुले आम बेदम मारहाण ही केली होती या गोष्टीला महिनासुद्धा झाला नव्हता, तेव्हढ्यात या बातमीमुळे झीनत परत चर्चेत आली आणि तेही चुकीच्या कारणाने.

भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानची पुढची कसोटी दिल्लीला होती. या सामन्यात इम्रान खानने फक्त दोनच ओव्हर बॉलिंग केली आणि पाठदुखीचे कारण देऊन मैदानाच्या बाहेर पडला. पाकिस्तानी प्रेसमध्ये त्याच्या आणि झीनतच्या बद्लच्या कुजबुज चर्चा सुरु झाल्या. पण टीममधले बाकीचे साथीदार इम्रानला त्याच्या पाठदुखीमागे झीनत आहे का हे विचारून चिडवू लागले. 

पहिल्या दोन्ही कसोटी अनिर्णयीत झाल्या. पुढची मुंबईमधली कसोटी तर पाकिस्तान भारताकडून हरला.  भारताने यानंतर आणखी एक कसोटी जिंकून सिरीज खिशात टाकली. इम्रान खानला आणि त्याच्या झीनत अमान बरोबरच्या अफेअरला पाकिस्तानमधून शिव्याशाप मिळाले. मिडीयाने त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभा केले.

झीनत अमान मुळे इम्रान खानची एकाग्रता भंग झाली आणि पाकिस्तान हरला असे त्याच्या फॅन्सचं म्हणणं होत.

काहीजणांचे तर मत होते की भारतीय गुप्तचर संघटना RAW ने झीनतला त्या रात्री इम्रानच्या रूमवर पाठवले.

पण शेवटपर्यंत इम्रान खान असे काही अफेअर नाही असेच म्हणत राहिला.

पुढे काही वर्षांनी भारतात गॉसिप पत्रकारितेची आद्य जनक शोभा डे हिने इम्रान खानची मुलाखत घेतली. त्यावेळी इम्रान रिटायर झाला होता. झीनतच्या नंतर अनेक मुली त्याच्या जीवनात येऊन गेल्या होत्या. झीनत देखील लग्न करून संसाराला लागली होती. तोही पाकिस्तानीच होता, त्याचे नाव अभिनेता मजहर खान.

शोभा डेने आपल्या एका पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे.

इम्रान तेव्हा राजकारणात येण्याची तयारी करत होता.  स्वतः एकेकाळी प्लेबॉय राहिलेला इम्रान मुलाखतीवेळी म्हातारपणीच्या संस्काराच्या गोष्टी बोलत होता. शोभा डेने त्याला त्या सुप्रसिद्ध दौऱ्यातल्या झीनतशी अफेअरबद्दलचा प्रश्न विचारला पण इम्रानने नेहमीच्या पठडीमध्ये तिला उत्तर दिले,

 “आम्ही फक्त चांगले मित्र होतो”

पण शोभा डे कच्च्या गुरूची चेली नव्हती. ती पूर्ण अभ्यास करून आली होती. तिने त्याला बरच आडवे तिडवे प्रश्न विचारले. इम्रान त्याला गांगरून गेला. तिच्या मासिकाने शोधपत्रकारिता करून हा शोध लावला होता की, इम्रान त्या भारत दौऱ्यावेळी दक्षिण मुंबईमध्ये एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. आणि त्याच्या शेजारच्या खोलीत झीनत अमान राहायला होती.

इम्रान मात्र या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला. त्याने काही तरी थातूर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेली. शोभा डे ने जेव्हा हाच प्रश्न झीनत अमनला विचारला तेव्हा ती म्हणाली,

“माझ्या घरात दुरूस्तीच काम काढलं होत म्हणून मी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये राहायला गेले होते.”

तिच्यामते हा योगायोग होता. पण कोणालाही ही पटणारी गोष्ट नव्हती. शोभा डे ने मीठमसाला लावून ही स्टोरी केली. सोसायटी मॅगझीनच्या कव्हरवर इम्रान खानचा उघडा फोटो आणि सोबत झीनतचा सेक्सी फोटो लावला होता आणि टायटल केले होते,

“इम्रान खान आणि झीनत आमचे लग्न होता होता राहिले.”

भारतात तर त्या मॅगझिनचा अंक तुफान खपला पण शिवाय पाकिस्तानमध्ये दहा रुपयाचा एक अंक ब्लॅक मार्केट मध्ये २०० रुपयांना विकला गेला. राजकारणात येण्याची तयारी करत असलेल्या इम्रान खानला शेवटी स्पष्टीकरण द्यावे लागले. झीनतला कोणीतरी विचारलं, त्याच्या बरोबर लग्न का केली नाहीस. तेव्हा ती म्हणाली,

“इम्रान खान हा मग्रूर बेजबाबदार आणि आपल्या चाहत्यांशी अप्रामाणिक होता. त्याच्या बरोबर मी लग्न करणे शक्यच नव्हते.”

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.