झिम्बावेने मॅच जिंकली आणि डुप्लिकेट मिस्टर बिनचा हिशोब चुकता झाला

क्रिकेट म्हणलं की खुन्नस आली, भांडणं आली सगळंच आलं. सध्या T-20 वर्ल्ड कपची चर्चा सगळीकडे आहे आणि त्यात काल झालेल्या झिम्बावे विरुद्ध पाकिस्तान मॅचची तर बातच और होती. पाकिस्तानच्या हातातोंडाशी घास हिसकावत झिम्बावेच्या संघाने एकदम शानमध्ये एका रनने मॅच जिंकली. 

मॅच संपायच्या आधीच ट्विटरवर एक वेगळं वॉर सुरु झालेलं की झिम्बावेने त्यांचा एक जुना हिशोब चुकता केला. कालची ही रिव्हेंज मॅच आधीच्या सामन्याची हार वगरे याच्याशी अजिबातच जोडलेली नव्हती. ती जोडलेली होती थेट मिस्टर बिनशी. 

झिम्बावेच्या संघाने काल बाप का दादा का बदला नाही तर फेक मिस्टर बिन का सबका बदला सूत समेत घेऊन टाकला. आता तुम्ही म्हणाल की त्या कार्टून कॅरेक्टर मिस्टर बिनचा आणि झिम्बावेचा काय संबंध भावा? 

झिम्बावे टीमच्या पोरांना ज्या गोष्टीने एवढी प्रेरणा दिली त्या मिस्टर बिनची गोष्ट लईच इंटरेस्टिंग आहे. 

मिस्टर बिन हे कार्टून काही आपल्याला नवं नाही. एकेकाळी या कार्टूनची एवढी क्रेझ होती की विचारायला नको. रोवन ऍटकिंसन या ब्रिटिश अभिनेत्याने मिस्टर बिनचं अजरामर पात्र साकारलं. एकही शब्द न बोलता फक्त हालचाली आणि हावभावातून त्याने ९० च्या दशकात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय.

 एक स्वतःमध्ये मग्न असणारा गोड असा मिस्टर बिन आणि त्याच्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग बघत अनेकांचं बालपण गेलं आहे. पण याच मिस्टर बिनचं नाव जर झिम्बावे देशातल्या एखाद्या व्यक्तीसमोर काढलं तर त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणीच येईल. कारण याच मिस्टर बिनच्या नावाखाली पाकिस्तानने त्यांना येडं बनवलं होतं असं सांगितलं जातं. 

एवढंच काय तर कालच्या मॅचनंतर झिम्बावेचे राष्ट्रपती एमर्सन मनांगवा यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटमध्ये या फेक मिस्टर बिनचा उल्लेख केला आणि लिहिलं, ‘पुढच्यावेळी खरा मिस्टर बिन पाठवा’. 

आता हा फेक मिस्टर बिनचा काय किस्सा आहे? आणि या सगळ्यात पाकिस्तानचा काय संबंध आहे? तर त्याच झालं असं की २०१६ मध्ये झिम्बावेमध्ये एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध कॉमेडियनला बोलवण्यात आलं. 

आसिफ मोहम्मद या पाकिस्तानी कॉमेडियनला पाक मिस्टर बिन असं म्हणतात. 

आसिफ हा मूळचा कराचीमधल्या खरदार भागातला. आसिफ चर्चेत आला ते त्याच्यात आणि मिस्टर बिन या कॅरेक्टरमधल्या साम्यामुळे. या कॉमेडियनचा चेहरा हा बराचसा खऱ्या मिस्टर बिनसारखा म्हणजे रोवन ऍटकिन्सनसारखा दिसतो. फक्त त्याचे गाल थोडे वर आलेले पण बाकी बराचसा चेहरा हा खऱ्या मिस्टर बिनसारखा आहे. 

हा पाकिस्तानचा मिस्टर बिन झिम्बावेमध्ये एका कार्यक्रमासाठी आला. कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अपेक्षा होती की या पाकिस्तानी कलाकाराची चर्चा होईल आणि तो प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. त्याचा कार्यक्रम हरारे इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये आयोजित केला होता जो सपशेल आपटला. त्याच्या येण्याने प्रेक्षकांचं फारसं मनोरंजन झालं नाही वर झिम्बावेच्या नागरिकांना तिकिटाचा १०$ भुरदंड बसला ते वेगळंच.  त्याचा हा कार्यक्रम फ्लॉप झाला पण त्याच्या येण्याची निराळीच चर्चा झाली.

तिथल्या नागरिकांना वाटत होतं की खराखुरा मिस्टर बिन आलाय म्हणून उत्साहाच्या भारत नागरिकांनी त्याच्यासोबत फोटो काढले. एवढंच नाही तर एका व्हिडिओमध्ये हा पाकिस्तानी मिस्टर बिन पोलिस ताफ्याच्या सिक्युरिटीमध्ये बसलेला दिसतोय. 

गाडीच्या टपावरून बाहेर येऊन हा कॉमेडियन झिम्बावेच्या नागरिकांशी हात मिळवताना आणि स्टाईलमध्ये स्टारडम एन्जॉय करताना सुद्धा व्हिडिओमध्ये दिसून आलाय. आता तिथल्या नागरिकांना हे कसं कळलं नाही की हा खोटा मिस्टर बिन आहे हा एक प्रश्न आहेच. यात सुद्धा काही ट्विट्समध्ये असं सांगितलं गेलंय की कार्यक्रम आयोजित केलेल्यांनी ही कल्पना दिली होती की हा खरा मिस्टर बिन नाहीये पण त्याच्यासारखा दिसणारा एक कलाकार आहे. पण नागरिकांना मात्र मोठा गेम झालाय असं वाटणं साहजिक होतं.

म्हणतात ना की बदला जितना पुराना हो उतना खतरनाक होता है. झिम्बावेच्या नागरिकांसोबत झालेल्या या स्कॅमचा बदला त्यांच्या टीमने घेतला अशी मजेदार प्रतिक्रिया समोर येतेय. वरवर हे प्रकरण फार साधं वाटत असेल पण झिम्बावेच्या नागरिकांसाठी हा आन बाण शान चा प्रश्न होता. या सामन्याआधी सुद्धा या पाकिस्तानी मिस्टर बिनची चर्चा ट्विटरवर होत होती.

झिम्बावेचे नागरिक ज्या बदल्याची वाट बघत होते तो पूर्ण झाला. 

त्यांनी त्यांच्यामते असलेल्या ‘खोट्या’ मिस्टर बिनला बरेच शिव्याशाप दिले. आसिफ मोहम्मदवरून सध्या वातावरण एकदम गरम आहे पण आसिफची पाकिस्तानात बरीच चलती आहे बरं का? आपल्या गडीला हलक्यात घेऊ नका त्याला पाकिस्तानात लई फेम आहे. आसिफ एका जाहिरातीत शाहिद आफ्रिदीसह झळकला होता. आणि चक्क आफ्रिदी सुद्धा त्याच्या चेहऱ्यामुळे आश्चर्यचकित झालेला. 

आफ्रिदीने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला सुद्धा काही क्षण हे समजलं नाही की हा खोटा मिस्टर बिन आहे. बाकी त्याच्याकडे खऱ्या मिस्टर बिन एवढं टॅलेंट असो किंवा नसो गड्याने फक्त दिसण्याच्या जोरावर झिम्बावेच्या नागरिकांना उल्लू बनवून का होईना पण पैसे कमावले एवढं मात्र खरं. 

या प्रकरणाची चर्चा होतेय कारण झिम्बावेच्या राष्ट्रपतींनी सुद्धा हे प्रकरण उकरून काढलं. त्यांनी ट्विटमध्ये या मिस्टर बिनचा उल्लेख केला आणि त्या ट्विटला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा उत्तर दिलं. हे प्रकरण इतकं मजेदार आहे की एका तोतया मिस्टर बिनने झिम्बावेच्या नागरिकांची झोप उडवली होती. पण कालच्या मॅचनंतर तिथल्या नागरिकांना अखेर सुखाची झोप लागेल हे मात्र खरं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.