डिलिव्हरी बॉयच्या मृत्यूनंतर क्राऊडफंडिंग चालू झालेली पाहून झोमॅटोच्या मालकालाही जाग आली
”राईड विथ प्राईड” आपल्या डिलिव्हरी रायडर्ससाठी झोमॅटोचं ब्रीदवाक्य. लवचिक कामाचे तास, दर आठवड्याला पगार, हेल्थ अँड ट्रॅव्हल इन्शुरन्स, पुन्हा ‘चांगलं’ काम केलं तर इन्सेंटिव्हस अश्या सगळ्या ऑफर देऊन झोमॅटो रायडर्सना आकर्षित करतं. मात्र जितक्या डिलिव्हरी करणार त्यानुसारच पैसे मिळणार, त्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी दिवसाला १२ ते १५ तास काम, छोट्या मोठया शहरात रस्त्यावरील गर्दी , दूषित हवा घेत दुचाकीवरून फिरणे , पार्सल घेऊन जिने चढणे , इंधनचा आणि मेंटेनन्स खर्च,अन पुन्हा जॉब सिक्युरिटी नाही आणि एवढा सगळं करून डिलिव्हरी करतांना अपघात झाला तर मग खेळ खल्लास. अशी खडतर अवस्था डिलिव्हरी ‘पार्टनर्सची’.
याचाच प्रत्यय आला सलील त्रिपाठी या ३८ वर्षीय डिलिव्हरी पार्टनरला. करोनाच्या पहिल्या लाटेत त्रिपाठी यांची नोकरी गेली, तर दुसऱ्या लाटेत त्यांचे वडील.
मग एका वर्षातच हा हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह बनला होता. मग पोटापाण्यासाठी त्यांनी झोमॅटोची नोकरी स्वीकारली होती.
अशीच एक डिलिव्हरी द्यायला जात असताना एका कॉन्स्टेबलने त्याच्या SUVने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पण कवडीभर पैशांचा इन्शुरन्स देऊन त्यांचा पण विषय संपणार होता.
मात्र न्युजपेपरमध्ये हा विषय आल्यांनतर नेटकऱ्यांनी हा विषय उचलून धरला. अनेकांनी त्यांच्या फॅमिलीला मदत करण्यासाठी क्राऊडफंडिंग चालू केली. एकेकाळच्या यूपीएससी टॉपर असणाऱ्या शाह फैसलने मग सलील त्रिपाठी यांना मदत करण्याची अपील केली. १५ लाखांच्या मदतीचं टार्गेट असताना सात लाखांच्या वर निधी क्राऊडफंडिंगने जमा करण्यात आला.
मात्र फंडींगच्या मॅसेजबरोबर झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या खडतर आयुष्याबद्दलचीही चर्चा होत होती. मग मनाची नाही तर जनाची तरी म्हणत झोमॅटोनं मदत करण्याची घोषणा केली आहे.
झोमॅटोचे संस्थापक दीपेंदर गोयल संस्थापकाच्या ट्विटर निवेदनात म्हटले आहे की, अपघाताच्या रात्रीपासून त्यांची टीम कुटुंबासोबत रुग्णालयात आहे आणि ते कुटुंबाला 10 लाखांच्या विम्यासह मदत करत आहेत.
सलील त्रिपाठी यांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चासह त्यांच्या टीमनं कुटुंबाला काही खर्च भागवण्यासाठी आधीच मदत केली आहे.
झोमॅटोच्या निवेदनात पुढे सलील यांच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आलं आहे.
सलील यांच्या पत्नी सुचेता त्रिपाठी यांनी आपल्या पतीला न्याय मिळावा अशी मागणी ट्विटरवर केली होती. तसेच १० वर्षांच्या मुलासोबत एकट्याने सांभाळनं अवघड आहे आणि त्यामुळं “माझ्यासाठी भविष्य अंधकारमय आहे”असं ही त्यांनी म्हटलं होतं. या मदती व्यतिरिक्त झोमॅटोच्या कर्मचार्यांनी कुटुंबाच्या भविष्यासाठी एकत्रितपणे ₹१२ लाखांचं योगदान दिलं आहे.
त्यामुळं सलील त्रिपाठी यांच्या कुटुंबाला हातभार लागलाय. मात्र रोज हजारो डिलिव्हरी बॉईज आपला जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या जीवाचं काय याचं उत्तर मात्र कोणी देत नाहीए.
हे ही वॉच भिडू :
- जीएसटीने आता स्विगी आणि झोमॅटो ला देखील सोडलं नाही.
- ५ मिनिटांच्या रागात पोलिसांना नडलं की आयुष्यभराचा बाजार उठतो हे नक्की….
- ऑफिस स्टाफ कॅन्टीनमध्ये जास्त टाईमपास करतो म्हणून झोमॅटोचा शोध लागला.