आता ह्रितिक रोशन बॉयकॉट गँगच्या रडारवर आलाय

सोशल मीडियावर एक शब्द रोज ट्रेंडिंगवर असतो तो म्हणजे ‘बॉयकॉट’. बॉयकॉट हा शब्द कॉन्स्टन्ट असतो मात्र त्याच्या पुढे लागणारा शब्द बदलत असतो. या दुसऱ्या शब्दाची जागी जो कोणता शब्द येईल त्याची उतरती कळा लागली म्हणून समजा, असंच एकंदरीत सध्याचं समीकरण झालं आहे.

आमिरचा चित्रपट लाल सिंग चड्डा सोबत या बॉयकॉट ट्रेंडमुळे काय झालं हे तर सगळ्यांनीच बघितलं आहे. आता आमिरच्या या चित्रपटाचं कौतुक केलेला अभिनेता बॉयकॉट गँगच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.

हा अभिनेता म्हणजे ‘ह्रितिक रोशन’ आणि त्याला बॉयकॉटच्या फळीवर आणलं आहे ‘झोमॅटो’ या फूट डिलिव्हरी कंपनीने.

सोशल मीडियावर आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार टाकल्यानंतर हृतिक रोशननं ट्विटरवर हा चित्रपट बघण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. 

यानंतर हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ या आगामी सिनेमाला लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर #BoycottVikramVedha ट्रेंड होऊ लागला. प्रकरण थोडं शांतच होऊ लागलं होतं की हृतिक एका नव्या वादात सापडलाय. 

आत्ताचा वाद ह्रितिकने झोमॅटोसाठी केलेल्या नवीन जाहिरातीवरून पेटला आहे.

झोमॅटो देशभरात एक कॅम्पेन करत आहे. यामध्ये ते लोकल फूड आऊटलेटच्या सर्वात लोकप्रिय मेन्यूची जाहिरात करत आहेत. त्याचाच भाग म्हणून उज्जैन शहरातील सगळ्यात प्रसिद्ध अशा लोकल रेस्टॉरंट आणि त्यांच्या मेन्यूचा जाहिरातीत समावेश करण्यात आला. 

हे लोकल रेस्टॉरंट म्हणेज ‘महाकाल रेस्टॉरंट’ आणि त्यांचा फेमस मेन्यू म्हणजे ‘थाळी’. यालाच अनुसरून जाहिरातीत ह्रितिक म्हणतो की…

”थाली खाने का मन किया. उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया.”  

 बस्स.. जसं ही जाहिरात प्रसारित करण्यात आली तसा गोंधळ निर्माण झाला. तो देखील इतका की सोशल मीडियावर #रितिक_रोशन_माफी_मांग आणि #Boycott_Zomato जोरदार ट्रेंड होत आहे. याला कारण म्हणजे युझर्सने महाकाल रेस्टॉरंट नाही तर उज्जैनच्या ‘महाकाल महादेव मंदिराशी’ याचा संबंध जोडला आहे. 

महाकाल महादेव मंदिराची झोमॅटोने खिल्ली उडवली आहे. त्याला ह्रितिकने देखील समर्थ केलं आहे. झोमॅटो आणि हृतिक रोशन यांची इतकी हिंमत तरी कशी झाली? आम्ही याचा तीव्र विरोध करतो, अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियावर फिरत आहेत. हृतिक रोशनने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी युझर्सकडून केली जातोय.

बरं फक्त सोशल मीडियाचे युझर्सच नाही तर उज्जैनच्या महाकाल मंदिरातील पुजाऱ्यांनीही या प्रकरणी निषेध व्यक्त केलाय. 

देशभरातील लोकांना व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोने महाकाल यांच्या नावाच्या थाळीची जाहिरात त्वरित बंद करावी. जर असं झालं नाही तर महाकाल मंदिर पुजारी संघटनेच्या वतीने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. 

तर एका पुजाऱ्याने असं देखील म्हटलंय की “कंपनीने आपल्या जाहिरातीत महाकाल मंदिराबद्दल दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हिंदू समाज सहिष्णू आहे, जास्त हिंसक होत नाही. म्हणून अजून शांतपणे घेत आहोत. दुसरा समाज असता तर त्यांनी अशा कंपनीला आग लावली असती” 

वाद वाढत असल्याचं पाहून अखेर झोमॅटोने जाहिरातीबद्दल स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. 

“ह्रितिकने काम केलेल्या जाहिरातीत महाकाल रेटॉरंटच्या थाळीचा उल्लेख आहे, ना की महाकाल मंदिराचा. महाकाल रेस्टॉरंट हे उज्जैनमधील प्रसिद्ध ठिकाण असून तिथली थाळी खूप प्रसिद्ध आहे. त्याचा उल्लेख आम्ही केला होता. कुणाच्या भावना दुखावणं हा कंपनीचा हेतू नव्हता. म्हणून आम्ही (झोमॅटो) ही जाहिरात मागे घेत आहोत.” असं कंपनीने म्हटलं आहे. 

WhatsApp Image 2022 08 22 at 3.48.15 PM
source – social media

झोमॅटो कंपनीचं झालं मात्र हृतिक रोशनकडून अजूनतरी कोणतंही स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाही.

तर सोशल मीडियावर ह्रितिक विरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरूच आहे. ह्रितिक माफी मागेल की या बॉयकॉट ट्रँडचा त्याच्या चित्रपटाला देखील फटका बसेल हे तर पुढेच कळेल. 

पण जाहिरातीमुळे बॉयकॉटच्या फंद्यात अडकलेली झोमॅटो ही काही पहिलीच कंपनी नाहीये. 

काही महिन्यांपूर्वी डाबरचा ब्युटी ब्रँड ‘फेम’च्या जाहिरातीत समलैंगी स्त्री जोडपं ‘करवा चौथ’ हा हिंदू सण साजरा करताना दाखवलं गेलं होतं. यामध्ये हे जोडपं एकमेकांचा चेहरा चाळणीतून बघताना दाखवण्यात आलं होतं. या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता आणि #BoycottDabur ट्रँड चालवला गेला होता. 

तेव्हा डाबरने जाहिरात मागे घेतली होती. याच दरम्यान ‘फॅबइंडिया’ देखील गोत्यात आलं होतं.

फॅबइंडियाने दिवाळीच्या वेळी एका जाहिरात केली होती त्याला ‘जश्न-ए-रिवाझ’ असं नाव देण्यात आलं होतं. दिवाळी हा हिंदूंचा सण असून त्याला चुकीच्या पद्धतीने ब्रँडने दाखवलं आहे, मुस्लिम नाव या सणाच्या कॅम्पेनला त्यांनी दिलंय. ‘सांस्कृतिकदृष्ट्या अयोग्य’ असं म्हणत सोशल मीडिया युझर्सने #BoycottFabIndia हा ट्रँड चालवला होता. 

तनिष्क ब्रँडच्या देखील एका जाहिरातीवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत #BoycottTanishq ट्रेंड करण्यात आलं होतं. ४३ सेकंदाच्या या जाहिरातीत एक मुस्लिम सासू तिच्या हिंदू सुनेसाठी ‘गोद भराई’ हा कार्यक्रम करते, असं दाखवण्यात आलं होतं. 

दोन भिन्न धर्म, परंपरा, संस्कृती यांचं सुंदर एकत्रीकरण म्हणून तनिष्कने जाहिरात समोर आणली होती मात्र युझर्सनी टीका केल्यानंतर तनिष्कला जाहिरात मागे घ्यावी लागली होती. 

सर्फ एक्सेल या डिटर्जंट बनवणाऱ्या कंपनीने देखील होळीच्या वेळी अशीच हिंदू-मुस्लिम एकतेची जाहिरात केली होती. ‘रंग लाये संग’ अशा टॅगलाईनखाली त्यांनी जाहिरातीत दाखवलं होतं की एका लहान मुलावर गल्लीतील कोणतंही मुल होळी असून रंग लावत नाही. कारण त्याला नमाजला जायचं असतं. तिथून आल्यावर त्याला रंग लावायचं ठरलं होतं.

यावरून युझर्स यांनी टीका केली होती की ‘होळीपेक्षा नमाज जास्त महत्वाचा आहे का’ आणि #BoycottSurfExcel ट्रेंड केलं होतं. 

याच प्रकारे #BoycottManyavar #BoycottAmul देखील ट्रेंड झाले आहेत. आणि यात आता झोमॅटोचा नंबर लागला आहे. मात्र सध्या बॉलिवूड विरोधात सुरु असलेली सोशल मीडियाच्या बॉयकॉट गँगची मोहीम बघता या बॉयकॉट ट्रेंडचा जास्त फटका ह्रितिकला बसण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.