झोमॅटोने १० मिनिटांत डिलिव्हरी स्कीम आणली अन् सोशल मीडियाने त्यांचा बाजार उठवला
आजकाल कोणतीही गोष्ट घरपोच मिळणं सहज शक्य झालंय. याचं कारण आहे ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्स. कपडे, घरगुती सामान, ग्रोसरी ते खाण्यापिण्याच्या तयार गोष्टी सगळं काही तुम्हाला मिळतं फक्त एका क्लीकवर. आता यातील इतर वापरातील गोष्टींचे ॲप सोडले तर ग्रोसरी आणि फूड डिलिव्हरी ॲप्समध्ये सध्या एकमेकांत रेस सुरु असल्याचं तुम्हाला निरीक्षणास येईल बघा.
ही रेस आहे डिलिव्हरचा टाइम कमी करण्याची.
नुकतंच झोमॅटोनं देखील त्यांचा डिलिव्हरी टाइम कमी करण्याची घोषणा केली. फक्त १० मिनिटांत तुमची फूड डिलिव्हरी होईल, असं झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी ट्विट करत घोषित केलंय. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर खूप मोठा राडा झाला. ज्याने झोमॅटोला परत त्यांच्या घोषणेची सविस्तर माहिती एक्सप्लेनर म्हणून द्यावी लागली.
काय आहे झोमॅटोचं प्रकरण जाणून घेऊया..
झोमॅटो लवकरच दहा मिनीटांमध्ये फूड डिलिव्हरी देणार आहे. या नव्या फिचरला ‘झोमॅटो इंन्स्टंट’ असं नाव देण्यात आलं आहे. तर पुढच्या महिन्यात गुरूग्राममध्ये ते लाँच करण्यात येणार आहे. नव्या फीचरमध्ये डिलिव्हरी एजंटच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे, असं दिपिंदर गोयल यांनी सांगितलं.
झोमॅटोने हा निर्णय घेण्याचं कारणही सांगितलंय…
आम्हाला नेहमी ग्राहकांकडून फास्ट डिलिव्हरीची मागणी होते. झोमॅटो ॲप वापरताना ग्राहक फास्ट डिलिव्हरी करणाऱ्या रेस्टोरंट्सला जास्त प्राधान्य देतात. आम्हालाही जाणवलं की ३० मिनिट खूपच हळू आहे. शिवाय नाविन्यपूर्ण देत राहणं आणि नेहमी आघाडीवर राहणं हाच एकमेव मार्ग आहे टेक इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्याचा. म्हणून आम्ही हा नवीन उपक्रम आणतोय, असं झोमॅटोचं म्हणणंय.
मात्र झोमॅटोच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर पार गोंधळ झाला. असं करून तुम्ही डिलिव्हरी बॉईजच्या जीवाशी खेळत असल्याची टीका होऊ लागली. १० मिनिटांत सामान आलं नाही तर काय त्याचं पोषणमुल्य कमी होणार आहे का? की हिरव्या भाज्या पिवळ्या पडणार आहे? मग इतकी घाई का? असं बोललं जाऊ लागेल.
फक्त कंपनीचे ग्राहक वाढवण्यासाठी झोमॅटोनं १० मिनिटांची स्कीम आणली असल्याची टीकाही करण्यात आली.
अशाप्रकारे हा वाद डिलिव्हरी बॉय वरून झालाय.. तेव्हा नेमकं डिलिव्हरी बॉईजला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे आम्ही शोधलं…
ॲपवर ऑर्डर पडली की ती एखाद्या डिलिव्हरी बॉयला दिली जाते. मग तो व्यक्ती ऑर्डर घ्यायला संबंधित रेस्टोरंटला जातो. तिथून माल घेऊन तो ऑर्डर पोहोचवायला जातो. मात्र यात त्यांना वेळेची डेडलाईन दिलेली असते, ज्याने त्यांच्यावर प्रेशर येतं. वेळेत ऑर्डर पोहोचवायचा भानगडीत अनेकदा त्यांच्या जीव धोक्यात येतो.
२०१८ मध्ये पुण्यात झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने रस्त्याच्या रॉंग साईडनं गाडी टाकली होती. त्याला ऑर्डर पीकअपला उशीर झाल्यानं त्याने हे केलं होतं. मग हे प्रेशर नेमकं का येतं? हे शोधलं, तेव्हा कळतं की हे प्रेशर काही कंपनीने त्यांच्यावर टाकलेलं नसतं. पण कंपनीच्या धोरणामुळे त्यांना आपोआप प्रेशर येतं. कंपनीचं धोरण असं आहे की, जे डिलिव्हरी बॉय कमी वेळात डिलिव्हरी करतात त्यांना जास्त ऑर्डर्स मिळतात. आणि याच ऑर्डर्स मिळवणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं.
कारण जेवढ्या जास्त ऑर्डर डिलिव्हर होतील तितकी इन्कम त्यांना मिळते.
झोमॅटोच्याच एका डिलिव्हरी बॉयने सांगितल्याप्रमाणे कंपनी त्यांना दोन प्रकारे पैसे देते. एक असतो रेगुलर फिक्स पगार तर दुसरं असतं इन्सेन्टिव्ह. जर तुम्ही १२ ऑर्डर कम्प्लिट केल्या तर २०० रुपयांचा इन्सेन्टिव्ह तुम्हाला मिळतो. आणि यासाठी धडपड करावी लागते कारण मिळणाऱ्या पगारातून घरचा खर्च देखील भागत नाही. हा झाला पहिला मुद्दा अनस्टेबल इन्कम.
दुसरा मुद्दा आहे त्यांच्या आरोग्याचा.
फास्ट डिलिव्हरी करण्यासाठी आणि इन्सेन्टिव्हच्या नादात डिलिव्हरी बॉईजला त्यांच्या आरोग्याचं भान राहत नाही. अति जागरण होत असल्याने आणि बॉडी पेनपासून स्वतःचं लक्ष दूर करण्यासाठी डिलिव्हरी बॉईजमध्ये दारू, सिगरेट असे नशे करण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं एका रिपोर्टनं सांगितलंय. शिवाय पाठदुखी आणि इतर आजारही त्यांना कमी वयात लागतात.
तिसरा मुद्दा सामाजिक संरक्षणाची कमतरता..
म्हणजे दिवसरात्र काम करूनही त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही. जसं कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला ओव्हरटाईम, हेल्थ बेनिफिट असतात, असं काहीच त्यांना नसतं. म्हणजे नो बेनिफिट जॉब.
चौथा मुद्दा म्हणजे कस्टमर रेटिंगचं प्रेशर.
जीवाचं रान करूनही ऑर्डर पोहोचवली तरी त्यांना अनेकदा रेटिंग्स दिल्या जात नाही. आणि या रेटिंग्जवर कंपनीचा बराच खेळ चालतो. कमी रेटिंग आली तर अनेकदा त्यांना कामावरून काढून टाकल्या जातं. एखाद्याने चांगलं काम करूनही रेटिंग कमी आल्या, तर ते विचारण्याची देखील सोय नसते. कारण तशी व्यवस्था नाहीये.
अशाप्रकारे या चार घटकांना डिलिव्हरी बॉईजला सामोरं जावं लागतं…
अशात भर म्हणून झोमॅटो सारख्या ॲप्सचं १० मिनिटांत डिलिव्हरीचं पाऊल अनेकांना अन्यायकारक वाटलं.
कोणतही काम असो तिथे न्यायपूर्वक कामाची व्यवस्था असावी, असं काहींचं म्हणणं आलं. म्हणून झोमॅटोला ट्रोल करण्यात आलं.
तेव्हा झोमॅटोला परत एकदा त्यावर एक्सप्लेनेशन द्यावं लागलं. ज्यात त्यांनी सांगितलंय…
१० मिनिटांत डिलिव्हरी सेवा केवळ जवळपासच्या विशिष्ट स्थानांसाठी, लोकप्रिय आणि प्रमाणित वस्तूंसाठी असेल. ज्या पदार्थांना किचनमध्ये तयार होण्यासाठी फक्त २ ते ४ मिनिट लागतात अशाच पदार्थांसाठी ते लागू असेल. तेही ताशी २० किलोमीटर वेगाने ३ ते ६ मिनिट ज्या ऑर्डर्स पोहोचायला लागतील त्यांचा यात समावेश असेल. त्यासाठी आम्ही कस्टमर लोकेशनच्या १ ते २ किलोमीटर अंतरात नवीन झोमॅटो स्टेशन उघडणार आहोत.
गोयल यांनी ट्विट करत अजून ही देखील माहिती दिली की, उशिरा डिलिव्हरीसाठी कोणताही दंड डिलिव्हरी बॉयला नसेल. तर १० आणि ३० मिनिटांच्या दोन्ही डिलिव्हरींसाठी वेळेवर डिलिव्हरीसाठी कोणताही इन्सेन्टिव्ह दिला जाणार नाही. शिवाय आम्ही आमच्या डिलिव्हरी कार्यकर्त्यांना रस्ता सुरक्षेबद्दल शिक्षण देत आहोत, आणि अपघाती आणि जीवन विमा देखील देत आहोत, असं गोयल यांनी सांगितलं.
मग राहिला मुद्दा की, नेमकं कोणते पदार्थ १० मिनिटांत डिलिव्हर होणार. तेव्हा गोयल यांनी सांगितलं… ब्रेड, ऑम्लेट, पोहे, कॉफी, चहा, बिर्याणी, मोमोज असे पदार्थ. यावर काहींनी उपहासात्मक विचारलं “२ मिनिटांत तयार होणारी मॅगी पण मिळणार का?” यालाही गोयल यांनी साकारात्मक उत्तर दिलं “हो, मॅगी देखील मिळणार!
तर अशाप्रकारे आहे हे सगळं झोमॅटो प्रकरण. आता यात तुमच्या आमच्या कामाची गोष्ट अशी की, या १० मिनिटांच्या मॉडेलचं अनुकरण केलं तर पदार्थांच्या किमती कमी होतील असा दावा झोमॅटोने केला आहे. तेव्हा खरंच असं होतं का? हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे मॉडेल किती यशस्वी होणार? कमेंट्समध्ये बिंधास व्यक्त व्हा…
हे ही वाच भिडू :
- डिलिव्हरी बॉयच्या मृत्यूनंतर क्राऊडफंडिंग चालू झालेली पाहून झोमॅटोच्या मालकालाही जाग आली
- ऑफिस स्टाफ कॅन्टीनमध्ये जास्त टाईमपास करतो म्हणून झोमॅटोचा शोध लागला.
- पैशाच्या नादात केलेली घाई नडली अन् फूडपांडाचा बाजार उठला