जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये घराणेशाहीच्या भावी पिढ्यांचा निकाल काय लागला?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपल्या आपल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांच साम्राज्य निर्माण झालं आहे. आता हे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी यांची नवी पिढी राजकारणात यायला पाहिजे.

त्याची पहिली पायरी म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका.

आणि सत्तेत येण्यासाठी कोणता राजमार्ग नसतोच किंबहुना नाहीच आहे. राजकारणातल्या बड्या बड्या आसामींना सुद्धा हि परीक्षा चुकलेली नाही. याच पार्श्‍वभूमीवर नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका झाल्या.

यात नामी नेत्यांचे पाहुणे पै, पोरबाळ यांना तिकीट मिळाली. या पाच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलेली दिसून आली.

त्याचाच आज निकाल लागला. ही निवडणूक अटीतटीची झाली. यात काहींना पराभव पत्करावा लागला तर काहींनी यशाची चव चाखली.

धुळे 

यात पहिल्या आहेत त्या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या धरती देवरे. धुळे जिल्हा परिषद लामकानी गावात त्यांचा विजय झालेला आहे. त्यांना भाजपच्या लामक गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत धरती देवरे यांना जनतेने बिनविरोध विजयी केलेलं आहे.

पालघर

त्यानंतर डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटाने राज्याचे लक्ष वेधून घेतल आहे. इथं शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा रोहित गावितचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली.

वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वतःचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला असावा अशी चर्चा आहे.

नंदुरबार

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या मुलीने विजय मिळवला.  त्याचवेळी विजयकुमार गावित यांच्या पुतण्याचा पराभव झाला आहे. या विजय आणि पराभवामुळे विजयकुमार गावित यांच्यासाठी एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हसू अशी परिस्थिती झाली आहे.

विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना शिवसेनेच्या राम रघुवंशी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. राम रघुवंशी यांचे वडील चंद्रकांत रघुवंशी हे माजी आमदार आहेत.

इकडं पुतण्याचा पराभव झाला असला तरी विजयकुमार गावितांच्या मुलीनं विजयाचं निशाण रोवल आहे. 

सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या बहीण आहेत. तर आमदार विजयकुमार गावित यांच्या सुप्रिया गावित कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा १२६९ मतांनी पराभव केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे.

नंदुरबार

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या बहीण गीता पाडवी या खापर गटात काँग्रेकडून  विजयी झाल्या आहेत. के.सी. पाडवी हे जवळपास १९९० पासून अक्कलकुव्याचे आमदार आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलेलं आहे. काँग्रेस निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सात वेळेस ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहिणीच्या रूपाने पाडवी घराण्यातील नवीन नेतृत्व नंदुरबार जिल्ह्यात उभं राहताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.