वाजपेयींचा सत्कार केला या एकाच कारणामुळे त्यांना परत आमदारकीचं तिकीट मिळालं नाही

राजकारणातील हेवेदावे संघर्ष या गोष्टी आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर त्याचे हिशोब वर्षानुवर्षे मनात ठेवून चुकते केले जातात. नेत्यांच्या दृष्टीने केलेली फक्त एक चूक तुमचं राजकीय करियर संपवून जाते.

पूर्वीच्या काळी हे प्रमाण कमी होतं. तरी काही वेळा असे प्रसंग देखील पाहायला मिळायचे.

अशीच एक घटना घडली होती नगरच्या झुम्बरलाल सारडा यांच्या बाबतीत.

सारडा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक उद्योगपती घराणं. त्यांचा कापडाचा बिझनेस होता. फार पूर्वीच्या काळी त्यांचे पूर्वज राजस्थानमधून अहमदनगरला आले आणि इथलेच नगरच्या मातीचे होऊन गेले. झुंबरलाल सारडा यांचं शिक्षण अहमदनगरमध्येच झालं. कॉलेजसाठी म्हणून ते काही काळ मुंबईला गेले पण तिथं त्यांचं मन रमल नाही आणि म्हणून नगरला परत आले.

मुंबईला असताना प्रसिद्ध उद्योजक मफतलाल अरविंदभाई यांच्याशी त्यांचे संबंध आले होते. त्यांच्या मदतीनेच झुंबरलाल यांनी नगरला सावेडीत सारडा मिल सुरू केली. याशिवाय कोठी परिसरात जिनिंग-प्रेसिंग, आॅईल मिल असे इतरही उद्योग त्यांनी सुरू करून स्थानिकांना रोजगार दिला. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी साबणाचा कारखानाही काढला.

तरुणांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा अशी त्यांची शिकवण असायची. त्यांनी स्वतः अनेकांना आपले उद्योग उभे करण्यासाठी मदत देखील केली होती.

त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा होता. त्यांच्या प्रेरणेच झुंबरलाल सारडा सामाजिक जीवनात सक्रिय झाले. हा  स्वातंत्र्यलढ्याचा काळ होता. त्याकाळात झुंबरलाल सारडा यांनी काँग्रेस विचारांची मशाल आपल्या हाती घेतली ती परत कधी खाली ठेवलीच नाही.

अहमदनगरच्या हिंद सेवा मंडळात ते १९४० च्या आसपास सक्रिय झाले. विद्यार्थी सेवा मंडळाचे रामकरण सारडा वसतिगृह सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 

स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत झुंबरलाल यांचे बंधू बन्सीलाल सारडा यांनी राजकारणात उडी घेतली व ते अहमदनगरचे नगरसेवक झाले. त्यांच्यामुळे झुंबरलाल सारडा यांचा देखील सक्रिय राजकारणाशी संपर्क आला. त्यांनी देखील नगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली. १९५७ साली ते पहिल्यांदा नगरचे नगरसेवक म्हणून निवडून आले. तिथून पुढचे पंधरा वर्षे ते सातत्याने निवडून येत राहिले.

१९६७ साली त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. स्वतः उद्योगपती असल्यामुळे त्यांचा अर्थकारणाशी अगदी जवळचा संपर्क होता. म्हणूनच त्यांच्याकडे नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी आली.

सरळ, साधा स्वभाव असलेल्या सारडा यांनी नगराध्यक्ष असताना किंवा राजकीय पदे भोगताना कोणत्याही यंत्रणेचा कधी वापर केला नाही. हिंद सेवा मंडळाचा विस्तार करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ताकिया ट्रस्टची जागा त्यांनी संस्थेसाठी घेतली आणि संस्थेचा विस्तार करण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक कै. बाळासाहेब भारदे यांचा झुंबरलाल सारडा याना  मोठा सहवास लाभला. म्हणून त्यांच्या समर्पित जीवनाचा मोठा प्रभाव सारडा यांच्यावर पडला. समाजजीवनात स्वच्छ राहण्याचे ते त्यांच्याकडूनच शिकले.

बाळासाहेब भारदे यांच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष असताना झुंबरलाल सारडा यांनी विधानपरिषदेची निवडणूक त लढविली. मात्र आबासाहेब निंबाळकर यांच्याकडून ते १३ मतांनी पराभूत झाले.

झुंबरलाल सारडा हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकारामुळे नगर शहरासाठी मुळा धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याचे पहिले प्रयत्न झाले.

१९ फेब्रुवारी १९६८ रोजी सध्याच्या वसंत टेकडी परिसरातील भूमिगत पाणी टाकीच्या भूमिपूजनापासून नगरच्या पाणी योजनेच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले. या वेळी तत्कालीन नगरविकास मंत्री पु. ग. खेर तसेच तत्कालिन राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व जिल्ह्याचे मंत्री आबासाहेब निंबाळकर उपस्थित होते. या भूमिपूजनाची कोनशीला येथे बसविण्यात आली होती.

 भूमिपूजनानंतर जुन्या महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये मुख्यमंत्री नाईक यांची सभा झाली. या वेळी बोलताना नगराध्यक्ष झुंबरलाल सारडा यांनी या पाणीयोजनेसाठी स्वतः २ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले व त्याबदल्यात सावेडीच्या परिसरास सारडा नगर नाव देण्याचीही रास्त अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यास शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

नगर जिल्ह्यातील पुढारी, तत्कालीन केंद्रीय मंत्री यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे व घनिष्ठ संबंध होते. सारडा महाविद्यालय, सारडा हायस्कूल उभारण्यासाठी त्यांचाच पुढाकार होता. सारडा महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही त्यांनी बोलविले होते. सारडा यांच्या आग्रहावरून ते नगरमध्ये आले.

या एकाच उदाहरणावरून झुंबरलाल सारडा यांचं राज्याच्या व केंद्राच्या राजकारणातील पोहच समजून येईल. मात्र एक घटना अशी घडली ज्याच्यामुळे त्यांचं राजकीय करियर संपवण्याची खेळी करण्यात आली.

१९६८ साली तत्कालीन जनसंघाचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते अटलबिहारी वाजपेयी अहमदनगरला आले होते. तेव्हा नगरपालिकेच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. नगराध्यक्ष या नात्याने झुंबरलाल सारडा यांनी अटलजींचा सत्कार केला. त्यांना मानपत्र देखील दिले. पण या सत्कार समारंभाचा पुढच्या चार वर्षांनी झुंबरलाल सारडा यांना मोठा फटका बसला.

१९७२ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. देशभरात काँग्रेसची लाट होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वामुळे आपण पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं होतं. काँग्रेसचा सर्वत्र विजय होत होता. महाराष्ट्राच्या निवडणुकीत देखील यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं.

तिकीट वाटप जेव्हा सुरु झाले तेव्हा नगर मधल्या विधानसभा सीट साठी तत्कालीन नराध्यक्ष  झुंबरलाल सारडा यांचं नाव पुढं करण्यात आलं. सारडा यांनी नगराध्यक्ष म्हणून चांगली छाप पाडली होती. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हा विजय निश्चित आहे असच बोललं जात होतं. तरीही जेव्हा झुंबरलाल सारडा यांचं नाव पक्षश्रेष्टींच्या कडे गेलं तेव्हा त्या नावावर खाट मारण्यात आली.

कारण होत अटलबिहारी वाजपेयी यांचा त्यांनी केलेला सत्कार.

झुंबरलाल सारडा यांच्या हितशत्रूंनी महाराष्ट्राचे नेते व तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे त्यांची तक्रार करण्यात आली. झुंबरलाल सारडा हे  हिंदुत्ववादी आहेत असे आरोप केले गेले. श्रेष्ठीनी  विश्वास ठेवून सारडा यांचं तिकीट कापलं. पुन्हा त्यांना आमदारकी मिळाली नाही.

पण म्हणून झुंबरलाल सारडा यांनी पक्षाचा झेंडा खाली ठेवला नाही. १९७२ सालच्या दुष्काळात त्यांनी नगरमध्ये मोठं काम केलं. त्यांच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या सुखडीने राज्यातल्या कित्येकांना जगवलं. नगराध्यक्ष पद गेल्यावर ही झुंबरलाल सारडा नगरच्या विकासासाठी कार्यरत राहिले. आणीबाणीच्या काळात सरकारी अधिकारी व्यापाऱ्यांना  आयकर भरण्याबाबत  असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी तत्कालीन मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्याकडे तक्रार केली. खताळ पाटील यांनी लक्ष घातल्याने व्यापाऱ्यांना होणारा त्रास कमी झाला.

आजही नगरमधील जुनी माणसं झुंबरलाल सारडा यांचं कार्य आणि त्यांची वाजपेयींमुळे हुकलेली आमदारकी याबद्दल हमखास सांगतात.

संदर्भ: दैनिक लोकमत सुदाम देशमुख 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.