१९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याची नांगी ठेचली ती BSF च्या पीटर फोर्सने

१९७१ सालचं भारत पाकिस्तान युद्ध हा भारताच्या इतिहासातल्या महत्वाच्या प्रसंगांपैकी एक होता. कारण अहिंसावादी भारताने प्रथमच लष्करी कारवाई करण्यात पुढाकार घेतला होता. राजकीयदृष्ट्या, हे युद्ध एप्रिल १९७१ सालापासूनच पासूनच खेळलं गेलं.

पाकिस्तानने बलात्कार, खून आणि दहशतवादाच्या मोहिमेद्वारे सुमारे नऊ दशलक्ष बांगलादेशी नागरिकांना भारतात ढकलले होते. याची तुलना फक्त दुसर्‍या महायुद्धात हिटलरने केलेल्या नरसंहाराशीच होऊ शकते. उर्वरित जगाने पाकिस्तानच्या या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट झाल्यावर सैन्य शक्ती वापरून पाकिस्तानी दहशतवाद थांबवणं हा एकमेव पर्याय भारताकडे राहिला.

हिवाळ्यातील भरमसाठ थंडीमूळे हिमालयीन खिंडी बंद झाल्यावर चीनच्या हस्तक्षेपाची शक्यता धूसर झाली, आणि मग भारताने पाहिले पाऊल उचलले.

२६ नोव्हेंबर, १९७१ च्या रात्री पूर्व पाकिस्तानच्या भूभागावर भारताने बॉम्बफेक केली. पाकिस्तानने त्याचा वचपा काढण्यासाठी ३ डिसेंबर १९७१ रोजी पश्चिमेकडे हवाई / जमिनीवरील हल्ले करून संघर्ष वाढविला. हवाई दलाने दिलेल्या मार्गदर्शनपर संरक्षणाखाली भारतीय पायदळ पूर्व पाकिस्तानात सर्व आघाड्यांवर यशस्वी कूच करत होतं.

यात महत्वाची भूमिका निभावली होती ती बीएसएफच्या ‘पीटर फोर्स’ने.

BSF ADG संजीव कृष्ण सूद (निवृत्त) यांनी त्यांच्या ‘BSF, The Eyes and Years of India’ या पुस्तकात ‘बांग्लादेश मुक्ती’च्या लढ्याशी संबंधित शौर्याचे अनेक किस्से सांगितलेत.

१९७१ मध्ये, भारत-पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर बंगालमध्ये सीमा सुरक्षा दले मोठ्या प्रमाणावर तैनाती होती. ज्यावेळी भारताने पाकिस्तानशी युद्ध छेडलं तेव्हा भारतीय लष्कराला ऑपरेशनसाठी साऊथ बंगालकडे कूच करावी लागली. त्यामुळं उत्तर बंगालच्या सीमेवर असणाऱ्या बीएसएफची जबाबदारी वाढली. पाकिस्तानी सैन्य बंगालच्या सीमेनजीकच होत.

आता सीमेवर सुरक्षा तर वाढवली पाहिजे म्हणून उत्तर बंगालमध्ये बीएसएफच्या डीआयजीने ‘पीटर फोर्स’ तयार केली.

या फोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात मोर्टार, एमएमजी एलिमेंट आणि पोस्ट ग्रुप आर्टिलरी विविध तुकड्यांमधील सैनिकांचा समावेश होता. पूर्व पाकिस्तानात ‘पीटर फोर्स’ने शौर्य दाखवत शत्रू सैन्याला सीमेपासून बऱ्याच किलोमीटर मागे ढकलले.

बीएसएफ आणि मुक्तीवाहिनीच्या सैनिकांनी पाक सैन्याला मिरजगंज हाट आणि डोमरपर्यंत मागे ढकलून तो प्रदेश ताब्यात घेतला. यानंतर ‘पीटर फोर्स’ला किशोरगंजच्या दिशेने जाण्याचा आदेश मिळाला. १५ डिसेंबर १९७१ रोजी बीएसएफने तिथं ही ताबा मिळवला.

पंजाब सेक्टरमध्येही बीएसएफने पराक्रम गाजवला. समोर पाकिस्तानी सैन्य नवीन शस्त्रास्त्रांनी सज्ज होत. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्याकडे प्रगत असं अमेरिकन तंत्रज्ञान होत. त्यामुळे अतिआत्मविश्वासाने पाकिस्तानने भारतीय पोस्टवर हल्ला केला.

पण बीएसएफने ही आपल्या पोस्टचा ताबा सोडला नाही. बीएसएफचे असिस्टंट कमांडंट आरके वाधवा यांनी 31 व्या बटालियनसह पाकिस्तानची पोस्ट ‘राजा मोहतम’वर हल्ला केला. त्यांच्यासोबत बीएसेफच्या फक्त दोन पलटणी होत्या. त्याच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानी पोस्ट आपल्या ताब्यात घेतली.

चौ बाजूनी कोंडीत पकडल्या गेलेल्या पाक सैन्याकडे ढाका इथं परत जाण्यासाठी भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याशिवाय पर्याय नव्हता. जनरल जे. एफ. आर. जेकब यांनी आखलेल्या उत्कृष्ट रणनीतीमध्ये पाक सैन्य अलगद गुरफटत गेल.

पाकिस्तानी बचावफळी पूर्णपणे अपयशी ठरली होती. भारतीय सैन्य १३–१४ डिसेंबर पर्यंत ढाका इथं पोहोचल सुद्धा होत. नौदलाने समुद्रमार्ग रोखून धरला होता आणि ऑल इंडिया रेडिओ सतत पाक सैनिकांना शरण येण्याचे आवाहन करत होता.

अखेर, १६ डिसेंबर, १९७१ ला जनरल नियाझीच्या नेतृत्वाखालील पाक सैन्याने लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर आपल्या ९३००० सैनिकांसमवेत सपशेल शरणागती पत्करली. या लढ्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही गिरी आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बीएसएफचे कौतुक सुद्धा केलं होत.

Webtitle : 1971-war : 1971-war-bsf-peter-force-succeeded-in-capturing-chilahati-mirzaganj-rly-stn-kishoreganj-in-most-decisive-battles-of-eastern-command

 

Leave A Reply

Your email address will not be published.