प्रतिभाताई पाटील यांचे पती राजस्थानच्या राजपूत समाजातले होते कारण…
प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. प्रतिभाताई २००७मध्ये ज्यावेळी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या तेव्हा आणखी एक व्यक्ती देशातल्या एका पदावर पहिल्यांदा विराजमान झाली. ते पद म्हणजे फर्स्ट जेंटलमन ऑफ इंडिया. याआधी फर्स्ट लेडी ऑफ इंडिया हा शब्द तेव्हापर्यंत झालेल्या राष्ट्रपतींच्या पत्नींसाठी वापरला गेला होता. पण पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती झाल्यानं देशाला पहिले फर्स्ट जेंटलमन ऑफ इंडिया मिळाले होते.
देवीसिंग शेखावत.
देवीसिंग म्हणजे प्रतिभाताईंचे पती. देवीसिंग यांना फर्स्ट जेंटलमन ऑफ इंडिया तसंच फर्स्ट जेंटलमन ऑफ राजस्थान ही पदवी सुद्धा मिळालीये. या पदव्या मिळालेले देवीसिंग शेखावत यांचं आज निधन झालंय. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार दोन दिवसांपुर्वी त्यांना हार्ट अटॅक आला होता त्यानंतर त्यांना पुण्यातल्या के ई एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आज उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या सगळ्यात एक प्रश्न येतो तो म्हणजे, राष्ट्रपती पदावर बसल्यानंतरही मराठमोळी साडी नेसणाऱ्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे डोक्यावर पदर घेणाऱ्या, कपाळावर लांबुनही स्पष्ट दिसेल अशी टिकली लावणाऱ्या प्रतिभाताईंचे पती शेखावत कसे काय? म्हणजे आंतरजातीय किंवा आंतरराज्यीय विवाह काही चुकीचा आहे असं आमचं म्हणणं नाही.
पण त्यांचं लग्न झालं ते १९६५ मध्ये. त्या काळात जेव्हा स्त्री शिक्षणाचाही आकडा फार कमी होता त्या काळात ‘पाटलांचं लग्न शेखावतांशी’ कसं काय बरं झालं असेल?
याचं उत्तर सापडतं ते प्रतिभा ताई पाटलांच्या परिवाराच्या इतिहासामध्ये. साधारण १८०० च्या काळात राजस्थानातल्या टोंक या ठिकाणावरून सोलंकी परिवार हा महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये स्थलांतरित झाला. हे सोलंकी मुळचे राजपूत. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या परिवारातल्या रामजी सोलंकी यांना पाटील ही पदवी देण्यात आली.
हे रामजी सोलंकी म्हणजे प्रतिभाताई पाटील यांचे पूर्वज. त्या काळात दिलेल्या पदव्यांनी आडनावांची जागा घेतली आणि लोकांची ओळख बदलली अशी बरीच उदाहरणं आहेत. प्रतिभाताईंच्या परिवाराचं सुद्धा अगदी तसंच झालं. मुळचे सोलंकी असलेल्या या परिवाराची ओळख पाटील अशी झाली. त्यामुळे, प्रतिभाताई यांचे वडिल नानासाहेब यांच्या नावापुढंही पाटील हे आडनाव लावलेलं आपल्याला दिसतं.
आता येऊया प्रतिभाताईंच्या लग्नाच्या विषयाकडं.
वयाच्या २७ व्या वर्षी १९६२ मध्ये प्रतिभाताई आमदारकीची निवडणूक जिंकल्या. त्यांच्या या यशानं त्यांचे वडील नानासाहेब सोबतच परिवारातल्या सगळ्याच सदस्यांना आनंद झाला होता. त्यांच्या लग्नाचाही विचार त्यांच्या वडिलांच्या डोक्यात असणं सहाजीकच असणार.
इकडे शेखावतांचीही कहाणी तशीच होती. मुळचे राजस्थानातले सिकर जिल्ह्यातल्या छोटी लोसल या भागातून त्यांचे पूर्वज इकडं अमरावती मध्ये येऊन स्थायीक झाले होते. त्यांचे वडील हे जमीनदार होते. तर, प्रतिभाताईंचे वडील पेशाने वकील आणि जमीनदारही होते असं सांगण्यात येतं. येवढंच नाही तर, या दोघांचं लग्न हे त्यांच्या जमीनदाक वडिलांनी जुळवलं होतं असंही सांगितलं जातं.
७ जुलै १९६५ रोजी त्यांचं देवीसिंह शेखावत यांच्याशी लग्न झालं.
त्यामुळं, प्रतिभाताईंचं लग्न हे शेखावत यांच्याशी अर्थात एका राजपूत परिवारात होण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या परिवाराचं मुळात राजपूत असणं.
ज्यावेळी लग्न झालं तेव्हा शेखावत हे केमिस्ट्रीचे शिक्षक होते तर, प्रतिभाताई आपल्या आमदारकीची पहिली टर्म पार पाडत होत्या. पुढं मग शेखावतही राजकारणात आले, आमदार झाले, अमरावतीचे महापौरसुद्धा झाले.
या जोडप्याविषयीची खास गोष्ट म्हणजे शेखावत यांनी प्रतिभाताई यांच्या करीअरवर कधीही बंधन आणलं नाही. उलट या दोघांनी एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची लोक आजही प्रशंसा करतात.
प्रतिभाताई यांचं मूळ हे राजस्थानातल्या राजपूत समाजातलं असूनही पहिल्यांदा आमदार झाल्यावर, राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्यावर, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्यावरही महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे डोक्यावर पदर, कपाळावर टिकली लावणाऱ्या प्रतिभाताई यांचं महाराष्ट्रावरचं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचं प्रेम दिसून येतं.
हे ही वाच भिडू:
- आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..
- कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ” प्रतिभाताई तुम आगे बढो” पण…
- राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी ? या वादावर बाळासाहेबांनी २००७ मध्येच पर्याय सुचवला होता…