शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार ?

२०१९ पासुन महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागेलेलं पहायला मिळतंय, एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या ४० सहकाऱ्यांसोबत भाजपसोबत संसार थाटला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेना सरकार अस्तित्वात आलं.

शिंदेंनी बंड केलं आणि सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून त्यांच्या बंडाची चर्चा होऊ लागली. पण हे बंडाचं राजकारण इथचं थांबलं नाही, तर रविवारी अजित पवार सहकारी आमदारांसोबत शिंदे फडणवीस सरकारचा भाग बनले आणि उपमुख्यमंत्री झाले. लागलीच राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याची चर्चा सुरू झाली.

अजित पवारांनी केलेल्या या बंडात राष्ट्रवादीचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क काढले जातायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यामागे भाजपचा हात असल्याचंही बोललं जातंय. पण सोबतच ही सुद्धा चर्चा रंगली की, शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता नंबर लागू शकतो तो काँग्रेसचा…

काँग्रेसमधील काही मोठे नेते भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या अनेक दिवसांपासुन आपल्या कानावर पडतायत. त्यात सध्या तरी या बातम्या दुर्लक्षीत करून चालणार नाही. पण या चर्चा फिरतात कुणाच्या नावाभोवती ?

तर पहिलं नाव येतं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं…

काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार अशी सगळ्यात जास्त चर्चा फिरते ती अशोक चव्हाणांभोवती. काँग्रेस पक्षात त्यांची कोंडी होत असल्याची चर्चा मधल्या काही काळात झाली होती. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्या बरोबर ५ आमदार विधानभवनात उशीरा पोहचल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. त्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या पाठींबा दिल्यामुळे आभारही व्यक्त केले होते.

त्यावरून काँग्रेस फुटीच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नाही तर विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्राँस वोटींग केलं होतं. त्याचाही ठपका अशोक चव्हाण यांच्यावरच ठेवण्यात आला होता. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते चाचपणी करून कारवाई होणार होती पण ती अजूनही झालेली नाही.

त्यात गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, या भेटीत अन्औपचारीक चर्चाही झाली. तेव्हा तातडीने बातम्या आल्या काँग्रेसमध्ये फुट पडणार, या दोन्ही नेत्यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा दोघांची उत्तरं वेगळी होती. त्यात चव्हाण भाजपसोबत लवकरच जाणार असे दावे शिंदे गटातील मंत्र्यांनी देखील केले आहेत. 

काही दिवसांपुर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी चव्हाण भाजपमध्ये जाणार आसल्याची कुजबूज सुरू असल्याची माहीती चव्हाण यांच्या जवळच्या आमदाराने दिली असं म्हणत गौप्यस्फोट केला होता.

तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणूकीपुर्वी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील असा दावा केला होता. अशोक चव्हाण यांच्याकडे पक्षातील कुठलच महत्वाचं पद देखील नाही. काँग्रेसचे जेष्ठ नेते असुनही त्यांना प्रदेशाध्यक्ष पदापासुन दुर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळेही ते नाराज असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. त्यातच आता नांदेड जिल्ह्यात बीआरसने एन्ट्री केली आहे. त्यामुळे त्यांची अधिकच कोंडी झालेली पहायला मिळतेय आणि या कारणामुळे जर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर त्यांच्या सोबत समर्थक आमदारही काँग्रेसला रामराम ठोकुन भाजपमध्ये जावू शकतात, अशी चर्चा आहे.

यात दुसरं आघाडीवरचं नाव म्हणजे विश्वजीत कदम 

काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव असलेले विश्वजीत कदम हे काँग्रेसला राम राम करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. त्या चर्चा थांबत नाहीत तोवर पुण्यात एका कार्यक्रमात विश्वजीत कदम चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. 

शरद पवारही त्याच गाडीतून फडणवीसांसोबत आले होते. असे असतानाही त्यांच्याकडे कानाडोळा करुन विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते आपल्या गळाला लावून घेतले होते. भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली होती, मात्र या लाटेत देवेंद्र फडणवीसांच्या हाती काँग्रेसचे काही मातब्बर नेते शर्थीचे प्रयत्न करूनही लागू शकले नव्हते. या नेत्यांमधलं एक नाव होतं काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम.

देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदम यांना पक्षात खेचण्याचा मोठा प्रयत्न केला होता. मात्र वडिलांपासून चालत आलेले काँग्रेसचे विचार आणि शिकवण यामुळे विश्वजित कदम यांनी काँग्रेससोबत राहणं पसंत केलं.

पण पुण्यातल्या कार्यक्रमात मात्र विश्वजीत कदम फडणवीसांच्या पाया पडले. त्यानंतर विश्वजित कदम भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली, पण या चर्चांचं त्यांनी खंडण केलं.

पण या सगळ्यात मुद्दा उपस्थित झाला तो विश्वजित कदमांच्या सासऱ्यांचा. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीआयएल ग्रुपचे सर्वेसर्वा अविनाश भोसले हे विश्वजित कदम यांचे सासरे. हेच अविनाश भोसले गेल्या वर्षभरापासून ईडीच्या कोठडीत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना एबीआयएलचे संचालक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीच्या फेऱ्या लागल्या होत्या. २६ मे २०२२ रोजी भोसले याना ईडीने ताब्यात घेतलं. त्यामुळे सासऱ्यांना दिलासा देण्यासाठी विश्वजित कदम भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आजही होते.

तिसरं नाव येतं ते देशमुख बंधुंचं 

लातुरचे प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आपलं राजकीय वर्चस्व आणि सत्ता असावी यासाठी भाजपच्या वाटेवर असल्याचं काही दिवसापुर्वी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हणलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्र काँग्रेससह लातुरमध्ये खळबळ उडाली होती. २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत लातूर ग्रामीणच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांनी फिक्सिंग केली असा आरोपही त्यांनी केला होता. 

मुंबईमधील एका जागेच्या बदल्यात ही जागा भाजपनं शिवसेनेला सोडली. पण शिवसेना या जागेसाठी ताकदीने लढली नाही आणि धीरज देशमुख यांना अप्रत्यक्षरित्या पाठींबा दिला. धीरज देशमुख हे एक लाखापेक्षा आधिक मतांनी विजयी झाले आणि युतीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला असा थेट आरोप निलंगेकरांनी केला होता. अमित देशमुख यांनी देशमुख वाडा तिथचं राहील म्हणत या चर्चांना पुर्ण विराम दिला असला, तरी अधूनमधून देशमुख बंधू वेगळा विचार करतील असं बोललं जातं. 

चौथं नाव म्हणजे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने ते नाराज आहेत, अशा बातम्या आल्या. विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड निवडून आले. 

या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं. नाराज असलेले चंद्रकांत हंडोरे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जाऊ लागलं. हंडोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, काँग्रेसनं मला सगळं काही दिलं आहे. त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही, असं विधान केलं. पण विधान परिषद निवडणुकीत स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्यानंतर हंडोरे  नाराज असल्याची चर्चा आजही रंगते.

पाचवं नाव येतं आमदार शिरीष चौधरी

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघाचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. 

‘मला भाजपमध्ये या म्हणून भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन येत होते. मात्र मी भाजपमध्ये जाणार अशी कुठलीही परिस्थिती सध्या नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा ठेवून आम्ही काम करतो आहे,’ असं स्पष्टीकरण आमदार शिरीष चौधरी यांनी दिलं, पण ‘अशी काही भूमिका घेतली तर मी त्याबाबत स्पष्ट सांगेल’ असं म्हणत शक्यताही कायम ठेवल्या. चौधरी अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात, जेव्हा अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या त्याचवेळी शिरीष चौधरी यांनाही ऑफर येत होत्या असं म्हणणाऱ्या चौधरींनी भाजपची दारं पूर्णपणे बंद केलेली नाहीत, एवढं नक्की. 

सहावं नाव येतं, आमदार धीरज लिंगाडे 

अमरावती पदवीधर मतदार संघाचे लिंगाडे हे पदवीधर निवडणूक झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम बघुन आणि त्यांना मिळत असलेला वाढता पाठींबा बघुन लिंगाडेही लवकरच भाजपमधे प्रवेश करतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. 

त्यात पदवीधर निवडणूकीच्या अगोदर धीरज लिंगाडे यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती, ज्यात अपक्ष उमेदवार शरद झांबडेंसोबत बोलताना काँग्रेस पक्ष हा बोगस आहे असं लिंगाडे म्हणत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे रवी राणा यांनी केलेल्या दाव्याला अधिक महत्व प्राप्त होतं आणि लिंगाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण येत राहतं.

बर हे सहाच नेते नाहीत तर ही खुप मोठी यादी आहे. अशोक चव्हाण जर भाजपमध्ये गेले तर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार चव्हाण यांच्या बरोबर जातील तसेच चव्हाण यांचे बाकी समर्थक आमदारही भाजपची वाट धरू शकतात. 

त्यात हे सहा नेते जाण्याच्या फक्त शक्यता असल्या तरी काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्यामुळे काँग्रेस फुटीला सुरवात झाली आहे, अशी चर्चा आतापासून सुरु झाली आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.