इमरान नव्हे, ‘तालिबान खान’ !

 

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूक निकालांच्या हाती आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ‘तेहरिक-ए-इंसाफ’ या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा इमरान खान हे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत. १९९६ साली ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या राजकीय पक्षाची स्थापना करून इमरान खान यांनी पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश केला होता.

इमरान यांनी आपली पहिली निवडणूक १९९७ साली लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २००२ सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना विजय मिळाला. मात्र या निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षामार्फत निवडून आलेले ते एकमेव उमेदवार होते. २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुका मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरल्या होत्या. या निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला होता.

पाकिस्तानी सैन्याचा आणि कट्टरपंथीयांचा पाठींबा

पाकिस्तानातील बहुतांश राजकारण हे पाकिस्तानी सैन्याच्या इशाऱ्यावरूनच होतं. पंतप्रधानपदावर कुठलाही नेता असो, सत्तेची सूत्रे अप्रत्येक्षपणे सैन्याच्याच हातात असतात. इमरान खान हे सैन्याच्या जवळचे मानले जातात. त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची वाट मोकळी करून देण्यात सैन्याचा मोठा वाटा राहिलेला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पदावरून पायउतार होऊन त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावण्याच्या प्रक्रियेत इमरान खान यांच्या एवढीच पाकिस्तानी सैन्याची देखील भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता सैन्याचं वर्चस्व पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती राजकीय तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतेय.

imran khan 2
Twitter

आपल्या राजकीय प्रवासात ते कायमच अमेरिकाविरोधी राजकारण करत आलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकरणात त्यांनी अमेरिका विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या बऱ्याचशा भूमिका इस्लामिक कट्टरतावादाच्या समर्थक राहिलेल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानातील कट्टरपंथीय शक्तींना ते जवळचे वाटतात. कट्टरपंथीय शक्तींशी आणि तालिबानशी असलेल्या त्यांच्या याच जवळीकीमुळे पाकिस्तानातील विरोधी पक्ष त्यांना ‘तालिबान खान’ म्हणून देखील संबोधतात.

वादग्रस्त वैयक्तिक आयुष्य

इमरान खान यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय वादग्रस्त राहिलेलं आहे. पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटर कासीर उमर यांनी इमरान यांच्यावर  ड्रग्स सेवनाचे आरोप केले होते. इमरान यांच्यासह पाकिस्तानच्या संघातील इतर अनेक खेळाडूंवर देखील उमर यांनी हे आरोप केले होते. त्यावेळी मोठाच वाद निर्माण झाला होता पण पुढे हे प्रकरण दाबण्यात आलं.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर युनिस अहमद यांनी इमरान यांच्यावर अय्याशीचे आरोप देखील केले होते. १९८७ साली भारतातील कोलकाता कसोटीनंतर इमरान यांच्याच २ मैत्रिणींनी पाकिस्तानी खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या एका पार्टी दरम्यान इमरान यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याची गोष्ट आपल्याला समजली होती, असं युनिस अहमद यांनी म्हंटल होतं.

imran khan 3
डावीकडून झीनत अमान, बेनझीर भुट्टो आणि सीता व्हाईट

इमरान यांच्या दुसऱ्या पत्नी रेहम खान यांनी देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. इमरान कधीही प्रामाणिक नव्हते आणि त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा रेहम यांनी आपल्या पुस्तकातून केला होता. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, भारतीय अभिनेत्री झीनत अमान आणि सीता व्हाईट यांच्याशी त्यांच्या अफेयरचे अनेक किस्से आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना बेनजीर भुट्टो आणि इमरान खान यांच्यात जवळीक होती याची कबुली इमरान यांनीच आपल्या आत्मचरित्रात दिली होती. सीता व्हाईट यांनी देखील इमरान यांच्यापासून आपल्याला एक मुलगी असल्याचा दावा केला होता. आधी इमरान यांनी हा दावा फेटाळला होता, पण पुढे ‘डीएनए टेस्ट’मध्ये इमरान हेच सीता व्हाईट यांच्या मुलीचे वडील असल्याचं सिद्ध झालं होतं.

इमरान यांची आतापर्यंत ३ लग्न झालेली आहेत. १९९५ साली त्यांचं पहिलं लग्न ब्रिटीश पत्रकार जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबर झालं. हे लग्न जवळपास ९ वर्षे टिकलं. त्यानंतर या दोघांचा २००४  साली घटस्पोट झाला. २०१४ साली त्यांनी पाकिस्तानी टीव्ही पत्रकार रेहम खान यांच्याशी लग्न केलं, परंतु हे लग्न फार काळ टिकलं नाही.

फेब्रुवारी २०१८ साली साली त्यांनी आपल्या अध्यात्मिक गुरु बुशरा मानिका यांच्याशी लग्न केलं. इमरान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यासाठी त्यांचं तिसरं लग्न होणं आवश्यक आहे, अशी भविष्यवाणी  मानिका यांनी केली होती. त्यामुळेच इमरान यांनी हे लग्न केल्याचं सांगण्यात येतं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.