एका पत्रकार असा नडला की मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला..
अंतुलेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, याची आपल्यापैकी बहुतेकांना कल्पना असेलच.
पण अंतुलेंच्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण बाहेर काढलं होतं ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक अरुण शौरी यांनी.
अरुण शौरी यांनी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ मधील सिमेंट घोटाळयाविषयीचा वृतांत ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये छापले होते. अरुण शौरींचे हे लेख प्रकाशित झाल्यानंतर देशभरात एकच हल्लकल्लोळ माजला होता. शेवटी अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अंतुलेंचं हे सिमेंट घोटाळा प्रकरण भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात ‘भारताचं वॉटरगेट स्कँडल’ आणि ‘अंतुले वॉटरगेट स्कँडल’ या नावाने प्रसिद्ध आहे.
वॉटरगेट प्रकरण इतकं गाजलं होतं की रिचर्ड निक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे शोध पत्रकारितेत या प्रकरणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. अंतुलेंना देखील अरुण शौरी यांच्या वृत्तांकनामुळेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अंतुलेंचा सिमेंट घोटाळा नेमका होता तरी काय..?
आणीबाणीनंतर देशात स्थापन झालेल्या जनता सरकारचा प्रयोग फसल्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुरोगामी लोकशाही दल’ अर्थात ‘पुलोद’चं सरकार बरखास्त केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता.
इंदिरा गांधींनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अब्दुल रहेमान अंतुले यांच्या खांद्यावर सोपवली होती. मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच अंतुलेंनी कामाचा धडाका लावला होता. पण त्यांनी अजून एक काम केलं होतं, ते म्हणजे त्यांनी काही ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टचं काम निधी गोळा करणं होतं. त्यापैकीच एक ट्रस्ट होतं ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’
दरम्यान ३१ ऑगस्ट १९८१ रोजीच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अंकात एक सविस्तर रिपोर्ताज प्रकाशित करण्यात आला होता.
‘एक्स्प्रेस’चे तत्कालीन संपादक अरुण शौरी यांनीच हा वृत्तांत तयार केला होता. या वृत्तांतामधून अरुण शौरी यांनी अंतुलेंच्या विविध ट्रस्टमधील भ्रष्टाचाराची तपशीलवार माहिती दिली होती. अंतुलेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या ट्रस्टसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमवल्याचा ठपका शौरी यांनी अंतुलेंवर ठेवला होता.
‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’साठी अनेक कंत्राटदारांकडून निधी गोळा करण्यात आला होता. त्या बदल्यात त्यांना मोठ्या प्रमाणात सिमेंटचा पुरवठा करण्यात आल्याचा खुलासा शौरी यांनी केला होता. त्यावेळी सिमेंटची खरेदी-विक्री राज्य शासनाच्या आखत्यारीत येत असे.
याच गोष्टीचा फायदा उचलत अंतुलेंनी प्रतिष्ठानला निधी पुरवणाऱ्या कंत्राटदारांना सिमेंटची उपलब्धता करून देताना त्यांच्यावर मेहेरनजर होईल, याची काळजी घेतली होती. अनेक कंत्राटदारांना त्यांच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळवताना देखील फायदा मिळवून देण्यात आला होता.
त्याबदल्यात कंत्राटदारांकडून ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ला जवळपास ५.२ कोटी रुपये आणि एकूण ७ ट्रस्टमध्ये मिळून ३० कोटी रुपये निधीच्या स्वरुपात मिळाले असल्याचा दावा अरुण शौरी यांच्या वृत्तांतामध्ये करण्यात आला होता.
राम जेठमलानी एक रुपया देखील न घेता अंतुले यांच्या विरोधात केस लढवली.
अरुण शौरींचा वृत्तांत प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्रीय राजकारणात एकच गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी काँग्रेसला धारेवर धरलं. संसदेत या मुद्द्यावर घमासान झालं. वाद इतका वाढला की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रतिष्ठानच्या नावातील ‘आपलं नाव’ काढावयास सांगितलं.
प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं. प्रख्यात विधीज्ञ राम जेठमलानी एक रुपया देखील न घेता अंतुले यांच्या विरोधात केस लढवली आणि न्यायालयाने या प्रकरणात अंतुलेंना दोषी ठरवलं. मोठ्या प्रमाणात दबाव वाढल्याने शेवटी अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंतुलेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. बरेच दिवस केस चालल्यानंतर शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सक्षम पुराव्यांच्या अभावी अंतुलेंची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली.
या नंतर अंतुले यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातील महत्व कमी झालं ते कायमचं. पण त्यांना खुर्चीतून पाय उतार करणारे अरुण शौरी मात्र राजकारणात गेले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात महत्वाचे मंत्रिपद देखील भूषवले.
हे ही वाच भिडू
- हिकडे दादा घोड्यावर बसून राहिले आणि तिकडे अंतुले मुख्यमंत्री झाले !!
- वसंतरावांनी शपथविधीचा सुट शिवला अन कन्नमवारांनी एका फोनवर बाजी मारली !
- महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता.
- विनोदी पण दिलखुलास मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले.