राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक…!!!

४ एप्रिल पासून ऑस्ट्रेलियातील ‘गोल्ड कोस्ट’ येथे सुरु झालेल्या २१ व्या राष्ट्रकुल  स्पर्धांचा दिमाखदार समारोप सोहळा १५ एप्रिल रोजी पडला. या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकासह भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रकूल स्पर्धांच्या इतिहासातील भारताची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकूण १९८ पदकांसह ऑस्ट्रेलिया पदकतालिकेत पहिल्या तर १३६ पदकांसह इंग्लड दुसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेतील काही घटना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत आश्वासक राहिलेल्या आहेत. अशाच काही घटनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप..

सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं पदक

या स्पर्धेसाठी भारताकडून पुरुष आणि महिला प्रकारात १२ कुस्तीपटूना पाठवण्यात आलं होतं. या १२ ही खेळाडूंनी स्पर्धेत भारतासाठी पदकाची कमाई केली. सुमित मलिक, राहुल आवारे, बजरंग, सुशील कुमार आणि विनेश फोगट यांनी सुवर्णपदक जिंकलं, तर मौसम खत्री, बबिता खत्री, पूजा धांडा यांनी रौप्यपदक आणि साक्षी मलिक, दिव्या किरण आणि सोमवीर  यांनी कांस्यपदक मिळवलं.

बॅडमिंटन महिला दुहेरीचा ऐतिहासिक अंतिम सामना

       बॅडमिंटन महिला दुहेरीचा अंतिम सामना ऐतिहासिक ठरला. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू अशा दोन भारतीय खेळाडूंमध्ये ही अंतिम लढत पार पडली. ही लढत भारतीय रसिकांसाठी निव्वळ मेजवानी ठरली. मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी भारताचं सुवर्ण आणि रौप्य ठरलेलंच होतं. यात सायनाने सिंधूला हरवत सुवर्ण जिंकलं, सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सायनाचं हे राष्ट्रकूल स्पर्धांमधलं दुसरं सुवर्ण ठरलं. यापूर्वी तिने २०१० दिल्ली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कमावलं होतं.

या प्रकारांमध्ये ऐतिहासिक सुवर्ण

       नीरज चोप्रा हा राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासात भालाफेकीत सुवर्ण पटकावणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना ८६.४७ मीटर भाला फेकला. विशेष म्हणजे हरयाणाचा नीरज हा फक्त २०  वर्षाचा आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत अॅथलेटीक्समध्ये  पदक मिळवणारा तो मिल्खा सिंग (१९५८) आणि विकास गौडा (२०१४) यांच्यानंतरचा तिसराच खेळाडू ठरला.

manika batra

२२ वर्षीय माणिका बात्रा हिने सिंगापुरच्या मेंग्यू यू हिचा पराभव करत टेबल टेनिस महिला एकेरी प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारची कामगिरी करणारी ती स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. या वर्षीची राष्ट्रकूल स्पर्धा मणिकासाठी स्वप्नवत ठरली. या स्पर्धेत तिने ४ पदकांची लयलूट केली.  

पाच वेळची जागतिक चॅम्पियन आणि ऑलिम्पिक कांस्य विजेती मेरी कॉमने आयर्लंडच्या क्रिस्टीना ओहारा हिचा पराभव करत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. हे देखील भारतीय महिला खेळाडूने बॉक्सिंगमध्ये मिळवलेलं पाहिलं सुवर्ण ठरलं.

या प्रकारांमध्ये ऐतिहासिक रौप्य

       बॉक्सर सतीश कुमार याने ९१ किलो वजनगटात तर मनीष कौशिक यानं ६० किलो गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात हेविवेट आणि लाईटवेट बॉक्सिंगमधलं भारताला मिळालेलं हे पहिलंच पदक. त्याचवेळी चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि सात्विक रानकिरेड्डी या जोडीनं पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये आणि दीपिका पल्लीकल आणि सौरव घोष या जोडीने स्कॅश मिश्र दुहेरीमध्ये भारताला स्पर्धेच्या इतिहासातील या दोन्ही प्रकारातील पहिलं रौप्य मिळवून दिलं.

अनिश भानवाला- सर्वात तरुण राष्ट्रकुल पदक विजेता

anish bhanwala

       हरयाणाचा १५ वर्षीय अनिश भानवाला हा राष्ट्रकूल स्पर्धेत पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. ‘२५ मीटर रॅपीड फायर पिस्टल फायनल्स’ प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकत हा विक्रम आपल्या नावे केला. १५ वर्षीय अनिशला या स्पर्धांमुळे आपली दहावीची परीक्षा देता आली नाही. सीबीएसइने त्याची नव्याने परीक्षा घेणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.