गांधींच्या सावलीप्रमाणे राहणाऱ्या डॉ.सुशीला नायर गांधींच्या मृत्युनंतर कुठे गेल्या?

गांधीसोबत अनेक फोटोंमध्ये झळकणाऱ्या डॉ. सुशीला नायर यांनी स्वतंत्र भारताच्या स्त्री चळवळीची पायाभरणी केली होती.

महात्मा गांधीचं नाव गुगलवर सर्च केलं की त्यांचे अनेक फोटो आपल्यासमोर येतात. या फोटोंमध्ये गांधीजींच्या बाजूला एक महिला मात्र अनेकदा दिसते. गांधीजींच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांपासून ते नथुराम गोडसेंनी गांधींना गोळी मारली त्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असणारी ही व्यक्ती म्हणजेच डॉ. सुशीला नायर.

सुशीला नायर यांना गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या वयक्तिक डॉक्टर म्हणून आपण ओळखतो. पण सुशीला नायर हे व्यक्तिमत्व आणि त्यांची कारकीर्द याहीपेक्षा खूप मोठी आहे.  डॉ. सुशीला नायर यांचा दुसरा परिचय म्हणजे त्या ‘भारताच्या पहिल्या महिला आरोग्यमंत्री’ होत्या. शिवाय समाजसेवक आणि स्त्री चेतना घडवण्याची आवड असलेल्या स्त्री होत्या.

आपल्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ जरी गांधीजीच्या सोबत गेला असला तरी गांधीच्या सावलीप्रमाणे राहणाऱ्या सुशीला गांधींच्या हत्येनंतर कुठे गेल्या, याचा कधी विचार केला का?

गांधीच्या हत्येनंतर डॉ. सुशीला नायर यांनी राजकारणाचा रस्ता धरला. स्वतंत्र भारतातील त्यांचा राजकीय प्रवास 1952 मध्ये सुरू झाला. पहिल्या सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. नंतर त्यांना दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी मिळाली. सुशीला नायर यांनी 1956 पर्यंत स्वतःला दिल्लीच्या राजकारणात सक्रिय ठेवले. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर झाशीतून तीनदा निवडणूक जिंकत चौथ्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर त्या संसदेत पोहोचल्या.

माणूस कुठेही गेला तरी त्याचा मुळ पेशा तो सोडत नाही म्हणतात ना, असंच काहीसं डॉ. सुशीला नायर यांच्याही बाबतीत राहिलं. पेशाने डॉक्टर असल्याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी जास्त लक्ष दिलं ते स्वतंत्र भारताच्या सार्वजनिक आरोग्यावर. वर्धा, झाशीसह देशातील अनेक भागात रुग्णालये त्यांनी बांधली. फरीदाबादमध्ये ट्यूबरक्लोसिस सेनेटोरियम बांधले. शिवाय डॉक्टरकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावं लागू नये म्हणून भारतातंच सार्वजनिक आरोग्य आणि औषधोपचारासाठी शैक्षणिक संस्था उभारण्यावर त्यांनी भर दिला.

गांधीजींच्या सोबत राहिल्याने त्यांच्या विचारांचा सुशीला नायर यांच्यावर प्रभाव होता. तसंच गांधींच्या तत्त्वांना पुढे नेण्यातही त्यांचा विश्वास होता. त्याचनुसार डॉक्टरकीचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी ग्रामीण भारतात सेवा देण्यासाठी प्रेरित केलं. असं असलं तरी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक सेवेचा हा फक्त एक पैलू आहे. ज्यामध्ये डॉ. सुशीला  सार्वजनिक आरोग्यासाठी पूर्णपणे समर्पित होत्या.

डॉ. सुशीला नायर यांच्या राजकीय कारकीर्दीचा दुसरा पैलू त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांमध्ये झळकतो. लोकसभेच्या सांसद असताना त्यांनी स्त्रियांच्या अस्तित्वाला घेऊन अनेक प्रश्न मांडले. स्वतंत्र भारतात अनेक बदल घडवून आणनं तेव्हा गरजेचं होतं. संविधानाने जरी स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात कमतरता होती.

अशात महिलांना राजकीय आणि सामाजिक हक्क मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. महिलांना त्यांनी कमावलेल्या पैशांचा अधिकार का नाही?  सगळीकडे पुरुषांना प्राधान्य दिलं जातं आणि महिलांना दुर्लक्षित केलं जातं असं का? स्त्रियांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी पुरुषांमध्ये स्त्री चेतनेचा लोकशाही पद्धतीने विकास का होत नाही?  महिला राजकारणी केवळ राजकीय जाणिवेतून महिलांच्या सामाजिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करू शकतील का, त्यासाठी सामाजिक भान निर्माण करण्याची गरज नाही? असे अनेक प्रश्न त्यांनी ठणकावून संसदेसमोर उपस्थित केले. सुशीला नायर यांनी उपस्थित केलेले हेच प्रश्न आजही अनेक महिला चळवळी, महिला संघर्षाचा आवाज आहेत.

राजकारणात महिलांचं नेतृत्व करणारं तडफदार व्यक्तिमत्व म्हणून इतिहास डॉ. सुशीला नायर यांच्याकडे पाहतो.

डॉ. सुशीला यांना आयुष्यभर त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाण होती. लोकशाही देश बनवण्याची त्यांची धडपड अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी चालू ठेवली. जग जेव्हा नवीन दशकात प्रवेश करत होतं आणि भारतातही स्त्री चळवळी उभारी घेत होत्या तेव्हा नवीन पिढीकडे जबाबदारी सोपवून डॉ. सुशीला नायर यांनी ३ जानेवारी २००१ रोजी जगाचा निरोप घेतला. पण स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या डॉ. सुशीला नायर यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा, सामाजिक योगदानापेक्षा गांधींच्या वयक्तिक डॉक्टर म्हणून आपण सहज डावलतो याची खंत वाटते. मात्र इतिहासाने त्यांची यथायोग्य दखल घेतली आहे, हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.