सगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि…. 

फेसबुक मेमरीनं सगळ्यांच भलं केलं आहे. सकाळी फेसबुक मेमरी दिसते आणि आपण त्या जगात जातो. फेसबुकचं पाच-सहा वर्षांपुर्वीच ते जग.

तेव्हा आपल्या फ्रेंन्डलिस्टमध्ये साताऱ्याची ‘परी’ होती, आई वडिलांची लाडकी ‘सोनू’ होती. थेट ब्राझीलमधून आपल्याशी भारतीय वेळेत बोलणारी ‘क्रिस्तिना’ होती. पाकिस्तानचा बदला घ्यायचा म्हणून वाघा बॉर्डरच्या पार असणारी ‘बेगम’ होती. अशा कित्येक पऱ्या प्रत्येकाच्या फ्रेंन्डलिस्टमध्ये होत्या. काळ गेला आणि या पऱ्या गायब झाल्या. म्हणजे त्या अजूनही आहेतच, पण आता फक्त त्या मेमरीतून दिसतात. कधीतरी एखाद्या रात्री आपल्याला त्यांच्यासोबतचं चॅटिंग आठवायचं. आपण त्यांच्या वॉलवर जायचो पण तिथे काहीच दिसायचं नाही. पण ते अकाऊंट तिथं असायचं. जुने चॅट असायचे. काल परवा फेसबुकने तब्बल ५८.०२ कोटी फेक अकाऊंट डिलीट केले. यात कित्येकांच्या पऱ्या गेल्या आणि जाणीव झाली ती दुखाची.  या दुखावर फुंकर घालण्यासाठीच बोल भिडूच्या “काळजाच्या डॉक्टरचा” हा लेख…

“रुख्साना शेख” असंच काहीसं नाव होतं तिचं. पाकिस्तानी होती ती. म्हणजे तस तीनं तीच्या वॉलवर लिहलं होतं. तीचं शहर लाहोर. आत्ता कुठं समजतय की कोणत्याही भारतीयाला पाकिस्तानबद्दल असणारी माहितीच तीच्या वॉलवर होती. बस्स याहून विशेष असं काहीच नव्हतं. एके दिवशी तीची रिक्वेस्ट आलेली. हा तोच काळ होता जेव्हा वर्गातली निम्याहून अधिक मुलं, ग्रुप गेला म्हणून BCA ला जात होती. अशा निराशेच्या काळात मला थेट पाकिस्तानातून रिक्वेस्ट आलेली. सेंकदाच्या दहाव्या भागात मी ती अॅक्सेप्ट केली होती. त्यानंतर तीची वॉल पाहीली. गुलाबाची आणि मोगऱ्याची फुलं, सेंन्टच्या बाटल्या, मोरपीसाचं कानातलं. कित्येत गोष्टी होत्या तीच्या वॉलवर. ती लाहोरच्या प्रसिद्ध कॉलेजात होती. तसं तीनं तीच्या ‘अबाऊट’मध्ये लिहलेलं होतं.

इतक्यात तीनं माझा फोटो लाईक केला. वाह…मन भिरभिरून गेलेलं. इतक्यात तीनं माझ्या फोटोला ‘नाईस’ म्हणून कमेंट केली.  मी ‘हाय’ म्हणालो. आत्तासारखे मॅसेंजरचे दिवस नव्हते ते. ओपेरा मिनीतून मॅसेज जात. लोड झालेली पट्टी डावीकडून उजवीकडे हळूहळू सरकत जात. मॅसेज पोहचला की वाट बघत बसायचं. चटचट चॅंटिंगचा तो काळ नव्हता त्यामुळं प्रत्येक शब्द विचार करुन बाहेर पडायचा. मला वाटलं तीचा रिप्लाय येईल पण नाही आला. त्यानंतरचे दोन-चार दिवस असेच गेले. अचानक एक दिवस तीचा रिप्लाय आला.  हाय…! मी लगेच ‘हाय’ ठोकलं.

सुरवात झाली ती इंग्लीशमधून तीचं इंग्लीश आफ्रिदीपेक्षा वाईट होतं. नंतर आम्ही हिंदीत बोलायला लागलो. म्हणजे आम्ही दोघंही हिंदीच बोलत होतो पण ती तीच्या हिंदीला उर्दू म्हणत होती. रात्रभर जागून मी तीच्यासोबत बोलू लागलो. ती दिवसभर कॉलेजात काय-काय  झालं ते सांगू लागली. मी तिचे प्रश्न सोडवू लागलो. मैत्रीण कशी भांडली  हे ती सांगू लागली की आत्ता काय करायचं हे मी तिला सांगत असे. भारतल्या नव्या पिक्चरची नाव तिला सांगत असे. भारत पाकिस्तानच्या मॅचदरम्यान आम्ही तासनतास बोलत असू. पाकिस्तानचे प्लेअर पहिल्यांदा तीच्यामुळेच माहित झाले. याच दरम्यान पावसाळा चालू झाला. घरात भजी केले की मी तीला भज्यांचे फोटो पाठवत असे. मग मी तीला कुठला पदार्थ कसा करतात ते सांगू लागतो. ती मला तीनं केलेलं चिकन पाठवायची. सगळं कसं सुखात चालू होतं. अशा काळात मी तिला मॅसेज केला, “ तुझे फोटो पाठव”.

तुम्मै क्या मतलब, मैनू नहीं देना.. तीनं नकार दिला. पण मी ठेका सोडला नाही. मग तीनं तीच्या पायांचा फोटो पाठवला. एब्रॉयडरी केलेल्या सलवारवरचं ते चांदिचं पैंजण. त्यात हिरवे, निळे, गुलाबी खडे होते. अजूनही तो फोटो माझ्याकडे आहे. बस्स तोच काय तो एक फोटो. सगळं चांगल चालू होतं. प्रेमाच्या आणाभाका घेऊन पाकिस्तानची बॉर्डर कशी क्रॉस करायची हे देखील ठरवलं होतं. ते पण फेसबुकवरुन. अशक्यतेची जाणिव झाल्यानंतर आम्ही बॉर्डरच्या अलीपलीकडून एकमेकांना पहायचं कबूल केलं. तीनं होकार दिला. लाहोर राहिलं, पंजाबपर्यंत जाऊच हे पक्क झालं.

सगळं कसं गुलाबी-गुलाबी होतं. असंच एका रात्री तीला विचारलं जेवलीस का ? तर ती म्हणाली, “हो जेवलो”.

आपण तीला मराठी शिकवलं होतं पण थेट “जेवलो”. त्या रात्री संशयानं झोप लागली नाही. हळहळू संशय वाढत गेला. प्रेमाची जागा ‘फोटो पाठव’नं घेतली आणि संपत गेलं. अचानक नाही पण टप्याटप्यानं. आजही कधी-कधी तीच्या आठवणीच्या पोस्ट मेमरीत येतात. ओपेराच्या गर्तेत तीनं थेट वॉलवर टाकलेले मॅसेज दिसून जातात. तीच्या वॉलवर गेलो की लहान मुलींचे फोटो दिसतात. तीचं पैंजण त्या मुलींच्या पायात दिसतं. संशयाची जागा आठवणीनं घेतलेली असते. कधीकाळी एक हजारची नोट मिळाली होती, त्या नोटेवर तीचं नाव लिहलेलं. नोटांचं अस्तित्व संपलं तेव्हा देखील ती हजारची नोट सोबत होतीच. बाजारानं  खोटं ठरवलं असलं तरी ती आपल्यासाठी खरीच होती. आत्ता फेसबुकनं तीच्या अकाऊंटवर खोटेपणाचा शिक्का मारला. नोटांसारखंच तीला खोटं ठरवलं. तीचं अकाऊंट त्या साठ कोटींच्या गर्तेत बुडालं. तसंही हे जग अनेकदा प्रेमाला खोटं ठरवण्याच्या नादात असतंच की, तर हे पण सही…!

तसंही या खऱ्या-खोट्याच्या नादात ती माझ्यासोबत पाकीटातल्या जुन्या हजारच्या नोटेसारखी असणार आहे, हे काय वाईट आहे का ?

 • सौरभ पाटील (काळीज स्पेशलिस्ट ) 
13 Comments
 1. Sandipj430@gmail.com says

  Mast!

 2. Anonymous says

  ????

 3. snehal says

  ????

 4. Anonymous says

  ????????

 5. Anonymous says

  छान

 6. Moreshwar Patil says

  एक नंबर भाऊ……????

 7. Gajanan Mohite Patil says

  एक नंबर ????????

 8. ज्ञानप्रसाद says

  अहाहा….

 9. Anonymous says

  तीचं इंग्लीश अफ्रिदीपेक्षा वाईट होतं ????????????????

 10. मन्या says

  फडतूस पोस्ट आहे. फेसबुकवर पुड्या सोडणारे लोकच आता लेखक झालेत वाटते. हेच लेखकरावही होणार.

 11. Anonymous says

  CHAN

 12. Test says

  “Aaj bhi haan bol de toh Mahadev ki kasam wapas aa jayenge , Par Nai ab saala mood nahi, Ankhe band kar lene me hi sukh hai … so jane me bhalai hai,
  Par uthenge kisi din ganga kinare damru bajane ko unhi banars k galiyo me doub jane ko kisi ‘Zoya’ ke ishq me phir se padh jaane ko.. ! ”

  He he he he … ‘Zoya’

Leave A Reply

Your email address will not be published.