“आई” : सयाजी शिंदे.

आई ९७ वर्षं जगली. प्रत्येक क्षण मनापासून जगली. जग बदललं म्हणून कधी तक्रार केली नाही. खरतर तिच्या डोळ्यासमोर किती गोष्टी बदलत गेल्या. पिढ्या बदलत गेल्या. माणसांचे कपडे बदलत गेले. राहणीमान बदलत गेलं. पण आई तिच्या मनाप्रमाणे जगली. ती तिच्या देवांशी भांडायची. देवांवर रुसायची. देवाला कुणी एवढ माणसासारख वागवलेलं बघितलं नाही मी.

तिने मला जिद्दीने शिकायला लावलं. दुसऱ्या गावी पाठवलं. मी एकटा मावशीकडे राहिलो. शिक्षणासाठी. तिने माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. अर्थात डिग्री मिळवली, नौकरी केली किंवा अभिनेता झालो तरी मला काही कळत नाही असंच तिला कायम वाटत आलं.

प्रत्येक मुलाच्या आईसारखं.

एकदा एका मित्राच्या घरी नाश्ता करायला गेलो होतो. भरमसाठ पदार्थ आणून ठेवले होते. आई काही वेळ बघतच राहिली. तिने काही खाल्लं नाही. बाहेर आल्यावर विचारलं का जेवली नाहीस? तर सोबत आणलेल्या भाकरी काढल्या पिशवीतून. म्हणाली हे वाया गेलं असतं.

कुणी कितीही आग्रह केला तरी तिचं म्हणणं एकच. त्यांचं मन मोठं आसल पण आपलं पोट तेवढं मोठंय का? पोट आपलंय. आपल्याला कळाय पायजे ना. हॉटेल मध्ये एवढे पदार्थ बघून तर रागच यायचा तिला. फाईव स्टार हॉटेलमध्ये तर दरवेळी ती सूचना द्यायची. गरीबाला वाटा रे बाबा. पुण्य लागल.
हॉटेलच्या बाहेर शोभेची झाडं असतात. त्याची धड सावली सुद्धा नसते.

आई हॉटेलवाल्या लोकांना आवर्जून सांगायची, आरे जरा फळाचे झाडं लावा. चिक्कू लावा. आंबा लावा. लोकाला खायला होतेन. हे असले काय झाडं लावता? बिनकामाचे.

सतत बिया गोळा करायची. कुठं चांगला आंबा खाल्ला की कोय सोबत. तिने लावलेली कितीतरी झाडं आहेत. तिच्या आठवणी सावली देत राहणार.

आईला कधी आपण गावातले आहोत याचं दडपण नसायचं. तिच्या मनात येईल ते ती बिनधास्त बोलायची. मी साउथला कधी तिला शूटिंगला घेऊन जायचो. विमानात बसल्यापासून लोकांना तिची भाषा कळायला अडचण यायची. पण समोरच्याला कळत नाही याची तिला काही अडचण नव्हती. ती बोलत राहायची. कुठल्याही अनोळखी माणसाला ती कौतुकाने सांगायची. माझा मुलगा हिरोय. आपण ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल या गोष्टींचा विचार करत खूप गोष्टी मनातच ठेवतो. बोलत नाही. आईने असं कधी केलं नाही. जे वाटलं ते बोलून दाखवलं. तिची तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत होती याचं हे महत्वाचं कारण होतं असं मला वाटतं. अन्न कमी खायचं आणि मनाला अजिबात खायचं नाही असं साधं सोपं गणित होतं तिचं.

एकदा हॉटेलच्या बाथ टब मध्ये तिला आंघोळ करायला सांगितलं. तर त्या बाथ टब कडे बघून म्हणाली, मी काय म्हसय का? ह्या ढवात बसायला? ‘ तिने बादली मागवली. पाण्याची एवढी नासाडी तिला कधीच मान्य झाली नाही.नुसते उपदेश करणे ही वेगळी गोष्ट असते.

पण कुठला गाजावाजा न करता अशा गोष्टी अमलात आणणारी ही माणसं आता दुर्मिळ होत जाताहेत. एकदा असंच घरात टीव्ही चालू होता. संध्याकाळची वेळ. मनीषा कोईरालाचं का कुणाचं गाणं चालू होतं. आई म्हणाली, हिला आता सांच्यालाच टाईम भेटला का आसला धांगडधिंगा करायला? टाईम त बघाव जरा’ तिच्या जगाचे तिचे नियम होते.

एकदा निळू फुलेंसोबत होतो. आई गावाहून भेटायला आली. माझ्यासाठी घरून डबा घेऊन आली होती. महाद्या आणला होता मला आवडणारा. मी तिची निळू फुलेंशी ओळख करून द्यायला लागलो. तर म्हणाली ते फुलेला भेटू पुन्हा. आधी जेवून घे. निळू भाऊना आईचा हा स्वभाव एवढा आवडला की खुपदा ते बोलताना ही आठवण हमखास सांगायचे.

एकदा एक नाटक बघायला बसली होती. पहिल्या रांगेत. नायिका नवरा सोडून भलत्याच कुणाच्या प्रेमात पडलीय. त्याचा हात हातात घेते आणि इंटरवल होते. आईने तेवढ्यात मोठ्याने जांभई दिली.

‘ काय अवदसा सुचली बाई हिला आता?’

या वाक्यावर लोक जोरजोरात हसायला लागले. माझं एक नाटक बघायला आली होती. इंटरवल मध्ये वर आली. मला वाटलं नाटकाबद्दल बोलेल. तर म्हणाली fan लई आवाज करतोय. त्याचं बघ काहीतरी. तिचं लक्ष एसीच्या आवाजाकडेच होतं. मी अभिनेता आहे हेच तिला पुरेसं होतं. त्यापुढे पुन्हा काही कौतुक करायची तिला गरज नसायची.

तिच्याकडे खूप गोष्टी होत्या. गाणी होती. आठवणी होत्या. शेवटपर्यंत सगळं पाठ होतं तिला. मित्र घरून न जेवता चालले की आवडायचं नाही तिला. मित्र म्हणायचे, हॉटेलमध्ये जेवतो. पैसे द्या. तर म्हणायची पैशे नाही देणार. मी येते हॉटेलमध्ये. माझ्यासमोर जेवा. मी बिल देते. तुमचं काय खरंय? तिच्या अशा खूप गोष्टी आठवल्या की हसू येतं.

तिच्या आठवणी कधीच निराश करणाऱ्या नाहीत. कायम हसत हसत काहीतरी शिकवणाऱ्या आठवणी. आई अशीच आठवणीत असली पाहिजे. तिच्या आठवणी पण खूप काही शिकवणाऱ्या, खुदकन हसवणाऱ्या. झाडच असते आई. नेहमीच काहीतरी देत राहणारं. या मायेच्या सावलीत कशाला झळा लागतील? ती आठवणीत आसपास असली पाहिजे. चुकुनही कुठलाच दिवस तुझी आठवण आल्याशिवाय जात नाही. म्हणूनच चुकुनही काही चूक होईल असं वाटत नाही.

– सयाजी शिंदे. (दिनांक 13 मे 2018) 

Leave A Reply

Your email address will not be published.