ऑलिम्पिकमधील एकमेव क्रिकेट सामना खेळलेल्या संघाचा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभाग देखील नाही !

ऑलिम्पिक स्पर्धा.

क्रीडाविश्वातील कुंभमेळा. क्रीडा जगतातील कुठलाही खेळाडू असो, त्याचं स्वप्न असतं की देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकायचं !

क्रिकेट हा जागतिक क्रीडा विश्वातील एक महत्वाचा खेळ. पण आजघडीला तरी क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान नाही. बऱ्याच वेळा चर्चेचा धुराळा उठतो आणि तो जागच्या जागी स्थिर होतो.

असं असलं तरी तुम्हांला या गोष्टीची कदाचित कल्पना नसेल की आजवरच्या इतिहासात क्रिकेटचा एक सामना ऑलिम्पिकमध्ये खेळवला गेला होता. विशेष म्हणजे या सामन्यातील २ प्रतिस्पर्धी संघापैकी एक संघ तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग सुद्धा नाही.

साल होतं १९००.

फ्रांसमधील पॅरीस शहरात ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं !

या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला होता. खरं तर १८९६ सालच्या ऑलिम्पिकमध्येच  क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार होत्या पण पुरेशा संघांनी नोंदणी न केल्याने या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

१९०० च्या ऑलिम्पिकसाठी देखील फक्त ४ संघांनीच रस दाखवला होता. त्यात आयोजक फ्रांस, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम आणि हॉलंड यांचा समावेश होता. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच बेल्जियम आणि हॉलंड या संघांनी माघार घेतल्याने शेवटी फक्त फ्रांस आणि ग्रेट ब्रिटन हे दोनच संघ उरले.

त्यामुळे फ्रांस आणि ब्रिटन या दोन संघांदरम्यानच ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव क्रिकेट सामना खेळवला गेला.

ol2

खरं तर फ्रांस आणि ब्रिटनचे संघ देखील त्यांचे राष्ट्रीय संघ नव्हते, तर त्या दोन्ही देशांमधील क्लब क्रिकेटचे संघ होते. ब्रिटनचा ‘डेव्हन अँड सॉमरसेट वॉडरर्स क्लब’ आणि फ्रांसचा ‘फ्रेंच अॅथलेटिक क्लब युनिअन’. विशेष म्हणजे फ्रांसच्या संघातील बहुतांश खेळाडू हे ब्रिटीश वंशाचे होते.

१९ ऑगस्ट १९००.

याच दिवशी हा ऐतिहासिक सामन्याला सुरुवात झाली. १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवसांदरम्यान खेळवल्या गेलेल्या या सामन्याचं एक गमतीशीर वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही संघानी ऐनवेळी परस्पर सहमतीने संघात १२ खेळाडूंना स्थान देण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघाच्या कॅप्टनने घेतलेल्या या निर्णयामुळे स्कोअरकार्ड बनवणाऱ्यांची देखील अडचण झाली आणि अनपेक्षितपणे दोन्ही संघात आलेल्या या बाराव्या खेळाडूंचे नाव हाताने स्कोअरबोर्डमध्ये नोंदवायला लागलं.

ol1
वेल्ड्रोम डे व्हिन्चेसच्या याच मैदानावर सामना खेळविण्यात आला

तर अशा गमतीशीर पद्धतीने सुरु झालेल्या या सामन्यात प्रथम बॅटिंग करताना ग्रेट ब्रिटनच्या संघाने आपल्या पहिल्या डावात ११७ रन्स काढल्या. यात फ्रेडरिक कॅमिंगच्या सर्वाधिक ३८ रन्सचा समावेश होता. फ्रांसकडून विल्यम्स अँडरसनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

आपल्या पहिल्या डावात फ्रांसला फक्त ७८ रन्स काढता आल्या. त्या देखील १२ व्या क्रमांकावरील जे. ब्रेडच्या सर्वाधिक २५ धावांमुळे. ब्रिटनच्या फ्रेडरिक क्रिश्चनने ७ विकेट्स घेत ब्रिटनला ३९ रन्सची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ इथेच संपला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटनने आपल्या ३९ रन्सच्या लीडमध्ये १४५ रन्सची भर घालून आपला डाव घोषित केला. यात आल्फ्रेड बॉवरमनच्या ५९ आणि सी.बी.के. बीचक्रॉफ्टच्या ५४ रन्सचा समावेश होता.

१८५ रन्स चेस करण्यासाठी मैदानात आलेल्या फ्रान्सच्या संघाचा अवघ्या २६ धावांमध्ये खुर्दा पडला. या इनिंगमध्ये फ्रांसचं कंबरड मोडलं ते मोंट्यागू टोलर यानं. त्याने देखील पहिल्या डावातील आपला सहकारी फ्रेडरिक क्रिश्चनचा कित्ता गिरवत ७ फ्रेंच खेळाडूंना पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं आणि ब्रिटनला १५८ रन्सनी विजय मिळवून दिला.

‘वेल्ड्रोम डे व्हिन्चेस’ येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यानंतर विजेत्या ब्रिटनच्या संघाला रौप्यपदक तर फ्रान्सला कांस्यपदक बहाल करण्यात आलं. पुढे १९१२ साली ही पदके अनुकार्मे सुवर्ण आणि रौप्य अशी बदलण्यात आली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.