पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे ‘देशभक्त रत्नाप्पा कुंभार’ !

महाराष्ट्र राज्यात सर्वात सुपीक तालुका म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला ओळखलं जातं. निसर्गाने येथील जमिनीला भरभरून दिलं. कृष्णा पंचगंगेच्या पाण्यानं येथील मळे फुलले. आपल्या अपार कष्टाने ऊस शेती असो की भाजीपाला उत्पादन असो अनेक विक्रम या भागातल्या शेतकऱ्यांनी  प्रस्थापित केले. मात्र या शेतकऱ्यांच्या यशोगाथेत एका कुंभाराच्या पोराचा सिंहाचा वाटा आहे. रत्नाप्पा त्याचं नांव.

निमशिरगावच्या ‘भरमू’ कुंभाराने जिद्दीने आपल्या पोराला शिकवलं. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडं उघडून दिली होती. रत्नाप्पा कुंभार सारख्या अनेकांना त्याचा फायदा झाला. कोल्हापूरमध्ये राजाने  सुरु केलेल्या बोर्डिंगमध्ये राहून राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं. कायद्याचं शिक्षण सुरु होत.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

साल होतं १९३४. इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरूण आपलं शिक्षण सोडून या स्वातंत्र्याच्या यज्ञात उडी घेत होते. कोल्हापुरात देखील माधवराव बागलनी शेती आणि शेतमालाची ब्रिटीशांकडून होणाऱ्या लुटीबद्दल आपल्या  सभांमधून रान उठवलं होतं. याकडे आकर्षित झालेल्या रत्नापांनी शिक्षण सोडलं आणि ते माधवराव बागलांचे सहकारी बनले.

१९३८ साली त्यांनी कोल्हापुरात शेतसारा कमी करण्यासाठी आंदोलन केलं. पुढे यातूनच ‘संस्थान प्रजापरिषद’ हा पक्ष उदयास आला. संस्थांनी प्रजेचा आवाज म्हणून ही मंडळी काम करत होती. रत्नाप्पांसह माधवराव बागल, दिनकर देसाई या सर्व नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं.

१९४२ साली  गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. या अधिवेशनाला रत्नाप्पा देखील हजर होते. इंग्रजांनी जेव्हा हे आंदोलन चिरडण्यासाठी गांधी,नेहरू, पटेलांसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक केली, तेव्हा रत्नाप्पा तेथून सुटले आणि भूमिगत झाले. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश लक्षात ठेऊन रत्नाप्पानी लढा सुरु केला.

मिरजेजवळील मालगावच्या दंडोबाच्या डोंगराला त्यांनी आपलं केंद्र बनवलं आणि तेथून क्रांतीकार्य सुरु केलं.

पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसरकारचं कार्य जोरात सुरु होतं. त्याच धर्तीवर कुंभार आणि मंडळी काम करत होती. त्यांनी सरकारी कचेऱ्यांवर  हल्ले केले, तारा तोडल्या, रेल्वे स्टेशन जाळले.

यासाठी पैसा उभा करण्यासाठी सुप्रसिद्ध अशी ‘बार्शी ट्रेनची लुट’ घडवून आणली.

यावेळी सरकारी टपालासोबत शाळेतल्या मुलांचे काही सर्टीफिकेटसचे गठ्ठे या क्रांतिकारकांच्या हाती लागले. लढ्याच्या धामधुमीत ही माणुसकीचे दर्शन घडवत त्यांनी ते सर्टीफिकेट शाळेपर्यंत पोचते केले. रत्नाप्पा कुंभार यांच्यावर २०००० रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते, मात्र ते शेवटपर्यंत ब्रिटीश पोलिसांना सापडले नाहीत.

संविधान सभेचे सदस्य आणि संस्थानिकांच्या विलीनीकरणात भूमिका 

१९४६ साली भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या. स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यासाठी ‘संविधान सभे’ची स्थापना करण्यात आली. या असेम्ब्लीमध्ये जाण्याचा बहुमान रत्नाप्पा कुंभारांना मिळाला. डॉ.आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा बनवला. त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर  ३ वर्षे घमासान चर्चा केल्यावर अखेर घटना मंजूर झाली. रत्नाप्पांची सुद्धा या त्यावर सही आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर रत्नाप्पा कुंभार यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी खुद्द सरदार पटेलांनी टाकली. पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानिकांना भारतात विलीन करून घ्यायचं, हे खडतर आव्हान त्यांनी स्वीकारले.

राज्याच्या राजकारणात दुर्लक्षित

ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतरचा काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली. रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ करण्यात आले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करुन्न घेण्याच्या भूमिकेवर रत्नाप्पा ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांच्याच  मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली. अक्कलकोट आणि सावंतवाडी संस्थानाच्या विलीनीकरणावेळी थोडा गोंधळ झाला मात्र रत्नाप्पांच्या कुटनीतीच्या  कौशल्याने  ही संस्थाने यशस्वीरीत्या भारतात विलीन करून घेतली.

दिल्लीच्या वर्तुळापर्यंत आपले वजन निर्माण केलेले रत्नाप्पा राज्याच्या राजकारणात मात्र मागे पडले.

त्यांनी आपले सर्व लक्ष्य शिरोळ तालुक्याच्या उभारणीमध्येच घातले. १९५५ साली महाराष्ट्रातला दुसरा सहकारी  साखर कारखाना त्यांनी इचलकरंजी येथील कबनूरमध्ये सुरु केला.

पंचगंगा साखर कारखाना आला आणि सोबत विकासगंगा घेऊन आला.

भागात पिकणाऱ्या उसाला दर मिळाला. पाणी योजना आली. पक्के रस्ते आले. शेतमालाला भाव मिळवून देणाऱ्या रत्नाप्पांना शिरोळ-हातकणंगले भागातली जनता देव मानायला लागली.

सहकार क्षेत्रात रत्नाप्पांनी प्रयोग करायचा आणि अख्या महाराष्ट्राने त्याला फॉलो करायचं अशी प्रथाच पडली. त्यांनी सहकारी सूतगिरणी सुरु केली. सहकारी बँक सुरु केली. कोल्हापूर शहरात आणि परिसरातील खेड्यामध्ये शाळा कॉलेजेस सुरु केल्या.

fm 4 lrg
रत्नाप्पा कुंभार आणि यशवंतराव चव्हाण

सहकार क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी करूनही त्यांना कधी राज्यमंत्री पदाच्या वरचे पद मिळाले नाही. मुख्यमंत्री पदाची क्षमता असणे हाच त्यांच्या साठी मायनस पॉइंट ठरला. कायमच त्यांचे पाय खाली खेचण्याचे राजकारण स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्याच भूतपूर्व सहकाऱ्यांकडून करण्यात आले. शिरोळ तालुक्याच्या बाहेर डोके न काढू देण्यासाठी पद्धतशीर व्यूह रचण्यात आले. जातीचे समीकरण रत्नाप्पांच्या बाजूने नव्हते हे सुद्धा त्यांच्या राजकीय अपयशाचं एक कारण असू शकतं.

१९८५ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान केला.

त्याच वर्षी सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाने मानद डॉक्टरेट दिली. १९९८ साली वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

मरेपर्यंत ते शिरोळचे आमदार राहिले. त्यांनी स्वतःचे राजकीय वारस बनवले नाहीत, ना स्वतःचे सहकाराचे साम्राज्य बनवले. मात्र त्यांच्या विरुद्ध लढलेले सा.रे. पाटील असोत अथवा आज देशभर शेतकऱ्यांचा झेंडा खाद्यावर मिरवणारे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असोत या सर्वांनी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचाच वारसा जपलाय.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.