चेष्टा नाय, साऊथमधल्या या पोरग्याच्या वृक्षलागवडीच्या योजना महाराष्ट्र सरकारने घेतलेत.

जर डोक्यात एखाद वेड असेल तर त्यासाठी शिक्षण पणाला लावणारे, बसलेल्या करिअरची घडी मोडणारे, आपण क्वचित बघत असतो. अंग मोडून त्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या बदललेल्या ध्येयासाठी वाहून घेणे ही जोखीम काही जणचं स्वीकारतात आणि त्या दिशेनं प्रवास चालू करतात.

असाच एक उमदा तरुण आपली करिअरची घडी मोडून तब्बल ८० हजार कोटी वृक्ष लागवडीसाठी वेडा झालायं आणि त्यासाठीच्या प्रवासावर देखील निघाला आहे. या प्रवासात त्याचे मार्गदर्शक आणि गुरु आहेत जेष्ठ शास्त्रज्ञ आणि परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर.

मुळचा अंदमान – निकोबारच रहिवासी असलेला शण्मुख नाथन असं त्याच नाव. 

२००७ मध्ये तमिळनाडूतील रामनाथपूरम् जिल्ह्य़ातील हरियानकोटई या गावातून भाकरीसाठी मुंबईमध्ये दाखल झाला. चित्रपट सृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो काम करू लागला. आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावल्यावरही त्यामध्ये त्याच त्यामध्ये मन रमलं नाही.

अंदमान निकोबारच्या हिरवाईमध्ये वाढल्यामुळे मुंबईतील प्रदुषणाचा भस्मासुर आणि ढासळत चाललेलं पर्यावरण यामुळे चिंतित होत असे. यानंतर पर्यावरणाच्या ऱ्हासाची केवळ काळजीच न करता त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करण्याचा निर्धार त्याने केला आणि शबनम खांद्याला अडकवून चित्रपट सृष्टीतून २०१०-११ च्या दरम्यान बाहेर पडला.

वृक्षारोपणाच्या कायद्यासाठी प्रयत्न

सुरुवातीला देशात वृक्षारोपणाचा कायदा यावा, यासाठी नाथनने २०११ पासून प्रयत्न केले. अनेक राजकीय नेते व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाच्या कायद्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर त्याने स्वतःच वृक्षारोपणाच्या क्षेत्रात व्यापक कार्य करण्याचा निर्णय घेतला.

त्याच दरम्यान वृक्ष संवर्धनाच्या एका उपक्रमाबाबत नाथन मंत्रालयात गेला होता. तिथं त्याची डॉ. विजय भटकर यांच्याशी भेट झाली. मनातला संकल्प त्यांना बोलून दाखविला.

मला देशातल ८० हजार कोटी वृक्ष लावायचे आहेत, मी माझे उभे आयुष्य यासाठी वाहून घेणार आहे.

डॉ. भटकरांनी मार्गदर्शन तर केलेच सोबतच या कामाची सुरुवात अकोल्यापासून करण्याची गळ घातली.

त्यानुसार नाथनने अकोला जिल्हा गाठून वृक्षासंदर्भातील काम सुरु केले. काही लोकांनी जेवणाची व्यवस्था केली. बाजोरीया शाळेनी राहायची व्यवस्था केली. त्यानंतर झपाट्याने त्याने शाळांवर लक्ष केंद्रीत करुन लहान मुलांमध्ये वृक्षाविषयी प्रेम आणि आकर्षण निर्माण केले.

शासनाकडून होत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही, हे नाथनने जिल्हा प्रशासनाला पटवून दिले. अकोल्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा प्रशासनानेही त्याच्या प्रयत्नाला साथ दिली. बघता बघता नाथन अकोला जिल्ह्यात लोकांचा प्रेरणास्रोत झाला. भारत वृक्ष क्रांती मिशन, अकोला ही संस्था स्थापन केली.

पुढे राज्याच्या आरोग्य खात्याबरोबर पत्रव्यवहार करुन “एक मुल,एक झाड” ही योजना मांडली, समजावून सांगितली आणि राबविण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू झाले. आरोग्य विभागाने त्याचे म्हणणे फक्क ऐकलेच नाही तर या मोहिमेसाठी ब्रॅन्ड ॲम्बसिडर करुन राज्यभर फिरुन जनजागृती करण्याचे आवाहन केलं.

तेव्हापासून नाथन विद्यार्थ्यांनी १ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘एक वृक्ष, एक विद्यार्थी’ योजना राबवावी यासाठी राज्यभर फिरतो आहे. गेल्या वर्षी नाथन साताऱ्यात आला होता. तत्कालिन जिल्हा परिषद सीईओ डॉ. कैलास शिंदे यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यातील शाळांना हा उपक्रम राबवण्याचे आदेशच दिले.

सुरुवातीला अमरावती, नाशिक विभागानंतर मागील वर्षी कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही हा उपक्रम राबविण्याचे आदेश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त सचिन कुर्वे यांनी दिले. अकोला पॅटर्न हळू हळू राज्यभरात फेमस झाला.

यानंतर त्याने नवीन उपक्रम हाथी घेतला. ‘ज्या घरात एक बाळ जन्माला येईल, त्याच्या नावाने एक वृक्ष लावून त्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी त्या कुटुंबाने घ्यायची, दर वर्षी आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करताना त्या वृक्षाचाही वाढदिवस साजरा करायचा, अशी कल्पना मांडली.

यासाठी त्याने संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत गावोगावच्या आशा वर्करना मदतीला घेतले. सध्या ८० हजार आशा वर्करचे जिल्ह्या जिल्ह्यात गृप तयार झाले आहेत. त्या सगळ्यांनी मिळून या प्रयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत ३० हजारांवर झाडे लावली आहेत.

मात्र आता हेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात  अधिकृत रित्या लागू होणार आहे. अकोला जिल्ह्य़ात सुरू असलेले ‘एक जन्म, एक वृक्ष’ या मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी एका परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत.

नाथनने महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाची सुरुवात ‘एक दाखला-एक झाड’ या उपक्रमाने केली होती. यानंतर त्याने ‘एक विवाह-एक झाड’ यासाठी प्रयत्न केले. ‘एक जन्म – एक झाड’, ‘एक विद्यार्थी – एक झाड’ हे दोन उपक्रम तर अकोला पॅटर्न म्हणून राज्यभरात लागू करण्यात यशस्वी झाला.

कोरोना काळातही गप्प न बसता नाथनने अकोला ते अकोट असा ४५ किमीचा रेल्वे रुळावरून पायी प्रवास करून दोन्ही बाजूला ३० हजार सीड बॉलची लागण केली. त्यामुळे एक दिवस नाथन या देशाच्या ग्रीन आर्मिचा अघोषित नायक बनेल हे नक्की.

बाकी नाथन आगे बढो दोस्त… हम साथ है…

संदर्भ : युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.