हा मराठी पोरगा महात्मा गांधींना सायकलवरून चीनला घेवून गेला होता.

ज्ञानेश्वर यवतकर रोज सकाळी उठतो तयार होतो आणि इतर लाखो लोकांसारखा सायकलवरून प्रवासाला निघतो फरक इतकाच कि त्याचा रोजचा रस्ता बदलत असतो. त्याला रोज एकाच ठिकाणी जायचं नसत तो सतत नवीन ठिकाणी जात असतो.

ज्ञानेश त्याची सायकल आणि सोबतीला गांधीबाबा असे सगळे जगभर मुक्तपणे फिरत असतात.

नक्की त्याचा आणि महात्मा गांधीचा काय संबध, तो नेमकं काय करतो हे सर्व आपण गांधी जयंतीनिमित्त गांधी विचार पुढे घेवून जाणाऱ्या या माणसांच्या कथेत पाहणार आहोत. 

एमबीए झालेल्या ज्ञानेने चाकोरीबद्ध करिअर सोडून फिरस्ती पत्करली. सुरुवातीला म्हणजे साधारण २००८ मध्ये त्याने भारतभर चालत फिरण्याचा निर्णय घेतला आणि घरातून काहीही न घेता तो निघाला. तो परत घरी येणार किंवा नाही हे त्यावेळी त्याला देखील माहित नव्हतं. या दोन वर्षात त्याने भारत समजून घ्यायचा प्रयत्न केला.  अनेक वेगवेगळ्या तऱ्हेच्या माणसांचे अनुभव घेऊन, जगण्याच्या ज्या छटा आपल्याला माहित असतात त्याच्या परे जाऊन बरंच काही घेऊन हा परत आला.

आल्यानंतर तब्येतीची झालेली हेळसांड लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने आयसीयूमध्ये भरती केला. त्या शहरी वास्तूमध्ये त्याच मन काही स्वस्थ राहीना म्हणून एक दिवस कोणाला न सांगता तो वर्ध्याच्या आश्रमात जाऊन पोहोचला. तिकडे राहून हळू हळू बरा होत गेला सोबत आश्रमासोबत कामही सुरू केलं. आज अनेक मुलांसाठी त्यांचं काम तिथे सुरू आहे.

तो जगातील ज्या कोपऱ्यात जातो तिथे गांधी नावाच्या माणसाला सोबत घेऊन जातो.

२००८ मध्ये भारत भ्रमंती केल्यामुळे खूप अनुभव होतेच गाठीशी. त्यावर चित्रलेखामध्ये २०१४ मध्ये एक सविस्तर लेखमालाही आली होती. ह्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर २०१६ ला त्याने जगप्रवासाची सुरुवात केली. दोन वर्षं भारत भ्रमणात त्याने अनुभवलं होतं की, त्याला भाषेची  अडचण नाही, माणूस ओळखता आला कि संवाद होतो.

म्यानमारमध्ये जंगलातून सायकलिंग करत असताना अचानक समोर येऊन बसलेला वाघ,  पाय आणि सायकल झाडाला बांधून तैवानमध्ये तुफानी चक्रीवादळात काढलेले दोन दिवस व दोन रात्री, अनोळख्या देशात अनोळख्या माणसांनी हा व्हेज खातो म्हणून खास याच्यासाठी युट्युबवर पाहून तयार केलेलं भारतीय जेवण. म्यानमार, थायलंड, लाओ स, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान इथले एकापेक्षा एक थक्क करणाऱ्या अनुभवांना ज्यावेळी तो मांडतो त्यावेळी आपण अक्षरशः हरवून गेलेलो असतो.

IMG 20190403 WA0021

कुणाला भाषा कळते कुणाला खाणाखुणा तर कुणाला समोरचा माणूस त्यामुळे अनोळखी भागात प्रवासाला जायची भिती सोडल्याशिवाय नवीन काही सुंदर भेटणे अशक्य आहे. अशावेळी ज्ञानेशचे अनुभव ऐकणं देखील एक रोमांचकारी अनुभव होऊन जातो.

त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर, तो म्हणतो,

” मी नेहमी पाच- सहा प्लॅन्स तयार ठेवतो. एक झाला नाही तर दुसरा, नाही तर तिसरा असं.”

या सर्व प्रवासाने त्याला बाकी काही नाही तरी स्वतःचे केस स्वतः कसे कापायचे हे तरी नक्कीच शिकवलं असही तो गमतीने म्हणत असतो. पैसे कमी असल्याने किंवा बरेचदा नसल्यामुळे लोकांकडून जी मदत होते त्यावर भागवा भागवी करत जगप्रवास करणे अवघड गोष्ट आहे.

कोण कुठला पोरगा बुद्धाचा, गांधीचा शांती संदेश घेऊन सायकलवरून जग फिरायचं म्हणतो काय आणि जगभरातली माणसं त्याच्याशी जोडून काय घेतात भाज्या, फळ, भात, पैसे आणि काय काय देतात ऐकावं ते नवलच !  आयुष्यभराच प्रेमाचं ओझं जणू.

बँकॉक मधली एक आठवण सांगताना तो म्हणतो, 

बँकॉकला एका मोठ्या कँसर हॉस्पिटलला भेट दिली. मला तिथल्या लास्ट स्टेज कँसर रुग्णांसोबत काही वेळ घालवून एक उपक्रम घ्यायचा होता पण कोणी ओळखीचे नव्हते, परवानगी मिळणे अशक्य होते. तीन दिवस घालवल्यावर तिथला एक नेपाळी कामगार भेटला. त्याने सांगितलं की, डायरेक्टर सकाळी ९ वाजता येतात त्यांना भेटून पाहा. त्यानुसार मी परत सकाळी आलो, ते वेळेवर आले व त्यांना भेटलो. आम्ही साधारण दीड तास बोलत होतो. नंतर त्यांनी मला दुस-या दिवशी रविवारची‌ वेळ दिली.

IMG 20190403 WA0023

सगळे कँसर रुग्ण एका हॉलमध्ये एकत्र जमले. मी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तिथले डॉक्टर्स त्या दिवशी ट्रान्सलेटर झाले होते. नंतर मी त्यांना संगीत खुर्ची शिकवली. नंतर कोणी गाणं म्हंटलं, कोणी डान्स केला तर कोणी अजून. एकूणच आमचा कट्टा मस्त जमला! सगळ्यांना खूपच मजा आली. नंतर ते डायरेक्टर मला म्हणाले की, इतक्या वर्षांमध्ये त्यांनी ह्या रुग्णांना इतकं हसताना कधीच बघितलं नव्हतं! त्यांना हे सगळं इतकं आवडलं की अजूनही हा उपक्रम ते तिकडे घेतात आणि मला आवर्जून फोटो पाठवतात.  मला ही‌ माझ्या प्रवासाला मिळालेली सर्वांत मोठी दाद वाटते ! हे ऐकून प्रवासाच सार्थक वाटतं.

तो पुढे म्हणतो,

मी शाळेत असताना एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून आम्हाला बाहेरून कोणीतरी येऊन बऱ्याच नवीन नवीन गोष्टी सांगत असे. शाळेचा अभ्यासक्रमाने जितकं शिकवलं नाही तितकं जास्त मला या लोकांनी शिकवलं. मला त्याही वेळेला वाटायचं कि हे लोकं माझ्यात काहीतरी पेरता आहेत. आज बहुतेक तेच मी परत देतोय, कदाचित अजून कोणाला तरी नवीन काहीतरी करण्याचं बीज देतोय, हे बुद्धाचं आणि गांधीच शांतीच बी जिथे शक्य असेल तिथं घेऊन जाण मला महत्वाचं वाटतं.

थायलंड मध्ये असताना कुत्र्यानं चावा घेतल्यावर त्या विषाशी झुंज घेत काढलेले दिवस, नंतर या सगळ्याने बेशुद्ध होऊन पडला असताना कोणत्या तरी गावातल्या अनोळखी माउलीनी केलेली सुश्रुषा, याला घरचं जेवायला मिळावं म्हणून स्वतः चक्क युट्युबवर चार तास बघून, शिकून तयार केलेली डाळ आणि फ्राईड राईस.

त्याचा अनुभव सांगत असताना तो म्हणतो की, बुद्धी व हृदय खुलं असेल तर कोणतीच अडचण येत नाही आणि सगळी सोबत मिळत जाते. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं प्रेम मिळतं. भाषेची अडचण अजिबात येत नाही. आणि मी नेहमी बघितलं की, मला जे गरजेचं असायचं ते कुठे तरी तयार असायचं.

ज्ञानेशचा तैवान व्हिसा एक्स्पायर होणार होता व जर त्याने पुढच्या काही दिवसात देश सोडला नसता तर अटक निश्चित होती.

अशावेळी तायचुंगमध्ये त्याला मिस्टर इंडियन नावाचं हॉटेल दिसलं.  आत गेला असता तर ऑर्डर करावी लागली असती म्हणून भुकेला असूनही दोन तास बाहेरच थांबला. त्याला तिकडे दोन तास थांबलेला बघून एक माणूस बाहेर आला आणि त्याची विचारपूस करू लागला. त्याला ज्यावेळी समजलं कि हा भारतीय आहे मग त्याने ज्ञानेशला आत नेलं, खाऊ घातलं. नंतर गप्पाच्या ओघात ज्ञानेशने त्याची कहाणी सांगितली.

त्याला अडचण तर होतीच, पण एकदम कसं मदत मागायची असंही वाटत होतं पण त्यानं धीर करून त्याची अडचण सांगितली त्यावर हॉटेल मालक म्हणाला , काळजी करू नको, होईल सगळं ठिक. मालकाने काही फोन केले आणि याला सांगितलं तुझी इथून पुढे चीन पर्यंतच्या प्रवासाची व्यवस्था झाली आहे बेफिकीर हो.

नंतर मालकाने विचारलं,

“और कहीं पाकिस्तान में भी जाओगे क्या?”

ज्ञानेश म्हणाला, माझा प्रवास पाकिस्तानातच संपणार आहे. हे ऐकल्यावर मालकाच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकून गेले. मालक म्हणाला , मी असंच रेस्टॉरंट मी पाकिस्तानातही चालवतो आणि जेव्हा तू पाकिस्तानात जाशील तेव्हा असा विचार नको करूस की हा कोणता वेगळा देश आहे किंवा लोक वेगळे आहेत. आपण फक्त पन्नास साठ वर्षांपूर्वी वेगळे देश झालो आहोत, पण आपली नाळ एकच आहे.  तिथेही लोक तुझ्यावर प्रेमच करतील. शत्रू देश आहे असा विचारही आणू नकोस. मी तुला हे हक्कानं सांगू शकतो, कारण मी एक पाकिस्तानी आहे.

एका पाकिस्तानी माणसाने एका सायकलवाल्या तरुण भारतीय गांधीला कम्युनिस्ट चीन मध्ये जाण्याचं तिकीट काढून दिलं. वाचतानाचं गम्मतशीर वाटतं ना. पण हे आहे हे असं आहे.

पुढे चीन मध्ये पोहचल्यावर अशेच वैविध्यपूर्ण अनुभव,

“माओ के देश में गांधी!”

हा ज्यावेळी चीनमध्ये होता तेव्हा डोकलामचा वाद सुरू होता. चिनी वृत्तपत्रांना याची व याच्या पीस मिशनची माहिती मिळाली व त्यांनी बातम्या छापल्या. त्यावेळी राजकीय पातळीवर भारत- चीनमध्ये तणाव होता, पण लोकांच्या पातळीवर नव्हता. नंतर एका वृत्तपत्राने राजदुतांना सांगून ज्ञानेशला त्यांच्या शांघायच्या कार्यालयात बोलावलं.  त्याची माहिती व मिशन त्या वृत्तपत्राला इतकी आवडली की, त्यांनी पुढचे काही दिवस रोज त्याला कार्यालयात बोलावलं. तीन चार ट्रान्सलेटर्स सोबत घेऊन त्याची सर्व कहाणी लिहून काढली.

मग त्यांनी शांघाय डेलीमध्ये पहिल्या पानावर बातमी दिली व आतमधल्या पानांवर तपशील दिले त्याला त्यांनी मस्त नाव दिलं:

माओ के देश में गांधी!

तो सांगतो,

दोन महिने मी चीनमध्ये राहिलो. तेव्हा डोकलाम तणाव होता. पण त्या लोकांनी कधीच माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितलं नाही. मीच जेव्हा डोकलामबद्दल म्हणायचो, तेव्हा ते म्हणायचे की ते सरकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, आमचे नाहीत. उलट ते म्हणायचे, आपले संबंध काय इतके नवीन- पन्नास साठ वर्षांचे आहेत? ते तर हजारो वर्षांचे आहेत. आमची संस्कृतीही भारतामुळेच बनलेली आहे. इतकं सांस्कृतिक नातं आहे. तेव्हा मला जाणवलं की, आपला मिडीया चीन- पाकिस्तानविषयी किती अपरिपक्व प्रचार करतात. जगाला बघायचं असेल तर खुल्या हृदयाने बघायला हवं, मग लोक इतकं प्रेम देतात !

IMG 20190403 WA0017

त्याचं जगणं म्हणजे एका विलक्षण भ्रमंतीची कहाणी आहे. गांधीजींचे विचार व शांतता अभियान घेऊन जग प्रवास करण्याची त्याचीच मोहीम सुरू आहे, सध्या ज्ञानेश अमेरिका, कॅनडा, क्युबा या दौऱ्यावर आहे.

त्याचा हा प्रवास बघून गुगलने त्यावर एक छोटी स्टोरी केली आहे पेडलिंग फॉर पिस. 

ज्ञानेश्वरने त्यांचा बहुतांश प्रवास मरीन सायकलवर केला आहे. माझी आणि त्याची ओळख निसर्ग सायकल परिवार यांच्यामुळे त्याची आणि ज्ञानेशची ओळख झाली. आता ती ओळख इतक्या घट्ट मैत्रीत रूपांतर झालीय कि ज्ञानेशच कार्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही त्याचे सेशन तर भरवतोच पण ज्ञानेशला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वजण मिळून मदत करतो. त्याच्या सायकल रिपब्लिकच्या माध्यमातून ज्ञानेशला सायकल पार्टस, त्याचा मेंटेनन्स इत्यादी गोष्टी देखील उपब्लध करून देतो.

आपला ज्ञानेश भिडू ज्यावेळी परत येईल त्यावेळी आपण त्याला सायकल रिपब्लिक आणि बोलभिडूच्या माध्यमातून भेटणारच आहोत, त्याच्या नवीन प्रवासा विषयी जाणून घ्यायला, त्याच्या सोबत कॉफी पित त्याला भेटलेल्या माणसांना भेटायला, त्याच्या सोबत नव्याने प्रवास करायला.

कारण प्रवासात आपल्याला नवीन माणसं मिळतात, नवीन अनुभव मिळतात. मुळात आपण माणूस आहोत झाड नाही आपण प्रवास करावा कारण आपल्याला पाय असतात. एकाच ठिकाणी राहून कोणताही नवा झरा आपल्यात रुजू न देता मृत तळं होण्यापेक्षा एखादी छोटी का असेना वाहती धार असणे कधीही चांगले नाही का ?

भिडू अभिजीत कुपटे – 9923005485

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.