वॉलमार्ट-फ्लिपकार्ट ‘डील’मागे दडलंय तरी काय…?

 

भारतातील कंपनी खरेदी विक्रीचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि जगातील सगळ्यात मोठा ई-कॉमर्स कंपनी खरेदी व्यवहार नुकताच पार पडला. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्स अर्थात १.१२ लाख कोटी रुपये मोजून फ्लिपकार्टची खरेदी केली. तर समजून घेऊयात या व्यवहाराबद्दल तसंच वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या कॉमन रायव्हल असणाऱ्या कंपनीबद्दल आणि व्यवहारातील फायद्या-तोट्याच्या गणिताबद्दल…

फ्लिपकार्टबद्दल सारं काही..

सचिन बंसल आणि बिन्नी बंसल हे दोन युवक IIT चे विद्यार्थी (या दोघात सख्ख, चुलत, सावत्र, मावस भाऊ असला कोणताच पारिवारिक संबंध नाहीए, फक्त आडनाव बंधू)  दोघेही चंदीगडचे रहीवाशी. IIT bangluru मधून शिक्षण पूर्ण करून सचिनने बिन्नीला Amazon India मध्ये नोकरी करण्यासाठी बोलावलं. 2 वर्ष Amazon मध्ये नोकरी करून झाल्यावर २००७ या दोघांनी स्वतःचा वेगळा संसार थाटायचा ठरवला.

एकदा निर्णय पक्का झाल्यावर त्यांनी २००७ साली बेंगळुरु शहरात एका 2bhk फ्लॅट मध्ये 50 हजार रुपयांची गुंतवणुक करून फ्लिपकार्ट नावाची ऑनलाईन पुस्तके विकणारी कंपनी स्थापन केली. २००८ साली दिल्लीत एक ऑफिस सुरू केलं, त्यानंतर २००९ साली मुंबई आणि मग हळू हळू ग्राहक, विक्रेते, वस्तू वाढवत वाढवत आज तब्ब्ल १०० कोटी ग्राहक, ८.९ कोटी विक्रेते आणि जवळपास २१  राज्यात “वेअरहाऊस” असणाऱ्या  फ्लिपकार्टचा डोलारा उभा राहिला. फ्लिपकार्टमध्ये वस्तूची घरपोच डिलिव्हरी देणारे साधारणतः  ८ लाख कर्मचारी आहेत आणि फ्लिपकार्टची किंमत तब्बल १.१२ लाख कोटी इतकी झाली आहे. जिथे फ्लिपकार्टचं रोपट सर्वप्रथम लावण्यात आलं होतं त्या बंगळूरुमधील 2bhk फ्लॅटच्या ठिकाणी  ८.५० लाख चौरस फुटाचं अलिशान ऑफिस उभारण्यात आलंय.

flipkart

फ्लिपकार्टचा इतक्या झपाट्याने विकास होण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यांनी ‘ऑनलाईन रिटेल सिस्टम’ मध्ये अनेक नवीन बदल घडवून आणले. त्यामुळे २००८ ते २०१८  या दशकभराच्या प्रवासात त्यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार भेटले. ज्यात तब्बल १२ आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी त्यांना ७  लाख कोटी रुपये गुंतवणूक मिळवून दिली. याच भल्यामोठ्या कुबेरी गुंतवणुकीच्या पैश्यातून त्यांनी myntra, eBay, phone pay, chakpak सारख्या छोट्या ई-कॉमर्स कंपन्यांची  खरेदी करून भारतात आपले हातपाय पसरले. या प्रवासात फ्लिपकार्टला एक गोष्ट अशी निदर्शनास आली की भारतातील लोकांना e-payment चा वापर करता येत नाही, ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण भारतात कमी आहे.  यावर उपाय म्हणून फ्लिपकार्टने २०१० पासून  “Cash on Delivery” हा वस्तू ग्राहकांच्या हातात मिळाल्यावर पैसे द्या वाला प्रकार शोधला. भारतात Cash on Delivery ची सेवा देणारी फ्लिपकार्ट ही पहिलीच  कंपनी ठरली. त्यासोबतच एखादं प्रॉडक्ट “ऑनलाईन लॉन्च” करण्याचा फंडा सुद्धा फ्लिपकार्टनेच काढला. २०१४  मध्ये  Motorola ने आपले मोबाईल फोन फ्लिपकार्टवर लॉन्च करून भारतीय बाजरापेठेत दमदार पुनरागमन केले होते.

जेव्हा फ्लिपकार्टला ही गोष्ट लक्षात आली की भारतातील इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्या  3G च्या नावावरती 2G सुद्धा देत नाहीत, तेव्हा स्वतःचं सर्वप्रथम “लाईटवेट ऍप” लॉन्च करणारी कंपनी म्हणजे फ्लिपकार्टचं. मध्यमवर्गीय ग्राहकांना सुद्धा महागड्या वस्तू खरेदी करता यावेत म्हणून फ्लिपकार्टने २०१६  मध्ये आपल्या ग्राहकांना ‘नो-कॉस्ट ई.एम.आई’ सुविधा देण्याची सुरुवात केली. ज्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना सुद्धा हप्त्यावरती हवी ती महागडी गोष्ट खरेदी करणे सहजशक्य होऊ लागले.  सोबतच  जुन्या वस्तू एक्स्चेंज करण्याचा पर्याय देखील फ्लिपकार्टनेच उपलब्ध करून दिला. अश्या वेगवेगळ्या सेवा-सुविधांच्या माध्यमातून  फ्लिपकार्ट ही  भारतातील सगळ्यात मोठी ई-शॉपिंग कंपनी बनला.

The Startup God

https://www.facebook.com/TheStartupGod/

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टची मैत्री कशी झाली..?

वॉलमार्ट म्हणजे अमेरिकन रिटेल मार्केटमधील दादा कंपनी. ही तीच कंपनी आहे, जिने मागे भारतात FDI सुरू होण्याच्या गर्दीत स्वतःला अव्वल स्थानी दाखवायचा पोरखेळ केला होता, पण त्यातच ते तोंडघशी पडले होते. ‘वॉलमार्ट-फ्लिपकार्ट’ मैत्री बहरण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फ्लिपकार्टने वॉलमार्टला दिलेला मदतीचा हात. फ्लिपकार्टमुळेच वॉलमार्टला भारतात पाय रोवण्यास मदत झाली आणि भारतीय बाजारात भक्कमपणे उभारण्यासाठी आता ते पुढील व्यूहरचना करत आहेत. या व्यवहारानंतर फ्लिपकार्टसारख्या भारतातील सगळ्यात मोठ्या ‘ई-कॉमर्स’ पोर्टलमध्ये  वॉलमार्टला ७७ टक्के समभाग मालकी मिळाल्याने वॉलमार्टच्या  भारतातील  मोठ्या प्रमाणातील विस्तारास मदत होणार आहे.

वॉलमार्ट- फ्लिपकार्टएकत्र येण्यामागे नक्की कारण काय..?

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन्ही कंपन्यांची ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी प्रतिस्पर्धक कंपनी आहे ती म्हणजे अमेझॉन. अमेरिकन रिटेल मार्केटमध्ये  वॉलमार्टला अमेझॉनच्या रुपात तगडा प्रतिस्पर्धी तयार झालाय. तीच परिस्थिती भारतात देखील आहे. भारतात फ्लिपकार्टसमोर देखील आव्हान आहे ते अमेझॉनचंच. त्यामुळे या तगड्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्यासाठी आणि मार्केटवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी काहीतरी ठोस पाऊले उचलणं हे या दोन्ही कंपन्यांसाठी महत्वाचं होतं. या गरजेतूनच या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अमेझॉनचं साम्राज्य इतकं मोठं आहे की या कंपनीने आत्तापर्यंतच्या २३ वर्षात  जगभरातील  ६९  कंपन्याना गिळंकृत केलं आहे. त्यामुळे येत्या काळात मार्केटवर पकड मिळविण्यासाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळेल.

घरबसल्या फ्लिपकार्टचे कर्मचारी झालेत करोडपती..

‘वॉलमार्ट- फ्लिपकार्ट’ व्यवहाराचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झालाय. या व्यवहारामुळे “एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लान (ईसॉप्स)” मधील संपत्तीचे मूल्य तब्बल १३ हजार ४५५  कोटी म्हणजेच २२ अब्ज डॉलर्सपर्यंत गेले आहे. फ्लिपकार्टच्या सुमारे १०० आजी-माजी कर्मचा-यांकडे ईसॉप्स आहेत. या ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ईसॉप्ससाठी वॉलमार्ट १०० टक्के बायबॅक ऑफर आणणार आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचा-याला एका समभागामागे १५० डॉलर्स म्हणजेच १०  हजार रुपये मिळतील. मात्र आपल्याकडील समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मात्र या कर्मचाऱ्यांना असेल. परिणामी, कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. गेल्या चार वर्षांपासून फ्लिपकार्ट आपल्या कर्मचा-यांना कंपनीचे समभाग देत असे. कर्मचा-यांना दर महिन्याला हे समभाग कंपनीला परत विकण्याची मुभा असे. फ्लिपकार्टसह अनेक कंपन्या आपल्या कर्मचा-यांना अशा प्रकारचे समभाग देत असतात.

आपला काय फायदा आणि तोटा..?

वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतली तर घेउद्यात, पण त्यात ग्राहक म्हणून आपला नेमका फायदा आणि तोटा काय हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं. तर नजर एकदा नजर टाकूयात या फायद्या-तोट्याच्या गणितावर…

फायदा– वॉलमार्ट ओळखलं जातं ते महागतली महाग वस्तू सुद्धा स्वस्तातल्या स्वस्त किमतीत विकण्यासाठी. जर तो आला, जर म्हणजे काय आलाच जावाई तर तो सगळ्यात स्वस्त विकणार करण की तो “डायरेक्ट कारखान्यातून साखर उचलणारा हाय” म्हणून बाजारभावापेक्षा ४०-५०% कमीने विकतो म्हणून यात तुमचा खूप फायदा आहे. बाकी रोजगार, आर्थिक विकास अमुक तमुक.

तोटा –  जेव्हा एक अब्जो रुपयांची उलाढाल करणांरी कंपनी विदेशी उद्योगाला विकली जाते तेव्हा सगळं काही विदेशी होऊन जातं. सगळं काही म्हणजे सगळंच. फक्त कंपनीच नाही तर कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, खरिदार, विक्रेते आणि १२५ कोटी जनतेची सगळीच माहिती “Internal Data” त्या विदेशी व्यक्तीच्या पाकिटात जाऊन बसतो. ज्याने तो हवा तसा बदल तुमच्या अर्थशास्त्रात आणि राजकीय भूगोलात करत सुटतो म्हणजेच परत एकदा छुप्या  East India Company च्या स्वागताला तयार राहायची वेळ आपल्यावर येणार आहे, हाच आपला सगळ्यात मोठा तोटा होणार आहे.

– समीर (The Startup God)

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.