आजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना हरवणारा माणूस केव्ही रमणा रेड्डी
तेलंगणाच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा होती, कामारेड्डी मतदारसंघाची. कारण या मतदारसंघात लढत होती तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार रेवंथ रेड्डी यांच्यात. सगळ्या राज्यभरात केसीआर यांना आव्हान देणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी कामारेड्डी मतदारसंघातून केसीआर यांना थेट चॅलेंज केलं होतं. त्यात सुरुवातीचे कल काँग्रेसच्या बाजूनं लागत असताना, रेवंथ रेड्डी यांनी कामारेड्डीमधून आघाडी घेतली होती.
पण निकालाचं चित्र स्पष्ट झालं, तेव्हा या आजी आणि भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला होता. कामारेड्डीमधून बाजी मारली, ती भाजपच्या केव्ही रमणा रेड्डी यांनी. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असलेल्या अपडेट्सनुसार केव्ही रमणा रेड्डी यांना ६६ हजार ६५२ मतं मिळाली आहेत, तर केसीआर यांना ५९ हजार ९११ आणि रेवंथ रेड्डी यांना ५४ हजार ९१६ मतं मिळाली आहेत. थोडक्यात केव्ही रमणा रेड्डी यांनी दोन्ही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांना हरवलं.
पण हे केव्ही रमणा रेड्डी आहेत कोण ?
फक्त १२ वी पर्यंतचं शिक्षण घेतलेले रमणा रेड्डी तेलंगणामधले मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे जवळपास ५० कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे रमणा रेड्डी हे बीआरएसचा भाग होते, मात्र निवडणुकांच्या तोंडावर ते भाजपमध्ये आले. त्यांच्या प्रचारात महत्त्वाची गोष्ट ठरली कामारेड्डीतला सामना लोकल विरुद्ध बाहेरचे असा करणं. रमणा रेड्डी हे मूळचे कामारेड्डीमधलेच तर केसीआर आणि रेवंथ रेड्डी हे दोघंही बाहेरुन आलेले.
विशेष म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी ‘माझा मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी नाही, तर त्यांचा माझ्याशी सामना आहे, कारण ते माझ्या मतदारसंघात लढायला आलेत.’ असं विधान केलेलं आणि निवडणूक जिंकत ते खरंही करुन दाखवलं.
पण याचा अर्थ केसीआर आणि रेवंथ रेड्डी विधानसभेत दिसणार नाहीत का ?
तर दिसतील. कारण केसीआर आणि रेवंथ रेड्डी या दोघांनीही दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवली होती. केसीआर कामारेड्डीमधून हरले असले, तरी त्यांनी गजवेल मतदार संघातून ३६ हजारांचं लीड घेतलंय. तर रेवंथ रेड्डी यांनी कोडंगलमधून ३२ हजारांच्या फरकानं बाजी मारली आहे. त्यामुळं दोघंही विधानसभेत दिसतील. रेवंथ रेड्डी हे बीआरएसला धोबीपछाड देऊन काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले असले, तरी तेलंगणाच्या निवडणुकीत खरे जायंट किलर ठरले, भाजपचे कामारेड्डीचे आमदार केव्ही रमणा रेड्डी.
हे ही वाच भिडू:
- मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते या कारणांमुळे…
- तेलंगणा मॉडेल खरंच गुजरात मॉडेलपेक्षा भारी आहे का ? आकडेवारी सांगते…
- तेलंगणा मधीलं कॉंग्रेस चे हार्ड हिटर म्हणवून घेणारे रेवंत रेड्डी कोण आहेत ?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.