आठवले तसे “दुर्गाबाई भागवत”.

 

gandhi must be shot dead.

दुर्गा भागवत यांचं आठवले तसे पुस्तक भन्नाट आहे. दुर्गाबाईंची लेखनशैली आपल्यासमोर तो काळ, ती व्यक्ती जिवंत करणारी आहे. इरावती कर्वे यांच्यावर लिहितांना त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता इरावतीबाईच्या संशोधनाचा पार पंचनामा करून ठेवला आहे. पण या लेखात त्या काळातले लोक गांधींजींचा कसा द्वेष करायचे हे पण खूप स्पष्टपणे लिहिलंय. तो उतारा असा,

‘ इरावतीबाईंचा आणखी एका कारणास्तव मला तिटकारा याचं काळात आलं. घुर्यांकडे त्या व धनंजयराव गाडगीळ यायचे. त्या डेक्कन कॉलेजमध्ये लागल्यावर बहुधा त्या एकट्या येत नसत, गाडगीळांसमवेत यायच्या. तिथे दोनतीनदा आम्ही विद्यार्थी बसलेलो असताना या तिघा अर्ध्वयूनी नेहमी म्हणावे की, gandhi must be shot dead’  विनोबांना पहिला सत्याग्रही होण्याचा मान मिळाला त्या कालची म्हणजे १९३८ -३९ मधली ही हकीगत आहे. इरावतीबाई आणि गाडगीळ बाहेर पडले होते. इतर विद्यार्थी तिथेच होते. इतक्यात मी तिथे गेले. तेंव्हा घुर्ये मला पाहून म्हणाले, या आल्या गांधाळ. या आल्या खादाळ. gandhi must be shot dead’

दुर्गाबाई अर्थात हे ऐकून घेणाऱ्या नव्हत्या. त्या गांधीवादी होत्या. गांधी विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी घुर्येना उत्तर दिलं. ‘ तुम्ही तिथं मोठी माणसं गांधीना मारा म्हणून म्हणता. स्वतः कृती करायला धजत नाही. पण एखादा अपरिपक्व तरुण मात्र हे ऐकून हे कृत्य करील. त्याचे परिणाम घातक होतील.’ १९४८ साली ते प्रत्यक्षात घडले. महाराष्ट्रीयाने गांधींचा खून करायला या तथाकथित बुद्धीवंतांचे विचार कारणीभूत झाले नाहीत, असे कसे म्हणावे?मला गांधी गेल्यापासून या माणसांचा तिटकारा आलं. त्यांच्या भ्याडपणाची कीव आली. वाईट वाटले ते अशासाठी की, ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय दुरवस्थेबद्दल ही मंडळी गांधीना दोषी समजत होती, ते कारण पूर्णतया अयथार्थ ठरले. गांधीना ठार केल्यामुळे या कुठल्याही गोष्टीत सुधारणा तर झाली नाहीच, पण परिस्थिती कायमची बिघडली, महाराष्ट्रात तर बोलायलाच नको.

 दुर्गाबाईंनी सांगितलेला हा प्रसंग आणि त्यांचे विचार किती दूरदर्शी होते. हे वाचून त्याकाळी गांधी द्वेष किती ठासून भरला होता हे लक्षात येतं. गांधीहत्येचा डाग पुसला जाणार नाही. पण किमान बुद्धीवादी मंडळींनी तरी बोलताना जरा भान ठेवायला हवं. नाहीतर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपण गांधीहत्येत पाहिलं. केवळ गांधीजींची हत्या झाली असं नाही. त्या एका घटनेने महाराष्ट्रात खूप मोठी जातीय तेढ निर्माण झाली ज्याच्या झळा अजूनही जाणवतात. पण खूप बुद्धीवादी मंडळी मात्र अजूनही भानावर आली आहेत असं दिसत नाही. त्यांचं सवंग बोलणं आपण रोजच ऐकत असतो. वाचत असतो. त्यांना फक्त बुद्धी नको सद्बुद्धी मिळो एवढीच प्रार्थना.  

  • पुस्तकी भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.