या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय…!!!

 

भारत आणि पाकिस्तान. क्रिकेटच्या मैदानावरील दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी. जेव्हा कधी या दोन संघांदरम्यान क्रिकेटची मॅच खेळली जाते, त्यावेळी क्रिकेटच्या ग्राउंडला युद्धभूमीचं स्वरूप येतं आणि मॅच जिंकणं दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचं होऊन बसतं. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांचे हाडवैरी होऊन बसतात. पण याच वेळी इतिहासात काही असे खेळाडू देखील होऊन गेले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचं प्रतिनिधित्व केलंय. जाणून घेऊयात कोण होते ते खेळाडू जे दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळले…

गुल मोहम्मद

१९४६-४७ सालच्या रणजी ट्रॉफीतील अंतिम सामन्यातील इनिंगसाठी गुल मोहम्मद कायमच लक्षात ठेवले जातात. ‘बडोदा विरुद्ध होळकर’ संघात झालेल्या या सामन्यात गुल मोहम्मद यांनी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळताना बडोद्याला रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती. बडोद्याच्या ९१ रन्सवर ३ विकेट्स पडलेल्या असताना बॅटीगला आलेल्या गुल मोहम्मद यांनी विजय हजारे यांच्यासोबत ५७७ धावांची पार्टनरशिप करताना ३१९ रन्सची अफलातून इनिंग खेळली होती. ‘मोहम्मद-हजारे’ जोडीची ही पार्टनरशिप त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कुठल्याही विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशिप ठरली होती. हा विक्रम आपल्या नावे करताना त्यांनी फ्रँक वॉरेल आणि क्लाइड वॉल्कोट यांच्या ५७४ रन्सच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड मोडीत काढला होता.

मोहम्मद यांनी १९४६ साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. १९५२-५३ साली पाकिस्तानच्या संघाने ज्यावेळी भारताचा दौरा केला, त्यावेळच्या लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात देखील त्यांचा समावेश होता.  १९५५ साली मात्र त्यांनी पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं. पाकिस्तानकडून मात्र त्यांना फक्त एकच कसोटी सामना खेळता आला, जो त्यांनी १९५६-५७ साली ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला. त्यानंतर मात्र त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेट प्रशासकाची इनिंग खेळण्यास प्राधान्य दिलं.

अब्दुल हाफिज कारदर

‘पाकिस्तान क्रिकेटचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे अब्दुल हाफिज कारदर हे पाकिस्तानी संघाचे पहिले कॅप्टन होत. १९४८ ते १९५२ या काळात पाकिस्तानने त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण २३ कसोटी सामने खेळले त्यात ६ विजय, ६ पराभव आणि ११ अनिर्णीत अशी त्यांची कामगिरी राहिली. पाकिस्तान संघाच्या पहिल्या-वहिल्या भारतीय दौऱ्यात संघाचं नेतृत्व कारदर यांनीच केलं होतं. १९५७ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशासनात पाऊल टाकलं. ७० च्या दशकात ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राहिले. पाकिस्तानी क्रिकेटमधील दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून आजदेखील त्यांची आठवण काढली जाते.

फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांनी भारतीय संघाकडून देखील क्रिकेट खेळलं होतं. भारतीय संघाकडून लॉर्डवर खेळलेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी ४३ रन्स काढल्या होत्या. या दौऱ्यांनंतर काही काळ शिक्षणासाठी इंग्लंडमध्येच राहिलेल्या कारदर यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संघाकडून देखील क्रिकेट खेळलं.

आमीर इलाही

१९०८ साली लाहोरमध्ये जन्मलेले आमीर इलाही यांनी भारतासाठी फक्त एक कसोटी सामना खेळला. १९४७ साली ज्यावेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा केला त्यावेळी ते भारतीय संघात होते. देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीमध्ये मात्र त्यांनी चमकदार कामगिरी केली. आमीर इलाही यांच्या कामगिरीच्या जोरावरच बडोद्याचा संघ १९४६-४७ सालची रणजी ट्रॉफी जिंकू शकला. फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले आणि पाकिस्तानच्या संघाकडून खेळायला लागले. पाकिस्तानकडून ते ५ कसोटी सामने खेळले. १९५२ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी भारताविरुद्ध खेळलेली कोलकाता कसोटी ही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरली.