रेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग

पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा ते तक्षशिला (आज ते पेशावरमध्ये म्हणजे पाकिस्तानात आहे) असा हमरस्ता होता. भारतातील सुती कापड, धान्य आणि मसाल्याचे पदार्थ या मार्गावरून पेशावर आणि तिथून पुढे काबूलला जायचे. मध्य आशियातील घोडे, रेशमाचे तागे, चिनी मातीची भांडी, काचेची भांडी या मार्गावरून भारतात यायची. याच मार्गावरून बौद्ध धर्म मध्य आशियात आणि तिथून पुढे चीन, तिबेट आणि जपानला पोचला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शेकडो चिनी बौद्ध भिक्षू भारतात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी आले. मूळ बौद्ध धर्मग्रंथांचा अनुवाद, बौद्ध धर्माचे सण-उत्सव, कर्मकांडं, भिक्षू संघाचं वा मठांचा कारभार यासंबंधातील अधिक माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी चीनमधील बौद्ध भिक्षू भारतात येत.

आपल्या प्रवासाची हकीकत लिहिणारा पहिला चिनी बौद्ध भिक्षू म्हणजे फासियन (Faxian). भारताच्या प्रवासाला तो निघाला तेव्हा त्याने वयाची साठ वर्षं पूर्ण केली होती. इसवीसन ३९९ मध्ये चीनची राजधानी होती चांगआन (Chang’an). तिथून त्याची भारतयात्रा सुरू झाली. बौद्ध राज्यांचा यात्रा वृत्तांत फासियनने लिहीला. आजच्या सिंगजिआंग-उघीयूर प्रांतातील लोलान शहराबद्दल फासियन सांगतो- या प्रदेशातील माणसांचा पोषाख चिनी आहे पण त्यांच्या चालीरीती भारतीय आहेत. येथील बौद्ध भिक्षू भारतीय भाषांमधील ग्रंथ वाचतात आणि भारतीय भाषा बोलण्याचा अभ्यास करतात. टाकलंमकान वाळवंटाच्या दक्षिण सीमेवरील खोतान शहर या प्रदेशातील सर्वात मोठं बौद्ध धर्माचं केंद्र आहे, असं फासियनने म्हटलं आहे. तेथे प्रत्येक घराच्या बाहेर एक पॅगोडा वा स्तूप आहे. छोटा वा मोठा. बौद्ध भिक्षूंच्या निवासाची उत्तम व्यवस्था तेथील विहारांमध्ये आहे. बोधिसत्वाचा एक जन्म तक्षशिला येथे झाला होता, असंही फासियन आपल्याला सांगतो आणि तेथील बौद्ध धर्मियांचं वर्णन करतो. बुद्धाच्या भिक्षापात्राचा उत्सव पेशावर येथे साजरा होत असे तर श्रीलंकेमध्ये बुद्धाच्या दाताची मिरवणूक काढण्यात येते, असंही फासियनने नोंदवलं आहे. बुद्ध जीवनाचा परिचय—जन्म, तपश्चर्या, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण- फासियनच्या वृत्तांतात आहे. बौद्ध धर्माच्या या सण-उत्सवांमधून चीनमध्ये असे सण साजरे करण्याची प्रेरणा त्याला मिळाली. गौतम बुद्धाच्या अवयवांची म्हणजे हाड, दात, केस यांची मागणी वाढली. चीवरं, भिक्षापात्रं, औषधी वनस्पती, शल्यकर्माची साधनं इत्यादी वस्तूंची मागणी चीनमधून होऊ लागली. व्यापारी तांडे बौद्ध विहारांमध्ये मुक्कामाला थांबत. तिथे त्यांची केवळ भोजन-निवासाची व्यवस्था होत नव्हती तर वैद्यकीय सेवाही विनामूल्य मिळत असे. त्यामुळे व्यापार्‍यांनी बौद्ध मठ वा विहारांना उदारहस्ते मदत केली.

बंगालातील ताम्रलिप्ती बंदरातून श्रीलंकेला जाणार्‍या एका जहाजावर फासियन चढला. तेथील बौद्ध धर्माचा अभ्यास झाल्यावर समुद्रमार्गे तो चीनला रवाना झाला. समुद्रप्रवासातील संकटांचं वर्णनही त्याने करून ठेवलं आहे. वादळामध्येही तो सापडला मात्र बचावला. चीनला परतला तेव्हा फासियन ७७ वर्षांचा होता. मध्य आशिया आणि भारतीय उपखंडात तो १७ वर्षं हिंडत होता. डाऊचेन हा बौध्द भिक्षू फासियनसोबत भारतात आला होता. बौद्ध विहार, तीर्थस्थानं पाहून तो मोहीत झाला. हिंदुस्थानच्या प्रेमात पडला. निर्वाण स्थितीला पोहोचेपर्यंत मी भारतातच मुक्काम करणार असं त्याने जाहीर केलं. तो चीनमध्ये परतला नाही. फासियनच्या लिखाणाचा खोल परिणाम चिनी बौद्ध भिक्षूंवर आणि विद्वानांवर झाला. आपल्यासारखी संस्कृती वा सभ्यता अन्य देशांमध्ये आहे ह्यावर चिनी लोकांचा अर्थात चिनी बुद्धिमंतांचा विश्वास नव्हता. मथुरेपासून दक्षिणेकडील सर्व प्रदेश मध्यदेशात मोडतो. या देशातील लोक श्रीमंत आहेत, चिनी लोकांप्रमाणेच ते अंगभर वस्त्र घालतात, चीनप्रमाणेच येथेही खाद्यपदार्थांची रेलचेल आहे, असा उल्लेख चीमधील एका प्राचीन ग्रंथात आहे. हिंदुस्थान हा देश चीनप्रमाणेच पुढारलेला आणि सुसंस्कृत आहे अशी भारताची प्रतिमा चिनी विद्वानांमध्ये दृढमूल झाली होती असं या उल्लेखावरून समजतं. फासियनच्या वृत्तांताचा हा परिणाम होता.

शुएन सांग (Xuanzang)  सातव्या शतकात हिंदुस्थानात आला. त्यावेळी टांग राजघराण्याची सत्ता चीनवर होती. शुएन सांगचे वडील सरकारी बाबू होते. त्यांना मानही होता. सम्राटाच्या सेवेत मुलानेही रुजू व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे लहानपणीच शुएन सांगकडून त्यांनी कन्फ्युशिअसच्या ग्रंथांचा अभ्यास करवून घेतला होता. मात्र आई-वडलांचा अकाली मृत्यू झाला. पोरवयाचा असताना शुएन सांग पोरका झाला. त्याचा सांभाळ करणार्‍या कुटुंबाने त्याच्यावर बौद्ध धर्माचे संस्कार केले. बौद्ध धर्माचे ग्रंथ चिनी भाषेत अनुवादित करावेत आणि बुद्धाच्या भूमीचं दर्शन घ्यावं असा ध्यास शुएन सांगने घेतला. विशीत असताना हिंदुस्थानात जाण्याचा निश्चय त्याने केला. सातव्या शतकात चीनची राजधानी चांगआन होती. टांग घराणं सत्तेवर होतं. मात्र दुष्काळ पडल्याने अंदाधुंदी माजली होती. उत्तरेकडून पशुपालकांच्या टोळ्यांचे हल्ले सुरू झाले. चीनमधून बाहेर पडण्याची परवानगी शुएन सांगला मिळाली नाही. अखेरीस लपून-छपून तो देशाबाहेर पळाला.

शुएन सांगच्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. बहुतेक सर्व महत्वाचे ग्रंथ चिनी भाषेत अनुवादित झाले होते. चिनी बौद्ध धर्माची शाखा विकसित होऊ लागली होती. कोरिया, जपान या देशांमधले बौद्ध भिक्षू चीनमध्ये अभ्यासासाठी येत होते. मूळ बौद्ध ग्रंथाच्या चिनी अनुवादाबाबत शुएन सांग समाधानी नव्हता. कारण अनेक वाक्प्रचार वा शब्द यांचा चुकीचा अर्थ लावला तर मूळ शिकवणुक पातळ होते असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे मूळ भाषेमध्ये म्हणजे संस्कृत वा प्राकृतात हे ग्रंथ वाचून त्यांच्या अनुवादाची शिस्त लावायला हवी, असं शुएन सांगने मनावर घेतलं. प्रवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक राजाच्या दरबारात शुएन सांग हजेरी लावत होता. राजसत्तेचा पाठिंबा आणि मदत मिळाली तर आपला प्रवास सुकर होईल अशी त्याची धारणा होती. फासियनचा प्रवास व्यापारी तांड्यांसोबत झाला तर शुएन सांगला राजनैतिक संरक्षण मिळालं. फासियन आणि शुएन सांग यांच्या यात्रांमध्ये सुमारे तीन शतकांचा काळ आहे. मात्र परिस्थिती—राजकीय, सामाजिक, तंत्रवैज्ञानिक इत्यादी- बदललेली नव्हती. हाडं फोडणारी थंडी, वाळवंट आणि पर्वतरांगांतून जाणारे व्यापार्‍यांचे तांडे, त्यांच्यावर हल्ले करणाऱ्या लुटारुंच्या टोळ्या या परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता.

फासियनपेक्षा अधिक तपशीलात शुएन सांग राज्यांचं, तेथील बौद्ध धर्माच्या प्रभावाचं, बौद्ध मंदिरं, लेण्या इत्यादींचं वर्णन करतो. हिंदुस्थानला चिनी भाषेमध्ये यिंडू (Yindu) हा शब्द अचूक आहे, असं शुएन सांगने म्हटलं आहे. आजही चीनमध्ये ‘हिंदुस्थान’ वा ‘इंडिया’ या शब्दासाठी हाच शब्द योजला जातो. हिंदुस्थानचा भूगोल, हवामान, मोजमापाच्या पद्धती, भोजनाच्या पद्धती, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यं, संकेत, नागरी जीवन, इमारती आणि अन्य वास्तू, जातिव्यवस्था, विविध उत्पादनं—शेती, वनोपज, कारागीरीच्या वस्तू, कारखान्यातील वस्तू, इत्यादींची यादीच शुएन सांगने दिली आहे. बौद्ध धर्माचे ग्रंथ, त्याचा अभ्यास, ब्राह्मणांच्या शिक्षणाच्या पद्धती, असे अनेक तपशील शुएन सांगच्या प्रवासवर्णनात आहेत. बामियानच्या बुद्ध मूर्तींचं वर्णन शुएन सांगने केलं आहे. बामियान हे बौद्ध धर्माच्या अभ्यासाचं महत्वाचं केंद्र आहे अशी नोंद त्याच्या वृत्तांतात आहे. हिंदुस्थानात मात्र बौद्ध धर्माचा प्रभाव उताराला लागल्याचं त्याला दिसलं. नालंदा विद्यापीठात त्याची सर्व व्यवस्था करण्यात आली. त्याला हिंडण्यासाठी एक हत्ती देण्यात आला होता. या विद्यापीठात त्याने काही वर्षं अध्ययन केलं आणि नंतर अध्यापनही.

शुएन सांगच्या काळात उत्तर भारतावर सम्राट हर्षवर्धनाची सत्ता होती. झेलम, चिनाब, बियास, रावी आणि सतलज या पाच नद्यांचा प्रदेश पंजाब, आजचा राजस्थान व सिंधचा काही भाग, ही त्याची मांडलिक राष्ट्र होती. आजचा गुजरात, अर्ध्याहून अधिक मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार व बंगाल त्याच्या अधिपत्याखाली होता. नालंदा विद्यापीठाला हर्षवर्धनाचा आश्रय होता. आसपासच्या काही गावांचा महसूल या विद्यापीठाला देण्यात येत असे. नालंदा विद्यापीठात अध्ययन-अध्यापन करणाऱ्या शुएन सांगची किर्ती सम्राट हर्षवर्धनाच्या कानावर गेली. त्याने शुएन सांगला बुलावा धाडला. मात्र तेथील सरदाराने उलटा निरोप पाठवला की शुएन सांगला आपल्या दरबारात पाठवण्याऐवजी माझं शिर आपल्याला नजराणा म्हणून पाठवू का? सम्राटाने उत्तर दिलं, ताबडतोब आपलं शिर पाठवा. हर्षवर्धन आणि शुएन सांग यांची भेट झाली. त्यांच्यातील संवाद आणि मैत्री यामुळे चीन आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधांमधून चीन आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये बौद्ध धर्मासंबंधात देवाण-घेवाण वाढीस लागेल, अशी शुएन सांगची धारणा होती. टांग राजघराण्याच्या नोंदीनुसार या राजनैतिक संबंधांमुळे हिंदुस्थानातील वैद्यकीय ज्ञान चीनला मिळालं.

भारतीयांच्या संकुचित मनोवृत्तीचा आणि धारणांचा अनुभवही शुएन सांगने नोंदवला आहे. शुएन सांगने चीनला परतण्याचा निर्णय घेतला त्यावेळी नालंदा विद्यापीठातील अनेक विद्वानांनी त्याला विचारलं,  चीनला परत जावं असं तुला का वाटतं? एकाही बोधिसत्वाचा जन्म चीनमध्ये झालेला नाही. संत आणि तपस्वी कधीही चीनला जात नाहीत. कारण तेथील माणसं संकुचित मनाची आणि मागासलेली आहेत. तिथली हवा थंड आहे आणि भूमी पर्वतरांगांनी व्यापलेली आहे. अशा मागास समाजाबद्दल गतकातर का होतोस, असा प्रश्न त्यांनी शुएन सांगला केला. चीन हा एक प्रगत आणि सुसंस्कृत देश आहे. सर्व देशात एकच कायदा आहे, तेथील सम्राट दयाळू आहे. बुद्धाच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार सर्व समाजांमध्ये करायला हवा हे आपण कधीही विसरता कामा नये, अशा शब्दांत शुएन सांगने त्यांना उत्तर दिलं.

आपल्या साम्राज्याच्या सीमेपर्यंत शुएन सांगचा परतीचा प्रवास सुखकर होईल ही जबाबदारी सम्राट हर्षवर्धनाने घेतली होती. मूळ बौद्ध ग्रंथांच्या काळजीपूर्वक केलेल्या नकला घेऊन शुएन सांग माघारी फिरला. त्याची यात्रा १९ वर्षं चालली होती. चीनमध्ये परतल्यावर त्याने बौद्ध धर्मग्रंथांच्या अनुवादाचं काम पूर्ण केलं. वयाच्या साठाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. पूर्ण फुललेलं पांढरं शुभ्र कमळ मला दिसतं आहे, हे त्याचे शेवटचे शब्द होते.

 

सुनील तांबे

9987063670 

3 Comments
  1. Sadhana says

    Very nice

  2. लक्ष्मीकांत says

    खूप छान सर

  3. अविनाश चाटोरीकर, परभणी. says

    माहितीपूर्ण. ज्ञानात भर पडली. धन्यवाद तांबे सर!

Leave A Reply

Your email address will not be published.