आत्ता गुगलवर मराठीतच लिहलं पाहीजे, पण का ?

आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली.

सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर बराच वर लागतो. यातही पहिल्यांदा इंटरनेटचा वापर करणारे लोक भारतामध्येच जास्त आहेत. या सगळ्या लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी गुगलचा हा खटाटोप सुरू आहे.

इंग्रजी वाचणाऱ्या, इंग्रजीमध्ये गुगल सर्च करणाऱ्या लोकांची संख्या आता फारशी वाढणार नाही हे गुगलने वेळीच ओळखून आता आपला मोर्चा प्रादेशिक भाषांकडे वळवला आहे.

यातही हिंदी, तामिळ, बंगाली आणि तेलगू या भाषांना त्यांनी प्रथम पसंती दिली आहे. हळूहळू इतरही भाषांकडे ते वळणार आहेत. आपली वेगवेगळी उत्पादने या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल आता प्रयत्नशील आहे. यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये लिहिणाऱ्या, किंवा प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलेला मजकूर प्रकाशित करणाऱ्या लोकांची मदत घ्यायची असे त्यांनी ठरविले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून भारतातील ११ शहरांमध्ये गुगल सर्च संमेलन भरविण्यात आले आहे. लक्षात घ्या, जे गुगल एकेकाळी भारताला खिजगणतीतही धरत नसे, तेच गुगल आता भारतीय प्रादेशिक भाषांसाठी पायघड्या घालत आहे ही फार मोठी गोष्ट आहे.

गुगलची सर्च आऊटरिच टीम या शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रादेशिक भाषांमधील ‘कंटेंट क्रिएटर्स’ना भेटते आहे.एक दिवसाच्या या वर्कशॉपमध्ये गुगल सर्च नक्की कसे काम करते? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे नक्की काय? ते करत असताना काय करावे आणि काय करू नये या विषयांवर पहिल्या सत्रात माहिती देण्यात आली..

त्यानंतर गुगलचे येऊ घातलेले उत्पादन ‘क्वेश्चन हब’ याविषयी माहिती देण्यात आली. इंटरनेटवर लोक काय शोधत आहेत? कोणत्या प्रश्नांची उत्तरे गुगलवर उपलब्ध नाहीत? हे या ‘क्वेश्चन हब’मार्फत गुगल आपल्या पार्टनर्सला कळविते. मग हे पार्टनर्स त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये ती माहिती लिहून प्रकाशित करतात. सध्या हे उत्पादन हिंदी ह्या भारतीय आणि बहासा या इंडोनेशियामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेत उपलब्ध आहे.

मोबाईल इंटरनेटकर्त्यांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन बऱ्याच वेबसाईट्स आता मोबाईल फ्रेंडली व्हर्जनसुद्धा आणत आहेत. या मोबाईल फ्रेंडली वेबसाईट्स तयार करताना काय दक्षता घेतली पाहिजे यावरही एक सत्र पार पडले. (भारतात एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ९९% लोक आपल्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.)

या संमेलनामध्ये सहभागी लोकांसाठी सर्वाधिक आवडता विषय होता गुगल अॅडसेन्स. या उत्पादनाद्वारे गुगल तुमच्या वेबसाईटवर काही जाहिराती दाखवते. तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांनी या जाहिरातींवर लोकांनी क्लिक केले की तुम्हाला पैसे मिळतात असा साधा फंडा. कोणत्याही वेबसाईटवर अॅडसेन्सद्वारे जाहिराती दाखवणे वाटते तितके सोपे मात्र नाही. अॅडसेन्ससाठी नोंदणी करणाऱ्या केवळ १०-१२% वेबसाईटला गुगलची परवानगी मिळते.ही परवानगी मिळाल्यानंतरही गुगलने घालून दिलेले नियम पाळावे लागतात. कृत्रिम क्लिक्स, रोबोटचा वापर असे प्रकार आढळल्यास गुगल तुमच्या वेबसाईटला कायमचे बाद करू शकते. एखाद्या भाषेतील अधिकाधिक वेबसाईट्सने असेच गैरप्रकार केले तर गुगल त्या भाषेतील अॅडसेन्ससाठीचा सपोर्ट बंदही करू शकते. त्यामुळे अॅडसेन्स वापरताना काय दक्षता घेतली पाहिजे हेही गुगलच्या लोकांनी सांगितले.

सध्या अॅडसेन्स फक्त इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये कधी येणार असे विचारले असता आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच आम्ही मराठीसाठी देखील अॅडसेन्स लाँच करू असे सांगण्यात आले. मराठीआधी इतर भाषांना प्राधान्य का? असा प्रश्न विचारल्यावर, इतर भाषांमध्ये मराठीपेक्षा जास्त प्रमाणात कंटेंट क्रिएशन होते. तामिळ, तेलगू वापरकर्ते त्यांच्या भाषेत लिहितात, गुगल सर्च करतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले असे सांगण्यात आले.

मित्रांनो म्हणूनच मराठीमध्ये कंटेंट क्रिएशनची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मराठी भाषकांची संख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब दिलासा देणारी असली तरी नुसतं मराठी बोलून भागणार नाही तर मराठीत लिहावे सुद्धा लागणार आहे.तरच इतर प्रादेशिक भाषांसमोर आपण टिकू शकणार आहोत. मराठी आणि हिंदी भाषांची लिपी देवनागरी असल्याचा फटका नकळतपणे मराठीला बसतोय असे मला वाटते.

जवळपास सगळ्याच मराठी भाषकांना, वाचकांना हिंदी बोलता आणि वाचता येते. त्यामुळे शोधत असलेली माहिती हिंदीमध्ये उपलब्ध असली तरी आपण त्यावर समाधान मानतो आणि शांत बसतो.

भारतातील सर्वाधिक इंग्रजी भाषक महाराष्ट्रामध्ये नोंदवले गेले आहेत. इंग्रजी आपली मातृभाषा आहे असे सांगितलेल्या २.६ लाख लोकांपैकी जवळपास १ लाख लोक महाराष्ट्रातील आहेत. इथे मात्र आपण तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना मागे टाकले आहे. विकिपीडियानेदेखील आपले लेख प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. तिथेही सध्या हिंदी आणि तामिळ भाषेत सर्वाधिक लेख उपलब्ध आहेत.तेलगू आणि बंगाली भाषांनी तिथेही आपल्याला मागे टाकले आहे.

इतर राज्यांतले लोक आपल्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या इंटरनेटवरील रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात आपली मातृभाषा वापरत असताना आपण त्यात मागे राहतोय की काय अशी शंका येतेय. आत्ताच यावर कृती केली नाही तर असेच सतत वाट पाहत बसावे लागेल. म्हणून मित्रांनो इथून पुढे इंटरनेटवर लिहिताना, बोलताना, वाचताना मराठीचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतरांनाही सांगा.

भविष्य इंटरनेटवर बेतलेलं असताना तिथे मराठी मागे रहायला नको ही काळजी आपण नाही तर अजून कुणी घ्यायची ?

  • आदित्य गुंड
Leave A Reply

Your email address will not be published.