मृत म्हणून घोषित केलेला बालेश कुमार 20 वर्षांनी जिवंत सापडला…

नुकताच करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांचा “जानेजान” हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. यामध्ये नरेश व्यास नावाच्या एक गणिताच्या शिक्षकाची भूमिका जयदीप अहलावत याने, करीना कपूर हिने माया डिसूझा हिची तर विजय वर्माने इंस्पेक्टर करण नावाची भूमिका पार साकारली आहे. या चित्रपटातील एक सीन आहे.

 

ज्यात करीना कपूर ही आपल्या घरगुती हिंसा करणाऱ्या पतीला मारून टाकते. मग करीना कपूरला वाचवण्यासाठी जयदीप अहलावत येतो. तो करीना कपूरच्या मृत पतीचे शरीर घेऊन जातो आणि त्याला जाळून टाकतो. पण शेवटी कळते की, ते जाळून टाकलेले शरीर हे करीना कपूरच्या पतीचे नव्हते तर दुसऱ्याचे होते. 

 

यामध्ये करीना कपूरच्या पतीचे शरीर कुठे गेले हे माहीत नाही. पण ज्याचे शरीर जाळून टाकले गेले, तो रस्त्यावरील गरीब माणूस होता. अर्थात, हा चित्रपटातील सीन आहे. पण अशीच एक घटना दिल्ली इथं घडली आहे.

यामध्ये 20 वर्षापूर्वी बालेश कुमार नावाचा माणूस जळून मेला आहे, असे घोषित करण्यात आलं होतं. मात्र तो व्यक्ती तब्बल वीस वर्षांनंतर आता पोलिसांना जिवंत सापडला आहे. या घटनेतसुद्धा जळून मेलेली व्यक्ती बालेश कुमार नसून दुसरीच होती.

एखाद्या क्राइम थ्रिलर पिक्चरला सुद्धा लाजवेल अशी या माणसाची कहाणी आहे. आणि या माणसाच्या भोवताली घडलेल्या घटनासुद्धा अशाच आहेत.

हा बालेश कुमार मूळचा हरियाणाचा. या प्रांतातील लोकांचा सैन्यात जाण्यावर भर असतो. तसाच बालेश कुमार हाही 1981 साली भारतीय नौदलात दाखल झाला. नौदलात त्याने जवळपास पंधरा वर्षे नोकरी केली आणि 1996 साली तो निवृत्त झाला.

अर्थात, सरकारी नोकरी असल्यामुळे तो चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे नोकरी संपल्यानंतर काय करावे म्हणून याने ट्रक-ट्रान्सपोर्टिंगच्या व्यवसाय सुरू केला.

इथं पर्यंत बालेश कुमारचे आयुष्य सुरळीत चालले होते. पण यानंतर मात्र तो गुन्हेगारीच्या विश्वात कसा दाखल झाला ?

बालेश कुमारने पहिला गुन्हा केला तो 2000 साली. राजस्थानमधील कोटा मध्ये त्याने त्याचे वडील आणि मित्र राजेश यांच्या साथीने घरफोडी केली. त्याने या घरफोडीत एका ऑफिसरच्या घरातील महत्वाच्या आणि किंमती वस्तु लुटल्या. बालेशने पहिली चोरी केली आणि पकडलाही गेला. पण या गुन्ह्यातून त्याला बेल मिळाली आणि तो कोठडीतून बाहेर पडला. पण म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणे या बालेशने काही गुन्हे करायचे सोडले नाही.

2004 साली त्याने परत एका गुन्हा केला. या गुन्ह्याने सर्वांना थक्क करून टाकले आहे.

त्याचे झाले असे की, २००४ साली बालेश कुमार, त्याचा भाऊ सुंदर लाल आणि त्याचा मित्र राजेश यांची दारू पिऊन खडाजंगी झाली. यात पैशाच्या देवाण-घेवाणी वरून त्यांचे वादही झाले. पोलिसांच्या मते, याच वादामध्ये राजेशने आपला मित्र बालेशवर “माझ्या बायको आणि तुझे अफेयर आहे” असा आरोप केला. यामुळे राग येऊन बालेश आणि सुंदर लाल या दोघा भावांनी राजेश याची हत्या केली.

आता मृत शरीराचे काय करावे म्हणून त्यांनी ते शरीर दिल्ली बाहेरील वस्तीत टाकून दिले. आता बालेश वर दोन केसेसची टांगती तलवार होती. यावेळेस तो पोलिसांना सापडला असता तर त्याला पोलिसांनी सोडले नसते. त्यामुळे पोलिसांना चकवण्यासाठी त्याने एक योजना आखली. असं त्याने आता पोलिसांना कबूल केले आहे. ही योजना त्याच्या डोक्यात चित्रपट पाहून आली होती.

जसा अजय देवगण दृशम चित्रपटात आपल्या मुलीने केलेला खून लपवण्यासाठी वेगवेगळ्या मूवीज पाहून योजना आखतो, त्याचप्रमाणे या बालेश कुमारने आपण केलेला खून लपवण्यासाठी मूवीज पाहून योजना आखली. मात्र दृशम मधील अजय देवगण आणि बालेश कुमार मध्ये दोन फरक आहेत.

पहिला फरक म्हणजे अजय देवगणने स्वत: खून केला नव्हता आणि दूसरा फरक म्हणजे आपला खून लपवण्यासाठी अजय देवगणने इतर लोकांचा खून केला नव्हता. पण बालेश कुमार हा स्वत: खूनी पण आहे आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी तो इतरांचा पण बळी घेत गेला.

राजेशचा खून केल्यानंतर बालेश कुमारला माहीत होते की, एक ना एक दिवस पोलिस त्याचा शोध घेत येणार. या सगळ्यातून वाचण्यासाठी त्याने एक योजना आखली.

त्याने दिल्लीतील एका ठिकाणाहून, मनोज आणि मुकेश या दोन मजूरी करणाऱ्या बिहारी लोकांना ट्रकमध्ये लिफ्ट दिली. तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रकशन साइटवर सोडून देतो म्हणून या दोघांना तो घेऊन राजस्थानमधील जोधपुर या ठिकाणी घेऊन गेला. वाटेत बालेशने मनोज आणि मुकेशला भरपूर प्रमाणात दारू पाजली. जोधपुर येथे गेल्यावर त्याने ट्रकसहित मनोज आणि मुकेश यांना जाळून टाकून, फरार झाला. पण त्याने हुशारीने आपली सर्व कागदपत्रे ट्रकमध्येच ठेवली. त्यामुळे पोलिसांना वाटले की, या दोन व्यक्तीं मधील एक व्यक्ती ही स्वत: बालेश कुमारच आहे.

याशिवाय त्याच्या वडिलांनी मृत व्यक्ती पैकी एक बालेश कुमार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याचे फेक डेथ सर्टिफिकेट तयार केले. त्याच्या पेंशनची सर्व कागदपत्रे तयार केली. त्यामुळे पोलिसांना खरंच वाटले या मृत व्यक्ती पैकी एक म्हणजे बालेश कुमारच आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही प्रकरणाचा तपास करणेच सोडून दिले. बालेश कुमारने यानंतर अमन सिंह हे नवीन नाव घेऊन, विविध राज्यात फिरू लागला. त्याने अमन सिंह नावाचे आधार कार्ड काढले. गेली वीस वर्ष तो अशाच प्रकारे फिरत राहिला.

मात्र तीन महिन्यापूर्वी तो दिल्ली नजफगढ येथील आपल्या निवासस्थानी परत आला. त्याला वाटले की, प्रकरण आता इतके थंड झाले आहे, याकडे कोण लक्ष देणार. पण सप्टेंबरमध्ये पोलिसांना याबद्दल टीप मिळाली आणि दिल्ली पोलिसानी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आपण काय काय केले याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

पण आता दिल्ली पोलिसासमोर मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे मनोज आणि मुकेश यांचा. कारण त्यांची पूर्ण नावे दिल्ली पोलिसांना माहीत नाहीयेत आणि त्यांच्या घरपर्यंत हा संदेश कसा पोहचायचा हा प्रश्न दिल्ली पोलिसांसमोर आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.