प्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत असतं

“चार महीने से मैं मां बनने का सपना देखती रहीं हूं… एक मां के रूप में मैं ऐसा नहीं कर सकती। क्या मैं महीनों तक इसे कोख में रखकर इसकी हत्या कर दूं” या तीन वाक्यांमध्येच एका स्त्रीची आई होण्याची इच्छा दिसून येते. तिच्या पोटात असलेल्या बाळासाठी तिची होणारी तळमळ आणि हतबलता दिसून येते. तिला तिच्या बाळाला जन्म द्यायचा होता, पण त्याआधीच  ती आणि तिचं न जन्मलेलं बाळ एका नामांकित राजकीय नेत्याचं सावज बनलं.

ही गोष्ट आहे प्रेम, द्वेष आणि राजकारण यात अडकलेल्या प्रेमाची आणि त्यातून झालेल्या हत्येची. ही गोष्ट आहे मधुमिता हत्याकांडाची.

९ मे २००३, लखनऊची पेपरमिल कॉलनी, २४ वर्षांची मधुमिता तिच्या घरात निवांत बसली होती आणि तिच्याकडे घरकाम करणारा देशराज त्याचं काम करत होता. तेव्हाच दुपारच्या तीन वाजता मधुमिताच्या घराची डोअरबेल वाजली. देशराजनं दरवाजा उघडला. दरवाजावर दोन तरुण होते. हे दोघं आदल्या दिवशी सुद्धा मधुमिताला भेटण्यासाठी आले होते पण तेव्हा मधुमिताने त्यांना भेटायला नकार दिला होता.

खरंतर मधुमिता एक कवयित्री होती. आपल्या कवितेतून ती राजकारणातल्या घडामोडींवर भाष्य करायची, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तिची बरीच चर्चा असायची. असेच हे दोन तरुण सुद्धा ‘आम्हाला मधुमिता यांच्या कविता आवडतात’ असं सांगून देशराजकडे मधुमिताला भेटण्यासाठी विनवण्या करत होते.

त्यातल्या एका तरुणाचं नाव संतोष राय होतं आणि दुसऱ्याचं प्रकाश पांडे.

अखेर देशराजने मधुमिताला जाऊन त्या दोघांबद्दल सांगितलं. मधुमितानं त्या दोघांनाही घरात बोलावलं आणि देशराजला आलेल्या पाहुण्यांसाठी चहा बनवून आणण्यासाठी सांगितलं. देशराजनं त्यांना चहा दिला. पण मधुमिता देशराजला पुन्हा किचनमध्ये पाठवलं आणि तिथेच थांबायला सांगितलं.

देशराज किचनमध्ये गेल्यावर काही वेळातच त्याला मधुमिताच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. देशराजनं लगेचच बाहेर जाऊन बघितलं तर मधुमिता तिच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पण ते दोन्ही तरुण मात्र तिथून पळून गेले होते.

एका तरुण कवयित्रीची तिच्याच घरात घुसून गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. सगळीकडे खळबळ उडाली. पण मधुमिताच्या पोस्टमार्टमनंतर या हत्याकांडाने वेगळंच वळण घेतलं.

मधुमिता ही २४ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी होती. पण जेव्हा तिची हत्या झाली तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. लग्न झालं नसल्याने हे बाळ कोणाचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.

पोलिसांना मधुमिताच्या घरात एक पत्र सापडलं. हे पत्र मधुमितानेच तिच्या हत्येच्या काही महिने आधीच लिहिलं होतं. यात तिने लिहिलं होतं, “चार महिन्यांपासून मी आई होण्याचं स्वप्न बघत आहे. तुम्ही हे बाळ स्वीकारण्यास नकार देऊ शकता, पण एक आई म्हणून मी हे करू शकत नाही. अनेक महिने माझ्या गर्भात ठेवल्यानंतर मी या बाळाला कसं मारू शकते? मला किती वेदना होत आहेत याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? तुम्ही मला फक्त उपभोगाची वस्तू मानलीत.”

या पत्रानंतर ही हत्या मधुमिताच्या पोटात असलेल्या बाळामुळेच करण्यात आली आहे हे स्पष्ट झालं.

मधुमिताचं युपीच्या राजकीय वर्तुळात उठणं बसणं होतं त्यामुळे तिच्या हत्येनंतर अनेक नेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. या तपासात एक नाव सातत्याने येत होतं ते म्हणजे युपीचे बाहुबली नेते अमरमणी त्रिपाठी. मधुमिताच्या अभ्रकाचा डीएनए सुद्धा अमरमणी यांच्याशी मॅच झाला आणि या हत्याकांडाचं कोडं हळूहळू सुटत गेलं.

१९९९ चा तो काळ होता. युपीच्या लखीमपूर खेरी या छोट्याशा शहरातून आलेली तरुण कवियत्री मधुमिता शुक्ला हिचं संपूर्ण युपीमध्ये तिच्या कवितांमुळे नाव होऊ लागलं होतं. राजकीय आणि सामाजिक कवितांवर तिचा भर असायचा. मधुमिताच्या कवितांमधून तिला समाजाविषयी असणारी जाण आणि राजकारणाविषयी असलेली ओढ हे स्पष्ट दिसून यायचं.

ती तिच्या अवघ्या विशीत होती, पण तिच्या कवितांमुळे तिचा राजकीय नेत्यांसोबतचा संपर्क हळूहळू वाढू लागला.

तेव्हाच नोव्हेंबर १९९९ मध्ये तिची भेट युपीचे बाहुबली नेते अमरमणी त्रिपाठी यांच्याशी झाली. अमरमणी त्रिपाठी, हे त्या काळातलं युपीच्या राजकारणातलं एक नाव. पण राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी गुन्हेगारीच्या क्षेत्रात आधीच पाऊल टाकलं होतं. त्यांच्यावर अपहरण, मारहाण, दरोडा असे बरेच गुन्हे दाखल होते. पण हरिशंकर तिवारी यांच्या छत्रछायेत अमरमणींनी आपलं राजकीय वर्चस्व बळकट केलेलं.

त्यावेळी पंडित हरिशंकर तिवारी यांचा युपीच्या राजकारणात मोठा दबदबा होता आणि अमरमणी त्रिपाठी यांना पंडित हरिशंकर तिवारी यांचे राजकीय उत्तराधिकारी मानलं जायचं. याचाच फायदा घेत अमरमणी यांनी कधी बसपा मधून, कधी भाजप मधून तर कधी सपा मधून तिकीट घेऊन निवडणूक लढवली आणि सलग सहा वेळा आमदारकी मिळवली.

अमरमणींच्या याच राजकीय व्यक्तिमत्वाची भुरळ मधुमिताला पडली. अमरमणी यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना मुलंही होती. पण तरीही विशीतली मधुमिता त्यांच्या प्रेमात पार बुडून गेली होती. तिचं अमरमणींच्या घरी सुद्धा येणं जाणं वाढलं होतं. अमरमणी आणि मधुमिता मधलं प्रेम आता फुलत चाललं होतं.

या दरम्यान अनेकवेळा मधुमिता गरोदर राहिली होती पण प्रत्येकवेळेला अमरमणींनी तिला ऍबॉर्शन करण्यासाठी भाग पाडलं होतं.

मधुमिता पुन्हा गरोदर राहिली पण आता मधुमिताला हे बाळ हवं होतं. दबाव आणून सुद्धा मधुमिता ऍबॉर्शनसाठी तयार होत नव्हती. दुसरीकडे मधुमिताच्या सुद्धा लक्षात आलं होतं की अमरमणी तिचा फक्त वापर करत आहेत. या बाळामुळे दोघांमध्ये तणाव वाढला होता.

अमरमणींचं राजकीय करियर आता कुठे पिकवर आलं होतं, त्यात मधुमिता प्रेमप्रकरण आणि आता मधुमिताचं हे बाळ. अमरमणी आता पुरते पेचात होते.

लोकांना प्रसिद्धी मिळाली की अशी नाती कोणापासून लपून राहत नाहीत आणि त्यात राजकारण असेल तर अशी नाती जास्त काळ टिकतही नाहीत. अमरमणी आणि मधुमिताच्या नात्याबद्दल सुद्धा चर्चा तर होत होती पण उघडपणे कधीच कोणी बोललं नव्हतं. त्यामुळे आता आपलं राजकीय करियर धोक्यात येतंय का याची भीती अमरमणी त्रिपाठी यांना वाटू लागली होती.

मधुमिताच्या प्रेमप्रकरणामुळे अमरमणींची पत्नी मधुमणी सुद्धा मधुमिताचा द्वेष करत होत्या. त्यामुळे अमरमणींचं एकूणच राजकीय आणि वैवाहिक अशी दोन्ही आयुष्य विस्कळीत झाली होती.

अखेर अमरमणी त्रिपाठी, त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी आणि भाचा रोहित चतुर्वेदी यांनी मधुमिताच्या हत्येचा कट रचला. त्यांनी प्रकाश पांडे आणि संतोष राज या दोन शूटर्सना मधुमिताच्या हत्येची सुपारी दिली. अखेर मधुमिता आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचा गोळ्या झाडून शेवट करण्यात आला. पण काही दिवसांतच मधुमिताच्या पत्रामधून अमरमणी यांचं नाव समोर आलं आणि मधुमिताचं बाळ सुद्धा त्यांचंच असल्याचं सिद्ध झालं.

यात मधुमणी त्रिपाठी यांची सुद्धा चौकशी करण्यात येत होती. यानंतर मधुमिता हत्याकांड ही हाय प्रोफाइल केस झाली आणि सीबीआयकडे याची सूत्र फिरवण्यात आली.

एकामागोमाग एक पुरावे मिळत गेले आणि अमरमणी त्रिपाठी, मधुमणी त्रिपाठी, रोहित चतुर्वेदी, प्रकाश पांडे आणि संतोष राज यांना अटक करण्यात आली. हत्याकांडाच्या सहा महिन्यानंतरच डेहराडून मधल्या न्यायालयाने या पाचही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमरमणी यांना अटक करण्यात आली.

यानंतर युपीचं राजकारण तर ढवळून निघालं होतंच आणि बऱ्याच राजकीय पक्षांनी मधुमिता हत्याकांडाचं भांडवल करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला होता. पण निखळ प्रेम, विश्वासघात आणि राजकारण यात मधुमितासारखं कणखर व्यक्तिमत्व आणि निष्पाप बाळ यांनी हकनाक आपला जीव गमावला होता.

अमरमणी आणि मधुमणी यांना मधुमिता हत्याकांडासाठी २००३ मध्ये जन्मठेप सुनावण्यात आली होती पण उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन विभागाने या दोघांनाही त्यांचं तुरुंगातलं वर्तन चांगलं असल्याचं  सांगून, उर्वरित शिक्षा रद्द करून त्यांना मुक्त करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे त्रिपाठी दांपत्य आता तब्बल २० वर्षांनी तुरुंगातून बाहेर येईल आणि मधुमिता प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.