देशाचे रेल्वे मंत्री सांगतायत, पुण्याची ओळख म्हणजे चितळे बंधू मिठाईवालेच…

नुकतंच बजेट सादर झालं, कित्येक लोकांनी अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यावर टीव्ही बंद केले आणि सोशल मीडियावर रान हाणायला सुरुवात केली. पण बजेटनंतर एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स झाली, ती घेतली देशाच्या रेल्वेमंत्र्यांनी. आता आधी कसं दोन वेगळे बजेट सादर व्हायचे, आता नुसतं एका कॉन्फरन्सवर भागतं. रेल्वे हा तसा जिव्हाळ्याचा विषय… त्यामुळं अगदी मन लावून कॉन्फरन्स ऐकत होतो. जवळ नोटपॅडही घेतलं होतं, पण आपले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव एक वाक्य बोलले… आणि शप्पथ तेवढंच लक्षात राहिलं…

”हर जगह का अपना, अपना एक प्रॉडक्ट होता है, अगर पूना जाओगे तो चितळे बंधू मिष्टान्न भंडार की मिठाई खानीही खानी होती है.” एवढं साधं वाक्य आणि एवढं साधं उदाहरण… पण सगळ्या बजेटपेक्षा हेच वाक्य लय भारी वाटलं.

चितळे बंधू मिठाईवाले. त्यांच्या बोर्डाचा तो चॉकलेटी आणि लाल रंग, दुकानाबाहेर असलेला फळा आणि काही मीटर अंतरावरुन जरी गेलं तरी हमखास लागणारी भूक. जगात कुठल्याच मिठाईवाल्यांनी ही संपत्ती कमावली नसेल. चितळे बंधू मिठाईवाले, हे जगातलं एकमेव दुकान असेल जिथं ‘अनारसे संपले,’ हा बोर्ड वाचण्याचंही एक वेगळंच समाधान असतं.

तुम्ही पुण्यातून मुंबईला जा किंवा मलेशियाला, नागपूरला जा किंवा न्यूझीलंडला… तिकडच्या पाहुण्यांसाठी हमखास बाकरवडी घेऊन जाणारच…. आणि हा गल्लीतल्या दुकानांपासून मोठमोठे स्वीटमार्ट बाकरवडी बनवत असले, तरी त्याला चितळेंची सर येणं शक्यच नाही.

जगाच्या दृष्टीनं खवचट असलेल्या पुणेकरांचं मन जिंकणं ही सोपी गोष्ट नाही. पण सांगलीच्या चितळे बंधूंनी मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो हे फार आधी हेरलं आणि पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचं अफाट प्रेम मिळवलं.

सांगलीमधल्या भिलवडीमध्ये १९३९ मध्ये दिवंगत भास्कर चितळे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. भाऊसाहेब, राजाभाऊ, नानासाहेब आणि काकासाहेब चितळे या भावंडांनी आपल्या वडिलांनी लावलेल्या रोपट्याचं झाड करायला घेतलं. १९५० मध्ये भाऊसाहेबांनी म्हणजेच रघुनाथ चितळे यांनी ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची सुरुवात केली. नानासाहेब आणि काकासाहेब चितळे यांनी भिलवडीमधली डेअरी सांभाळण्याची भूमिका स्वीकारली, तर भाऊसाहेब आणि राजाभाऊंनी पुण्याची कमान हाती घेतली. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही गोडव्याचा आणि एकजुटीचा वारसा जपला आणि भास्कर चितळेंनी लावलेल्या रोपट्याचा खऱ्या अर्थानं वटवृक्ष झाला.

त्यांच्या पुण्यात किती शाखा आहेत, ही गोष्ट कधी मोजावीच वाटली नाही. आपल्या घरापासून चितळे जवळ असलं की झालं, आणि नसलंच तरी डेक्कन किंवा शनिपारला जायला पुणेकरांना कारण शोधावं लागत नाही. डेक्कनचं चितळे बंधू हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे आपण त्या छोट्याश्या चढावर गाडी घातली की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघून डोळ्यात अभिमान दाटतो आणि चढ उतरला की मान आपोआप चितळ्यांच्या दुकानाकडे वळते. आपला उपास, डायट या सगळ्या गोष्टींना छेद देत… मराठमोळ्या बाकरवडीपासून ते बंगाली चमचमपर्यंत कित्येक पदार्थ शून्य मिनिटांत डोळ्यांसमोरुन जातात.

खरे पुणेकर पुण्याच्या बोळांमध्ये नाही भेटले, तरी चितळेंच्या रांगेत हजार टक्के भेटणार. चितळेंच्या दुकानापुढची रांग, हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आलम दुनियेत न सापडणारे नग तुम्हाला इथं भेटू शकतात. इथं थ्री पीस सूट घातलेला माणूसही हातात फुलाफुलांची कापडी पिशवी घेऊन थांबलेला दिसतो आणि चप्पल झिजलेली असली तरी प्लॅस्टिकची पिशवी घेऊन नातवाला आवडणारी बाकरवडी घ्यायला आलेली आज्जीही दिसते. या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन असते.. चेहऱ्यावरची उत्सुकता आणि काऊंटरवरुन निघताना समाधान.

चितळे आधी एक ते चार बंद असायचं… पुण्यासारखंच. पहाटे उठून निम्म्यापेक्षा जास्त पुण्याच्या दुधाची तहान दुधावरच भागवणाऱ्या माणसांना विश्रांती हवीच की, त्यामुळे दुकान बंद असायचं. आता ती पद्धत बंद झाली, याचा तसा फायदा झाला असला… तरी एक तोटा मात्र झाला. दुपारी ३.५५ ला धावतपळत जाऊन चितळेमध्ये एंट्री मारायची आणि ३.५९ ला विजयी मुद्रेनं बाहेर पडण्यात जी जगात भारी मजा होती, ती तेवढी गेली.

कॅडबरी सेलिब्रेशन्सचा खप कितीही वाढला, तरी ओवाळण्याच्या आधी बहिणीला ‘चितळे बंधू मिठाईवाले’ लिहिलेला बॉक्स दिसला की राखीची गाठ थोडीशी घट्ट बसते, हे ही तितकंच खरं.

आजच्या घडीला पुण्यात काय नाहीये? विद्येचं माहेरघर अशी ओळख आहे, आयटी पार्क आहेत, खेळ आहेत, खेळाडू आहेत, कला आहे, गाणं आहे, इतिहास आहे आणि विस्तारलेला भूगोलही. पण देशाच्या रेल्वे मंत्र्यांनाही पुण्याचं नाव घेतल्यावर चितळे बंधू मिठाईवालेच आठवतात. कारण चितळेंनी त्यांचं पुणेरीपण जपलंय… पाट्यांपासून ते अगदी चवीपर्यंत!

अस्सल पुणेरी माणूस पुणे सोडून जाताना, बॅगेत बाकरवडीचं, सोनपापडीचं पॅकेट ठेवतो. हे पॅकेट फोडलं, की एक वेगळाच वास येतो… तसा वास फक्त पुण्याच्या हवेला आणि चितळेंच्या चवीला आहे. जो गेली कित्येक वर्ष बदललेला नाही आणि बदलण्याची शक्यताही नाही… बाकरवडीची शप्पथ!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.