बाळासाहेबांनी मुंबईतल्या पुलाला मीनाताईंचं नाव का देऊ दिलं नाही ?

कॅप्टन विनायक गोरे.
मुंबईतला पार्ल्याचा मुलगा ते भारतीय सैन्यातला कॅप्टन. त्याला खात्री होती एक दिवस तो आर्मी जनरल होणार. त्याचे डोळे स्वप्नाळू मुलासारखे निरागस होते पण त्याची जिद्द जबरदस्त होती. त्याच्या देशभक्तीचं त्याचे मित्र आजही उदाहरण देतात. काहीतरी चांगलं काम करायचं असेल तर सैन्यात भरती व्हायला हवं असं त्याचं मत होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि विवेकानंद कॅप्टन विनायकचे आदर्श होते. सोबतचे मित्र डॉक्टर इंजिनियर व्हायला धडपडत होते तेंव्हा विनायकने ठरवून टाकलं होतं की सैन्यात जायचं.
आणि त्याप्रमाणे भारतीय सेना जॉईन करून तो कॅप्टन विनायक बनला.
जम्मू कश्मीरमध्ये त्याची ड्युटी असायची. नवरात्रीच्या काळात सगळा देश गरबा खेळत होता. अचानक रात्री कुपवाड्यात ड्युटीवर असलेल्या कॅप्टन विनायक गोरेच्या तुकडीवर हल्ला झाला. विनायक गोरेने नेहमीसारखा प्रतिहल्ला चढवला. देशाची सुरक्षा हा विनायक गोरेचा प्रतिष्ठेचा विषय. पण त्या रात्री नियतीच्या नशिबात काहीतरी वेगळं होतं. एक मिसाईल थेट कॅप्टन विनायक गोरेच्या दिशेने आलं. तरुण आणि देखण्या कॅप्टन विनायक गोरेच्या देहाच्या चिंध्या झाल्या.
मुंबईत हुतात्मा विनायक गोरे यांच्या पराक्रमाची आणि दुखःद शेवटाची बातमी सगळ्यांना हेलावून टाकणारी होती.
विनायक गोरे सारख्या तरुणाला सीमेवर कशी झुंज द्यावी लागते, जीवावर उदार होऊन लढावं लागतं तेंव्हा कुठे आपण सुरक्षित असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं होतं. ही गोष्ट १९९५ ची. विनायक गोरे हुतात्मा म्हणून मुंबई आणि खासकरून पार्लेकरांच्या मनात घर करून आहे.
याच विलेपार्ले परिसरात एक पूल बनत आला होता. त्या पुलाला विनायक गोरेचं नाव द्यायचं असं सगळ्या नागरिकांनी ठरवून टाकलं होतं. यासंबंधात विनायक परब यांनी आपल्या लेखात एक अतिशय हृदयस्पर्शी आठवण सांगितली आहे. लोकांनी विनायक गोरे यांचं नाव द्यायचं तर ठरवलं होतं. पण दुर्दैवाने त्याच दरम्यान बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. शोकमग्न शिवसैनिकांनी भावनेच्या भरात पुलाला मीनाताई ठाकरेंचं नाव द्यायचं ठरवलं. तसे फलक काही शिवसेनेच्या शाखेला लागले.
पार्ल्यातल्या लोकांना लक्षात आलं की पुलाला कॅप्टन विनायक गोरेंच नाव देण्याची आपली इच्छा पूर्ण होणार नाही. विरोध करणार तरी कसा ? मीनाताईविषयी सुद्धा प्रेम होतंच. विरोध करायचं ठरवलं असतं तरी त्याकाळात शिवसेनेला विरोध म्हणजे चेष्टा नव्हती. पण लोकांना बाळासाहेबांवर विश्वास होता. काही काळाने त्यांनी बाळासाहेबांना फोन करून विषय सांगितला. विनायक गोरे सारख्या देशभक्त हुतात्म्याची माहिती बाळासाहेबांना असणार नाही असं होऊच शकत नव्हतं. लोकांनी खूप हिम्मत बांधून सांगितलं की पुलाला विनायक गोरेचं नाव द्यावं अशी आमची इच्छा होती. बाळासाहेबांनी अडचण काय असं विचारलं.
लोक म्हणाले काही लोक मीनाताईचं नाव देणार म्हणताहेत. बाळसाहेब बरसले. म्हणाले, त्या पुलाला फक्त आणि फक्त कॅप्टन विनायक गोरेंच नाव दिलं जाईल. दुसरं कुठलंच नाही. विषय संपला.
असे होते बाळासाहेब. एका देशभक्त हुतात्म्याचा सन्मान करण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःच्या पत्नीच्या नावाला बाजूला ठेवलं. कॅप्टन विनायक गोरे विसरले जाणार नाहीत. पण त्यांनी दाखवून दिलेल्या देशभक्तीच्या मार्गाचं त्यानिमित्ताने कायम आपल्याला स्मरण राहील.
अतिशय छान माहिती असते.
उपकार केले का देशभक्ताचे नाव ठेऊ देऊन? मीनाताई कशा वारल्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे.