भारताचा राजकीय इतिहास पाहता हवाई अपघातात बऱ्याच मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय

भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता.

पण बिपीन रावत हे एकटेच नाहीत तर भारताच्या राजकीय इतिहासात असे बरेच मोठे नेते होऊन गेले आहेत ज्यांच्या प्लेन क्रॅश, हेलकॉप्टर क्रॅश मध्ये मृत्यू झाला होता.  

१. वाय.एस.आर रेड्डी 

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या रेड्डी यांची सामान्य जनतेमध्ये ‘लोकनेता’ अशी ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर आंध्र प्रदेशमधील काँग्रेस साम्राज्याला घरघर लागली ती कायमचीच. त्यांची जनमानसावर इतकी पकड होती की त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अनेक जणांचा धक्का बसला आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. काही जणांनी तर आत्महत्या देखील केली होती. माध्यमांनी केलेली अतिशयोक्ती वगळली तरी त्यांची लोकप्रियता अफाट होती यात कसलीच शंका नव्हती आणि नाही.

आंध्रप्रदेशमध्ये ज्यावेळी फिल्म स्टार एन.टी.रामाराव यांच्या तेलगु देसम पक्षाने काँग्रेसचा दारूण पराभव केला होता त्यावेळी देखील वाय.एस.आर यांनी आपल्या पुलीवेन्डला या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. स्वतः इंदिरा गांधीनी या तरुण नेत्याच्या खांद्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती.

२ सप्टेंबर २००९ रोजी सकाळी मुख्यमंत्री म्हणून ते राज्याच्या दौऱ्यावर निघाले होते. सोबत राज्याचे मुख्य सचिव सुद्धा होते. ‘बेगमपेट’ विमानतळावरून त्यांच्या हेलीकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र थोड्याच वेळात खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलीकॉप्टरचा कंट्रोल रूमशी असलेला संपर्क तुटला. ‘नाल्लामला’ डोंगर रांगांमधील दुर्गम जंगलात त्यांचे हेलीकॉप्टर गायब झाले.

हा परिसर नक्षलवाद्यांचा कोअर भाग असल्यामुळे शोध मोहिमेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. शोध मोहिमेसाठी वायुदलाच्या सुखोई विमानाची मदत घेण्यात आली. अखेरीस २४ तासांच्या शोधानंतर वाय.एस.आर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह सापडले. आंध्र प्रदेशचे खऱ्या अर्थाने कधीही न भरून येणारे नुकसान त्या दिवशी झाले. आंध्र प्रदेशने त्या दिवशी सिंहासारखा आक्रमक सुपुत्र गमावला.

२. माधवराव सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया हे सुद्धा काँग्रेस चे मातब्बर नेते होते. १९७१ मध्ये मध्यप्रदेश मधील गुना मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना भरगोस मते देऊन निवडून सुद्धा दिले. १९७१ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले तेव्हा त्यांचे वय हे फक्त २६ वर्षे इतके होते. त्यांनंतर त्यांनी एकदाही पराभव अनुभवला नाही. ते प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत गेले. ते एकूण ९ वेळा निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले.

माधवराव सिंधिया यांचं सुरवातीपासून गांधी कुटुंबाशी अगदी जवळकीच नातं होतं. संजय गांधी यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. २३ जून १९८० रोजी जेव्हा इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी हे विमानाने उड्डाण घेणार होते त्या दिवशी त्यांच्या सोबत माधवराव सिंधिया हे त्यांच्यासोबत असणार होते. पण त्या दिवशी माधवरावांना उशीर झाला आणि त्यापूर्वीच संजय गांधी यांनी सुभाष सक्सेना यांच्यासोबत विमानाने उड्डाण घेतले. दुर्दैवाने त्या विमानाचा अपघात होऊन संजय गांधी यांचे दुर्दैवी निधन झाले.

नशिबाने माधवराव सिंधिया या विमान अपघातातून वाचले. विमान अपघाताची मालिका त्यांच्या आयुष्यातून सुटली नाही. सुदैवाने माधवराव संजय गांधींच्या विमान अपघातातून बचावले होते परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होते. दिवस होता ३० सप्टेंबर २००१ चा , एका रॅली ला संबोधित करण्यासाठी जाताना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे त्यांच्या विमानाला आग लागली त्यात विमानात असलेल्या ८ जणांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. गळ्यातील लॉकेट वरून त्यांची ओळख पटवण्यात आली होती.

३. संजय गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र. एकेकाळचे त्यांचे राजकीय वारसदार. भारतीय राजकीय इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक. त्यांचा उदय, त्यांची मारुती कार, त्यांची आणीबाणीची भूमिका, त्यांचे कार्यकर्ते, कुटुंबनियोजनाची मोहीम या सगळ्याच गोष्टी वादग्रस्त. त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्याप्रमाणे खळबळजनक राहिलं तसा त्यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू देखील खळबळजनक होता.

राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात त्यांचा एकच विरंगुळा होता तो म्हणजे विमान उडवणे.
ते काही आपल्या भावाप्रमाणे प्रोफेशनल पायलट नव्हते मात्र त्यांनी कमी वजनाचे विमान उडवण्याचे लायसन्स मिळवले होते. त्यांना हवेत विमानाची कलाबाजी करायला आवडायची. त्यांनी व इंदिरा गांधींचे योग गुरु धीरेंद्र ब्रम्हचारी यांनी प्रयत्न करून पिट्स s२ हे ऍक्रोबॅटिक कसरतीचे विमान भारतात मागवले होते.

चालवण्यास अत्यंत अवघड व धोकादायक अशी कुप्रसिद्धी पिट्स विमानाची होती. या विमानावरून मनेका गांधी आणि संजय गांधी यांच्यात भांडणे देखील झाली होती. इंदिरा गांधींनी देखील त्यांना समजावून सांगितलं होतं पण संजय गांधी हट्टी स्वभावाचे होते. आपल्या नेहमीच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे संजयनी राजीव गांधींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सलग तिसऱ्या दिवशी अगदी सकाळी ते सफदरजंग विमानतळावर गेले.

फ्लायिंग इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना तिथे जवळच राहत होते. संजय गांधी त्यांच्या घरी जाऊन थडकले. त्यांना बळजबरीने आठवून आणलं आणि दोघे विमानात बसले. पिट्स विमानाने अगदी तीन फेऱ्या व्यवस्थित मारल्या पण अचानक त्याने गिरकी घेतली आणि ते एकदम जमिनीच्या दिशेने आले. सर्व सामान्य दिल्लीकर भल्या सकाळी एवढ्या खालून कोण विमान उडवत आहे याकडे उत्सुकतेने पाहत होता. काही सेकंदातच विमान थेट जमीन वर आदळले. स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. काळ्या धुराचं लोट हवेत उडाले.

काही क्षणात पंतप्रधानांच्या निवासस्थानात बातमी पोहचली. इंदिरा गांधी घटनास्थळावर आल्या तेव्हा त्यांच्या लाडक्या मुलाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले होते. २३ जून १९८० रोजी विमान अपघातात झालेल्या संजय गांधींच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला.

४. गंटी मोहनचंद्र बालयोगी

बालयोगी यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते १९४५ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून अमलापुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.१९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले. त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. 

एप्रिल १७, इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान ओरीसाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गामांग यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर २२, इ.स. १९९९ रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा आंध्र प्रदेशात विमान कोसळून मृत्यू झाला. ३ मार्च २००२ मध्ये बालयोगी हे ‘बेल २०६’ या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते. त्यांचे हेलिकॉप्टर कृष्णा जिल्ह्यातील कैकालूर भागात कोसळले.

हे सर्वच देशाच्या राजकीय वर्तुळातले मोठे नेते होते. पण  या नेत्यांसोबत आणखीन ही नेते होते ज्यांचा मृत्यू हेलिकॉप्टर आणि विमान अपघातात झाला आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू, एस मोहन कुमारमंगलम, ओ. पी. जिंदाल, डेरा नातुंग, सी संगमा आदी नेत्यांचा समावेश होता. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.