दुतोंड्या मारूतीसाठी संपुर्ण गाव एकत्र येतो अन्

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काहीना काही वेगळपण आहे. स्थानिक कथा, प्रथा, परंपरा.. अशा कित्येक गोष्टीतून आपली गाव समृद्ध होतात. बऱ्याचदा अशा प्रथांना का? कशासाठी? यावर उत्तरं नसतात. तशी उत्तर विचारायची देखील नसतात. कारण काय तर, गाव चांगल्या गोष्टींसाठी एकत्र येणं हे कधीही चांगलीच गोष्ट असते. 

तर अशाच एका गावची हि प्रथा, 

प्रथा अशी कि संपुर्ण गाव मारूतीचं तोंड फिरवण्यासाठी एकत्र येतो. 

मराठवाड्यातलं खांडवी गाव. जालना जिल्ह्यातल्या परतूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणार गाव. सोडतीन हजार लोकवस्ती. निझामाच्या काळात हे गाव किशनप्रसाद यांची जहागीर होती.

किशनप्रसाद हा हैद्राबादच्या निझामाचा वझीर. निझामाच्या काळातच या गावात चौथीपासून शाळा सुरू झाली होती. या गावातलं एक मंदिर आहे आसराबाईचं आणि दूसरं मंदिर तुळजापुरच्या भवानीमातेचं ठाणं समजलं जाणारं तुकोबाईचं…! 

IMG20181201133344

पण याचं गोष्टींसोबत अजून एक गोष्ट आहे जी गावाला वेगळेपण देते. तीच या गावाची प्रथा. दुतोंड्या मारूतीची. 

दुतोंड्या मारुती म्हणल्यानंतर इथल्या मारूतीच्या मुर्तीला दोन तोंड असणार हे तर लक्षात आलच असेल पण हि दोन्ही तोंड एकाबाजूला एक नाहीत. तर हि दोन्ही तोंड आहेत एकामागे एक. 

थोडक्यात सांगायचं झालं तर एकाच शिळेवर असणाऱ्या या दोन मुर्ती आहे. पुढच्या बाजूला एक मुर्ती आणि पाठीमागच्या बाजूला दूसरी मुर्ती.

आत्ता अशा अनोख्या मुर्तीसोबत येते ती अशीच अनोखी प्रथा, 

प्रथा अशी कि श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व गावकरी एकत्र येतात. हे गावकरी आपल्यातून दोघांना मुर्ती फिरवायला सांगतात. मुर्ती फिरवली जाते. पुढचं तोंड मागे जातं आणि मागचं तोंड पुढे. आत्ता पुढचे वर्षभर समोर असणार तोंड तसच राहतं. श्रावण महिन्यात सप्ताह होतात. महाप्रसाद होतो. गावची जत्रा भरते. पुन्हा पुढच्या श्रावणाच्या दुसऱ्या शनिवारी हे तोंड फिरवलं जातं. दरवर्षी हे चालतं. 

maruti

बर हे कधीपासून चालतं ? 

८९ वर्षाचे शेकापचे आमदार हरिभाऊ रामराव बरकुले सध्या घरी असतात. १९७२ ते ७८ च्या काळात ते शेकापचे आमदार होते. ते म्हणाले, 

“  आमच्या आजोबांकडून मी हि प्रथा ऐकतच मोठ्ठा झालो. लहानपणी आजोबा सांगायचे की हि तोंडे आपोआप फिरत असत. त्यात तथ्य वाटतं नसलं तरी लोकांच्या श्रद्धेचा तो भाग असतो. आमच्या गावच्या या प्रथा परंपरेचे साक्षीदार तर गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज आणि भगवानबाबा देखील राहिले आहेत. गाडगेमहाराज १९४० साली गावात आले होते. ते दोन दिवस मंदिराच्या आवारात रहायला होते. पुढच्या दहा वर्षात तुकडोजी महाराज आले होते.  भगवानबाबा तर वर्षातून एकदा तरी मारूतीच्या दर्शनाला येतच असत”. 

चंद्रकांत बरकुले आणि सुरेंद्र बरकुले या प्रथेच्या नियोजनात पहिल्यापासूनच भाग घेत आले आहेत. त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, या प्रथेसाठी कोणताही मानकरी नसतो. आज आपण बऱ्याच गावांमध्ये मानकरी पाहतो. पारंपारिक पद्धतीने एकाच घराण्याकडे हा मान असतो.

पण इथे तो प्रकार नाही. सारा गाव एकत्र आला की आम्ही ठरवतो यावर्षी मुर्ती कोण फिरवणार, आणि त्यातूनच सर्वनुमते दोघांना हि मुर्ती फिरवण्यास सांगितलं जातं. 

प्रथा तशी साधी वाटू शकते, तशी ती साधीच आहे पण सहज, सोप्पी आहे.

प्रथा, परंपरेच्या नावाखाली काहीही चालू असताना लोकांनी जपलेली हि श्रद्धा अनोखीच वाटते. पण या मंदिराच्या वाट्याला काहीच विशेष आलं नाही. तलाठी पंडीत काकडे म्हणतात,

“या मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी शासकिय पातळीवर प्रयत्न करत आहोत.”

ज्या ठिकाणीची ओढ साक्षात गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज, भगवानबाबा यांना राहते त्या मंदिराच्या विकासकामात मात्र उपेक्षाच आहे. 

असो, तर अशा या अनोख्या प्रथेचामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर परतूर पासून जवळच असणाऱ्या खांडवीला तुम्ही श्रावणातल्या दूसऱ्या शनिवारी जावू शकता. 

आणि हो, तुमच्या जवळ असाच इतिहास असेल, असाच भुगोल असेल तर नक्की आम्हाला पाठवा, कारण अशा गोष्टी माणसं जोडण्याचं काम करतात. मंदिर आणि देव हे माणसं तोंडण्याच काम करत नाही तर जोडण्याचं काम करतो म्हणून आमचा हा प्रयत्न. 

भिडू श्रीकांत जाधव. (9765338903) 

हे ही वाचा भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.