व्हायरल होणाऱ्या कोल्हापुरी IPL मागचा ठेका धरायला लावणारा कलाकार..

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे फिरतोय.लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण हा ठेका धरायला लावणारा माणूस कोण आहे?

हा आमचा एक दोस्त आहे. तानाजी मारुती माने याचं नाव आहे. लहानपणापासून याला संगीताचं वेड आहे. संगीत आणि गायन याचे छंद आहेत.कोणत्याही प्रकारचं शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेतलेल्या तानाजीचे गायन तुम्ही ऐकले तर तुम्ही थक्क होऊन जाल. त्याचा गळा गोड आहे.ऐकत रहावे असा त्याचा आवाज आहे.
“भक्तीवाचूनी मुक्तीची मज लागली रे गोडी विठ्ठला मीच खरा अपराधी” हे गाणं मी भल्या भल्यानी गायलेलं ऐकलं पण तानाजीच्या आवाजात त्याची गोडी खूपच वेगळी आहे.गावात रात्रीचं भजन सूरु असतं तेव्हा मध्यरात्री आपल्या थोर आवाजात हा तानाजीचा आवाज सगळ्या शिवारात घुमतो. रात्री ऊसाला पाणी पाजायला गेलेला शेतकरी त्या आवाजात आपला स्वर मिसळून स्वतःच गुणगुणायला लागतो. न गाणाऱ्या माणसालाही गायला लावणारा हा तानाजी माने नावाच्या कलाकाराचा आवाज आहे. मी याच्यावर काही वर्षापूर्वी लिहिलं होत एका स्थानिक पेपरात. तेव्हा अनेक दिवस तो छापील कागद घेऊन फिरत होता हा उपेक्षित कलाकार.मला “मोरे साहेब” या नावाने बोलवणारा हा तानाजी जसा गायक म्हणून, वादक म्हणून थोर आहे,तसा माणूस म्हणून खूपच थोर आहे. त्याचे अनेक अनुभव घेतले आहेत गावातील लोकांनी.
मी शास्त्रीय गाणाऱ्याच्या मैफलीत वाट चुकून कोणाच्यातरी नादाने गेलोय पण तिथल्या स्वरात मला जिवंतपणा जाणवला नाही जो तानाजीच्या गावठी स्वरात आहे. मुळात तानाजी करियर करायला गात नाही तो स्वतःचा नाद म्हणून गातो. गावातील लोकांना आवडावं म्हणून गातो. याच गाण्याच्या नादात त्याच फाट्यावर चांगलं चालणार हॉटेल होतं पण ते बंद झालं. आता तो पूर्णपणे बँड-वाजंत्री व्यवसायात रमला आहे.

 

मला नेहमी वाटायचं यानं पुण्यामुंबईला जावं,संगीताचे धडे गिरवावेत,शिकावं.आपली अस्सल कला इथल्या लोकांना दाखवावी.पण गरिबीमुळे ते शक्य झालं नाही. अगदी पुण्याला येण्याच्या वाटखर्चीपासून सुरुवात करावी लागली असती. आणि कोणी वाटखर्ची दिली तर पुण्यात राहणार कोठ? आणि खाणार काय?आणि फी कोठून देणार?हे प्रश्न होतेच. शेवटी तानाजी पुण्याला येऊ शकला नाही. आणि आम्हीही आमच्या मर्यादेमूळ त्याला आणू शकलो नाही. एक चांगला गायक आणि वादक त्या छोट्या खेड्यात आपली कला सादर करत राहिला. मिळतील तेवढे पैसे घेऊन फाटक्या संसाराला टाके घालत राहिला. अगदी अजय आणि अतुल यांच्या तोडीचा हा संगीतकार आणि गायक झाला असता पण ते शक्य झाले नाही.गावच्या सीमारेषा त्याला ओलांडून बाहेर पडताच आले नाही.परवाच हा व्हिडीओ बघायला मिळाला, त्यात ठेका धरायला लावणारा आमचा तानाजी आणि त्याच्या संगीतावर नाचणारे तरुण हे चित्र बघितला आणि तानाजीचा सगळा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहिला.हा व्हिडीओ पाहून माझा उर अभिमानाने भरून आला. एक दिवस तर तानाजीच्या नावानं उगवला अस अस वाटलं.विनानावाने हा व्हिडीओ फिरतोय. हा कलाकार नेमका कोण?त्याच वर्तमान काय, भूतकाळ कसा हे कळावं समजावं म्हणून हा अट्टाहास.

संपत मोरे – 9422742925

Leave A Reply

Your email address will not be published.