वडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो?

आज आहे वटपोर्णिमा. आजच्या दिवशी वयाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते.

सती-सत्यवान, जन्मोजन्मी हाच पती या प्रथेतून मग टोकाचे समर्थन करणाऱ्या स्त्रीया आणि टोकाचा विरोध करणाऱ्या स्त्रीया हा प्रकार दरवर्षी सणासारखाच चालतो.

असो तर आपल्याला या राड्यात रडायचं नाही. आम्ही तूम्हाला सणाचं महत्व पण सांगणार नाही. आम्ही सांगणाराय ते म्हणजे वडाच्या प्रत्येक फेरीसोबत नेमका कोणता मंत्र म्हणायचा.

त्याआधी एक गोष्ट सरळ सरळ सांगतो, आम्ही तुम्हाला मंत्रांच नाव सांगून गंडवलय.

आत्ता बाकीचे भलेभले पोर्टल तुम्हाला अमक्या हिरोईनने शेअर केला ढमका फोटो म्हणून आत एकही फोटो टाकत नाहीत किंवा हि हिरोईन आहे याची पोरगी म्हणून आपला काडिचा संबधं नसणाऱ्या माणसाचा फोटो टाकतात तेव्हा तुम्हाला काहीही वाटत नाही.

आम्ही तर मंत्राच नाव सांगून तुम्हाला अस्सल डेटा देतोय. 

तर बहिणींनो, काकींनो, आज्जींनो वडाच्या प्रत्येक फेरीप्रमाणे वडाच्या झाडाबद्दल पुराणात असणारे हे सात मुद्दे तुम्हाला माहितीच पाहीजेत.

१) 

वटवृक्षाचे नातं आहे ते थेट रामायणाशी. महाप्रलायाच्या वेळी मार्कंडेय ऋषी त्या प्रलयकारी जळाभोवती फिरत होते. तेव्हा त्यांना पाण्यावर तरंगणाऱ्या एका पानावर दिव्य बाळ दिसेल.

मार्कंडेय ऋषींनी त्या बाळाला तू कोण असे विचारताच. त्या बाळाने मी विश्वाचा निर्माता नारायण अर्थात विष्णू असे उत्तर दिले.

ते बाळ ज्या पानावर होते ते पान वडाच्या झाडाचे होते असे श्रीमदभागवतात म्हटले आहे. हिंदू धर्मग्रॅंथात वडाच्या झाडाचा हा उल्लेख आहे. 

२)

पहिले जैन तीर्थकर आदिनाथ किंवा रिषभनाथ यांना वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. म्हणून हा वृक्ष जैन धर्मींयांना देखील पवित्र आहे.

वडाच्या झाडाचा चीक ऋषी मुनी तपस्व्यांच्या केसांचा गोफ बांधण्यासाठी केला गेल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आलेला आहे. राजवैभवाचे प्रतिक असणाऱ्या वडाच्या झाडाची तुलना सीतेने खुद्द रामाची केल्याचे दाखले आहेत.

३) 

 

उत्तररामचरित्रानुसार यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागमध्ये अक्षय वटवृक्ष होता. पुढे जेव्हा भारताच्या प्रवासासाठी चिनी प्रवासी ह्युएन त्संग आला तेव्हा त्याने या वटवृक्षाचा उल्लेख आपल्या प्रवासवर्णनात केला होता. विचार करा हा वटवृक्ष किती वर्षे जगला असावा. 

४)

हेमचंद्राच्या त्रि षष्ठी शलक पुरूष चरित्रामध्ये देखील वटवृक्षाच्या पारंब्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पारंब्यांना जटा म्हणण्यात आलं असून ऋषींच्या जटांबरोबर त्यांचे वर्णन करण्यात आल आहे. 

कूर्म पुराणानुसार प्रयाग येथील वटवृक्षाखाली ज्याला मृत्यू येतो, तो स्वर्गलोक पार करुन रुद्रलोकात पोहचतो.  

५)

वामन पुराणानुसार रात्रीच्या वेळी वटवृक्षाखाली उभा राहून जो इश्वराचं चिंतन करतो त्याला हवे ते मिळते. यामुळेच वटवृक्षाचा उल्लेख कल्पवृक्ष म्हणून देखील केला जातो.

६)

मुस्लीम पीर वडाच्या झाडाखाली असल्याचे दिसून येतात. मुस्लीम समाजात देखील वडाच्या झाडाखालच्या पीरांना दोर गुंडाळण्याची प्रथा असल्याच दिसून येतं.

७)

मध्य प्रदेशातील मांडला आदिवासी जमातीमध्ये कुलचिन्हानुसार गट आहेत. यापैकी बरगईयन लोकांना बरगाव या नावावरुन हे नाव मिळालं आहे.

वडाच्या झाडाला ते श्रद्धास्थान मानतात. तर ओरीया आदिवासी जमातीमध्ये वटवृक्ष तोडणाऱ्याला पाखंडी समजले जाते.

संदर्भ –  बखरू १९९३, ॲबाट २००३, नायर, राममुर्ती आणि अग्रवाल १९८९, एस.एम.गुप्ता १९९८.

Leave A Reply

Your email address will not be published.