तरीही केतकर उजवेच…

 

कुमार केतकरांना पद्मश्री हा किताब मिळाला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना, काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांची पत्रकारिता नेहमीच वादग्रस्त राह्यली आहे. कारण केतकरांनी अतिशय प्रच्छन्नपणे काँग्रेस वा त्याहीपेक्षा, नेहरू-गांधी घराण्याचं समर्थन केलं आहे. मात्र तरिही कुमार केतकर इंग्रजी आणि मराठी भाषेतले जानेमाने पत्रकार समजले जातात. कारण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिप्रेक्ष्यात कुमार केतकर नेहरू-गांधी घराण्याच्या समर्थनाची भूमिका मांडतात. स्वार्थ साधण्यासाठी वा स्वतःच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी केतकरांनी ही भूमिका घेतलेली नाही.

इंदिरा गांधी आणि आणीबाणी यांचं समर्थन करणारा कुमार केतकरांचा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आला त्यावेळी केतकर महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक होते. गोविंद तळवळकर संपादक होते. काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्याबद्दल, तळवळकरांनाही आत्मीयता होती. मात्र आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांची कार्यपद्धती याबाबत तळवळकरांची भूमिका वेगळी होती. हे माहीत असूनही केतकरांनी स्वतःच्या अधिकारात आपला लेख छापला. त्यामुळे संपादकीय विभागात कुजबुज नाही तर घमासांग चर्चा सुरू झाली. केतकरांच्या लेखाला सज्जड प्रत्युत्तर देणारा लेख सतीश कामत यांना लिहायला सांगण्यात आला. सतीश कामत यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. मात्र त्यामुळे तळवळकर-केतकर, केतकर-कामत यांच्यातील परस्पर संबंधांमध्ये कटुता आली नाही. त्यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले.

भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे संस्थापक, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी केतकरांचे ऋणानुबंध होते. लाल निशाण पक्षाचे, कॉ. एस. के. लिमये यांच्याशीही. केतकरांच्या राजकीय भूमिकेवर आणि दृष्टिकोनावर या दोघांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने फाळणीला पाठिंबा दिला होता. कम्युनिस्ट कार्यकर्ते त्यामागील द्वंद्व वा द्वंद्वांत्मक भौतिकवाद स्पष्ट करून सांगतीलही. मात्र त्यामागचं साधं व्यावहारिक कारण हे होतं की शासनसंस्था कमजोर वा शबल असते तेव्हा क्रांती करणं सुकर होतं. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेलंगणात जो सशस्त्र लढा कम्युनिस्टांनी उभारला त्यामागचं कारणही हेच होतं. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी मात्र वेगळी मांडणी केली. भांडवलदार, जमीनदार वर्गाचे हितसंबंध काँग्रेस पक्ष सांभाळत असला तरिही या पक्षाला साम्राज्यवाद विरोधी लढ्याचा वारसा आहे. त्यामुळे काँग्रेसला पक्षाला पाठिंबा देऊन, कामगार आणि शोषितांच्या हिताची धोरणं पुढे रेटायला हवीत या आशयाची मांडणी कॉ. डांगे यांनी केली होती. इंदिरा गांधी यांचं अल्पमतातलं सरकार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्यावर तगलं होतं. आणीबाणीलाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता. जयप्रकाश नारायण यांची खिल्ली उडवणारी एक कविता, नारायण सुर्वे यांनी या काळात प्रसिद्ध केली होती.

मात्र कुमार केतकर रुढार्थाने कधीही कम्युनिस्ट नव्हते. डाव्या पक्ष-संघटनांबद्दल त्यांना जवळीक वाटत होती. परंतु त्यामध्येही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्याचं त्यांचं भान कधीही सुटलेलं नाही. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते नेहमीच कडवे टीकाकार राह्यले. हरकिशनसिंग सुरजित यांनी जेव्हा काँग्रेसची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या डांगेवादी भूमिकेचं स्वागत केतकरांनी केलं होतं.

केतकरांची काँग्रेसविषयक भूमिका सारांशाने अशी–काँग्रेस पक्ष तन-मन-धनाने कधीही नेहरू-गांधी कुटुंबासोबत राह्यलेली नाही, कारण काँग्रेस पक्षामध्ये अनेक गट-तट आहेत. त्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे समर्थकही आहेत आणि आर्थिक दृष्ट्या उजव्या म्हणजे अमेरिकेची तळी उचलून धरणारेही आहेत. नेहरू-गांधी घराण्याचं वैशिष्ट्य हे की या व्यक्तींची लोकप्रियता वा करिष्मा काँग्रेस पक्षसंघटनेला पार करून जनमानसाला आकर्षून घेतो. त्यामुळे पक्षातील सर्व गटांवर या घराण्यातील व्यक्तींचं अर्थात नेत्यांचं वर्चस्व राहातं. म्हणून लोकानुयायी वा जनवादी (क्रांतीकारी नाही) धोरणं—आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय, रेटणं या व्यक्ती वा नेत्यांना शक्य होतं.

डाव्या विचारांशी जवळीक असली तरिही केतकरांनी जागतिकीकरणाचं स्वागत केलं होतं. अतिशय आक्रमकपणे. स्वदेशीवादी संघवाले आणि गांधीवादी दोघांवरही त्यांनी आक्रमक टीका केली होती. रशियातील कम्युनिझम कोसळला त्यावेळी केतकर मॉस्कोमध्ये होते. पूर्व युरोपातील कम्युनिस्ट राजवटींचा अंत त्यांनी पत्रकार म्हणून जवळून पाह्यला होता. मार्केट नावाच्या शक्तीच्या उदयाचेही ते साक्षीदार होते. आईसलँण्ड आणि दक्षिण ध्रुव वगळता बहुधा सर्व राष्ट्रांमध्ये केतकर पत्रकारितेच्या निमित्ताने हिंडले आहेत. कम्युनिस्ट, भांडवलशाहीवादी, एकाधिकारशाहीवादी, हुकुमशाहीवादी इत्यादी सर्व राजकीय व्यवस्था त्यांनी पत्रकाराच्या नजरेने टिपल्या आहेत.

त्याशिवाय केतकर आधाशी वाचक आहेत. त्यांचा वाचनाचा वेग स्तिमित करणारा आहे. सध्या काय चाललंय असं एकदा त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं मॉन्सूनच्या राजकीय मितींचा अभ्यास करतो आहे. काप्लानचं पुस्तक वाचलं असशीलच, ते तात्काळ म्हणाले. ते पुस्तक प्रकाशित होऊन त्यावेळी फारतर दोन महिने झाले होते. पण केतकरांनी ते वाचलं होतं. साहित्य, तत्वज्ञान, पत्रकारिता, सिनेमा, नाटक कोणत्याही विषयावरील महत्वाचं ताज पुस्तकं त्यांनी एकतर वाचलेलं असतं किंवा त्यांना त्याबद्दल माहिती असते. आणि यापैकी कोणत्याही विषयावर बोलताना ते त्यांची राजकीय भूमिका गुंफतात. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे हेच हट्टाने पुढे रेटतात. मात्र तरिही त्यांचं भाषण वा लेखन कधीही कंटाळवणं होत नाही. हजरजबाबीपणा, नर्म विनोद, टिंगल, उमदेपणा आणि कधी कधी मवालीगिरी याचं अपूर्व मिश्रण त्यांच्या लिखाणात आणि बोलण्यात असतं.

ईकॉनॉमिक टाइम्सचे राजकीय संपादक, ऑब्झर्वरचे संपादक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत या मराठीतील प्रमुख दैनिकांचे संपादक, वृत्तवाहिन्यांवर सल्लागार संपादक, इंग्रजी पत्रकारितेत स्तंभ लेखन ही त्यांची पत्रकारितेतली भरगच्च कारकीर्द आहे. राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांच्यातला पत्रकार अर्थातच भूमिका मांडणारा आणि घेणारा पत्रकार स्वस्थ बसणार नाही. मात्र त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला मिळू शकतो. सॅम पित्रोदा, जयराम रमेश, शशी थरुर यासारख्या काँग्रेस पक्षातील बुद्धिवंतांच्या मायंदाळीत केतकर यांचा समावेश राज्यसभेच्या उमेदवारीने झाला आहे. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.

7 Comments
  1. Sunil Barge says

    Nice One ! Its always good to read and listen Kumar Ketkar. All the best to him for Rajyasabha

  2. Pramod Mujumdar says

    सुनिल,
    निव्वल झकास!

  3. Anonymous says

    भारी

  4. Anonymous says

    चला कितेक वर्ष गांधीच्या घरी पाणी भरल्यानंतर राहुल्बाबानी ‘भैया’ (ब्रदर) संबोधले हे काही कमी नाही !

  5. Pappu says

    Certified Chamcha of Gandhi family under the garb of “journalist” finally got something for which he sold his sole for years – typical “presstitute” Comrade Kumar Ketkar…

  6. संतोष डुकरे says

    खुपच छान

  7. RahulAphale says

    केतकर व्यासंगी आहेत , पत्रकार आहेत आणि भुमिकेवर ठाम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.