जगातील सर्वात सुंदर महाराणी…

आज गायत्रीदेवींची जयंती. काही गोष्टी सुंदरतेच्या पुढे असतात. गायत्रीदेवींच्या सुंदरतेच वर्णन खुशवंतसिंह यांच्यापासून अमिताभ,शाहरुख सर्वांनीच केलं आहे. जगप्रसिद्ध व्होग मासिकाने जगभरातील १० सौंदर्यवतींच्या यादीत त्यांचा समावेश करुन सन्मान केला होता. अशा या सुंदर महाराणीच्या जयंतीनिमित्त बोलभिडूचा हा लेख.

वयाच्या १२ व्या वर्षी जयपूरचे राजा मानसिंग यांच्या प्रेमात. –

महाराणी गायत्री देवी यांनीच आपल्या ‘ए प्रिन्सेस रिमेंबर्स’ या आत्मचरित्रात आपल्या प्रेमकहाणी विषयी सांगितलंय. त्यात त्यांनी लिहिलंय राजा मानसिंग कोलकात्यात पोलो खेळण्यासाठी येत असत. १९३१ साली जेव्हा ते आले, त्यावेळी आपण १२ वर्षाच्या असुत आणि राजा मानसिंग २१ वर्षांचे त्यावेळीच त्या राजा मानसिंग यांच्या प्रेमात पडल्या होत्या. राजा मानसिंग देखील त्यांच्या सौदर्याने घायाळ झाले होते आणि पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडले होते. पुढे ९ वर्षांनी म्हणजेच १९४० साली राजा मानसिंग आणि राजकुमारी गायत्री देवी यांचा विवाह झाला आणि बंगालच्या राजघराण्याची राजकुमारी असणाऱ्या गायत्री देवी जयपूरच्या महाराणी झाल्या.

इंदिरा गांधींना सौंदर्याविषयी असूया. –

गायत्री देवी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ‘शांतीनिकेत’मध्ये सोबतच शिकायला होत्या. परंतु आपल्या सौदर्यांचा गायत्री देवींना अवाजवी अभिमान असल्याचं इंदिरा गांधींचं त्यांच्याविषयीचं मत होतं, असं ‘द इंडीपेन्डट’ मध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलंय. खुशवंत सिंग यांनी देखील एका ठिकाणी इंदिरा गांधींना गायत्री देवींच्या सौंदर्याविषयी असूया वाटायची असं लिहिलंय. गायत्री देवी सक्रीय राजकारणात आल्यानंतर देखील या दोघींमध्ये कायमच बेबनाव राहिला. आणीबाणीच्या काळात तर इंदिरा गांधींनी गायत्री देवींना ६ महिन्यासाठी तिहार जेलमध्ये बंदिस्त केलं होतं.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सौंदर्याच्या प्रेमात –

अमिताभ बच्चन यांनी स्वतःच आपल्या एका ब्लॉगमध्ये  लिहीलं होतं की ते महाराणी गायत्री देवींच्या सौंदर्याच्या प्रेमात होते म्हणून. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी असतानाच्या आठवणी सांगताना अमिताभ बच्चन लिहितात की ते तरुण असताना त्यांच्या कॉलेजच्या बाजूलाच ‘जयपूर पोलो ग्राउंड’ होतं. देशातील सर्वोत्तम पोलो प्लेअर्स तिथे यायचे, म्हणूनच त्यांचा खेळ बघण्यासाठी ते ग्राउंडवर जात असत. जयपूरचे महाराजे हे त्याकाळचे उत्कृष्ट पोलो प्लेअर होते, ते देखील तिथे यायचे. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी देखील असायच्या. सिफॉनच्या साडीतील महाराणी या सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतिक भासायच्या. त्यावेळी पोलोच्या मॅच व्यतिरिक्त महाराणींची एक झलक बघण्यासाठी देखील अमिताभ बच्चन पोलोच्या ग्राउंडवर जात असत. तरुणपणी आपण कधी कल्पना देखील करू शकत नव्हतो महाराणींना  भेटता येईल म्हणून  म्हणून परंतु ती संधी नंतर मिळाली आणि त्यांच्या आदरातिथ्याने आपण भारावून गेलो, असं देखील बच्चन यांनी लिहिलंय.

शाहरुख खानला देखील ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुला सर्वाधिक ग्लॅमरस महिला कोण वाटते..? त्यावेळी क्षणभराचा देखील विलंब न करता शाहरुखने महाराणी गायत्री देवीयांचं नांव घेतलं होतं. त्यांच्या सौंदर्याचं शाहरुखने अमाप कौतुक केलं होतं.

 

त्यांची भेट करिष्मासाठी फॅन मोमेंट तर करीनाला पडद्यावर साकारायची होती भूमिका –

करिष्मा कपूर हीला ज्यावेळी २००१ साली श्याम बेनेगल यांच्या झुबैदा चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी महाराणींना भेटण्याची संधी मिळाली होती. या भेटीबाबतीत सांगतांना करिष्मा कपूर म्हणते की त्यांची भेट आपल्यासाठी फॅन मोमेंट होती. त्या खऱ्या अर्थाने सौंदर्याच्या प्रतिक होत्या. करिष्मा प्रमाणेच करीना कपूर देखील गायत्री देवींच्या सौदर्यांच्या प्रेमात होती, तीला महाराणींच्या जीवनावरील चित्रपटात गायत्री देवींची भूमिका साकारायची होती. गायत्री देवींच्या जीवनावर ‘बादशाहो’ चित्रपट तर आला पण करीनाला मात्र गायत्री देवींची भूमिका मिळाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.