झांसीच्या राणीचं प्रतिरूप असणारी ‘झलकारी राणी’…!!!

भारताचा इतिहास हा बलिदानाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक ‘जिवा महाला’ होते म्हणून महाराजांची आगऱ्याच्या कैदेतून  सुखरूप सुटका होऊ शकली होती, तशीच झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यात देखील एक ‘झलकारी बाई’ होत्या, ज्यांचामुळे राणी लक्ष्मीबाईंचे युद्धात प्राण वाचले होते.

कोण होत्या ‘झलकारीबाई’…?

झलकारीबाई या राणी लक्ष्मीबाई यांच्या सल्लागार म्हणून काम बघत असत. २२ नोव्हेंबर १८३० रोजी झांसीजवळील ‘भोजला’ या खेडेगावातील  एका दलित कुटुंबात झलकारीबाई यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्या अतिशय धाडसी होत्या. त्यांच्या शौर्याचे  आणि धाडसाचे अनेक किस्से झांसीमध्ये चर्चिले जात असत. तारुण्यात असताना त्यांच्या गावातील सावकाराच्या घरावर जेव्हा काही दरोडेखोरांनी हल्ला केला होता, तेव्हा झलकारी बाईंनी एकटीने या दरोडेखोरांचा सामना करत त्यांना पळवून लावलं होतं. एक किस्सा तर असाही सांगितला जातो की तारुण्यात ज्यावेळी त्यांच्यावर एका वाघाने हल्ला केला होता, त्यावेळी त्यांनी आपल्या हातातील कुऱ्हाडीच्या सहाय्याने वाघाला ठार केलं होतं. त्यांची अजून एक खासियत म्हणजे त्या दिसायला अगदीच राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्याच होत्या.

राणी लक्ष्मीबाईंच्या संपर्कात कशा आल्या..?

झलकारीबाईंचं लग्न राणी लक्ष्मीबाई यांच्याच सैन्यातील पुरण सिंग नावाच्या सैनिकाबरोबर ठरलं होतं. एका दिवशी दुर्गापूजेच्या मुहूर्तावर झलकारीबाईं इतर काही महिलांबरोबर झांसीच्या किल्ल्यावर गेल्या होत्या. त्यावेळी राणी लक्ष्मीबाईंची  नजर त्यांच्यावर पडली आणि दिसण्यातील साधर्म्यामुळे त्या लगेच लक्ष्मीबाईंच्या नजरेत भरल्या. लक्ष्मीबाईंनी लगेच त्यांना भेटायला बोलावलं. तोपर्यंत झलकारीबाईंच्या शौर्यगाथा लक्ष्मीबाईंच्या कानावर गेलेल्या होत्याच. या कथा ऐकून प्रभावित झालेल्या राणी लक्ष्मीबाईंनी झलकारीबाईंना आपल्या महिला फौजेत समाविष्ट करून घेतलं. झलकारीबाई केवळ धाडसी आणि शूरवीरच नव्हत्या तर त्या मुत्सद्दी देखील होत्या. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी  राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळवलं आणि त्या राणीच्या सल्लागार म्हणून काम बघू लागल्या.

Screen Shot 2018 06 17 at 6.37.15 PM

लढाईदरम्यान वाचवले राणी लक्ष्मीबाईंचे प्राण…!!!

१८५८ ब्रिटीश सैन्याने हेन्री रोज याच्या नेतृत्वाखाली झांसीचा पाडाव करण्यासाठी झांसीवर हल्ला केला. त्याकाळातील अनेक अद्ययावत शस्त्रसाठ्यासह आलेल्या प्रचंड मोठ्या ब्रिटीश फौजांशी राणी लक्ष्मीबाई आपल्या केवळ ४००० सैनिकांच्या मदतीने लढत होत्या. या लढाईत देखील राणी लक्ष्मीबाईंनी शौर्याची पराकाष्ठा करत ब्रिटिशांना झुंजवलं होतं, परंतु आपल्याच सैन्यातील काही सैनिकांच्या फितुरीमुळे या युद्धात राणी लक्ष्मीबाईंचा पराभव झाला. यावेळी राणी राणी लक्ष्मीबाईंचेच प्राण धोक्यात आले होते. या मोक्याच्या क्षणी  पुन्हा एकदा झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला धाऊन  आल्या. राणीच्या चेहऱ्याशी असलेल्या आपल्या साधर्म्याचा फायदा उठवत त्या स्वतः राणीच्या ठिकाणी लढायला मैदानात उतरल्या.

झलकारीबाईंच्या या योजनेला यश आलं आणि जवळपास दिवसभर ब्रिटीश सैन्य राणी लक्ष्मीबाई समजून झलकारीबाईंशी लढत राहिलं. एवढ्या वेळेत राणी लक्ष्मीबाई ब्रिटीशांची नजर चुकवून सुरक्षित ठिकाणी पोहोचल्या होत्या. पण आपल्या तुटपुंज्या सैन्याच्या बळावर झलकारीबाई तरी किती वेळ ब्रिटीशांशी लढू शकणार होत्या..? दिवसभर ब्रिटिशांना झुंजवत ठेवल्यानंतर शेवटी झलकारीबाई ब्रिटीशांच्या ताब्यात सापडल्या.

मला फासावरच लटकवा…!!!

ब्रिटीश फौजांनी ज्यावेळी झलकारीबाईंना कैद केलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘दुल्हा जू’ नावाच्या स्थानिक माणसाने झलकारी बाईंना ओळखलं त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं ब्रिटिशांना समजलं. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटिशांनी अपमानित भावनेतूनच झलकारीबाईंना विचारलं की या गुन्ह्याबद्दल तुला कुठली शिक्षा देण्यात यावी..? यावर क्षणाचाही विलंब न करता झलकारीबाईंनी उत्तर दिलं की, “मला फासावरच लटकवा”

त्यानंतर पुढे नेमकं काय झालं आणि झलकारीबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल इतिहासामध्ये वेगवेगळी मतमतांतरे  बघायला मिळतात. काहींच्या मते ब्रिटिशांनी त्याचवेळी त्यांना फाशी दिली तर काहींच्या मते त्यावेळी ब्रिटिशांनी झलकारीबाईंना सोडून दिलं  आणि पुढे १९९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Screen Shot 2018 06 17 at 6.37.32 PM
झलकारीबाईंचा ग्वाल्हेरमधील पुतळा

बुंदेलखंड प्रांतातील दलित समाजात झलकारी बाई यांना अतिशय आदराचं आणि मानाचं स्थान आहे. झलकारीबाई या त्यांच्यासाठी अभिमानाचं आणि आत्मसन्मानाचं प्रतिक आहेत. त्यामुळेच ग्वाल्हेरमध्ये त्यांचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. भारत सरकारनेदेखील या विरांगनेच्या शौर्याची दखल घेताना २००१ साली त्यांच्यावर टपाल तिकीट काढलेलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.